Breaking News

पुरस्कार

त्या तिघांना एका संस्थेतर्फे पुरस्कार मिळणार होते. ते  खास गाडी करून मुंबईला निघाले. संस्थेने दिलेल्या पत्त्यावर ते पोहचले. त्या ठिकाणी कोणीच नव्हते. तासभर थांबल्यावर त्या ठिकाणी दोन-तीन कार्यकर्ते आले. त्यांनी हॉल उघडला. तयारी सुरू केली. त्यांच्याकडे चौकशी केल्यावर प्रमुख पाहुणे उशिरा येणार असल्याने कार्यक्रम उशिरा सुरू होणार असल्याचे त्यांना समजले. त्यांनी सकाळपासून काहीच न खाल्ल्याने पोटात कावळे ओरडत होते. त्या ठिकाणी चहाचीही सोय दिसत नव्हती. पुरस्कार स्वीकारायला जायचे तर एसटीने कसे जायचे म्हणून गाडी करून आले होते. भाड्यासाठीच दोन हजार रुपये गेल्याने खिशात पैसे नव्हते. त्यांनी सोबत आणलेल्या मित्रांकडून पैसे गोळा करून बाजूला असलेल्या वडापावच्या गाडीवरून वडापाव घेऊन खाल्ला. त्यानंतर हॉलमध्ये आल्यावर सोबत किती माणसे आणली आहेत त्यांचे प्रत्येकी शंभर रुपये भरा असे सांगितल्याने बरोबर आलेल्या मित्रांना गाडीतच बसण्यास सांगितले. पुरस्कार वितरण सोहळा उशिरापर्यंत चालला. शंभरपेक्षा जास्त पुरस्कार दिले. प्रत्येकी दीड-दोन हजार रुपये संपवून एक छोटेसे स्मृतिचिन्ह घेऊन डोक्यावर हात मारून ते परत गावाला आले. माझा एक मित्र त्याला मिळालेल्या पुरस्काराची ही गोष्ट सांगत असतो. हे सगळं आठवण्याचे कारण म्हणजे आठवड्यापूर्वी रायगड जिल्हा परिषदेने रायगड भूषण पुरस्काराची वाटलेली खिरापत.

आपल्याकडे पुरस्कार मिळाला की ती व्यक्ती कोणी तरी फार मोठी आहे असे वाटते. त्यामुळे अनेक जण आपल्याला पुरस्कार मिळवण्यासाठी धडपडत असताना दिसतात. अशा गरजू लोकांच्या शोधात अनेक पुरस्कार देणारे आपल्या संस्था घेऊन तयार असतात. प्रत्येक पुरस्काराची किंमत ठरलेली असते. काही भाग्यवंतांना (स्वखर्चाने) पुरस्कार घेण्यासाठी दुसर्‍या देशात नेऊन कोणाच्या तरी हस्ते सहलीला आलेल्या लोकांच्या उपस्थितीत पुरस्कार दिला जातो. त्यांचे फोटो आपल्याकडच्या वर्तमानपत्रात छापून आणतात. त्यामुळे लोकांना वाटतो केवढा मोठा पुरस्कार मिळाला. प्रत्यक्षात प्रायोजकांचा सहलीचा आणि पुरस्कार वाटण्याचा धंदा चालवण्यासाठी हे केले जाते. पुरस्कार दिल्याने सहलीत कोणतीही सोय नसली, तरी तक्रार करता येत नाही. अशा पुरस्कारासाठी अनेक शिक्षक आणि तथाकथित समाज सेवक खर्च करायला तयार असलेले पाहायला मिळतात.

आपल्या रायगड जिल्हा परिषदेने या वर्षात 336 रायगड भूषण पुरस्कार वाटले. रायगड जिल्हा परिषदेने हे पुरस्कार सुरू केले त्या वर्षी फक्त पाच जणांना हे पुरस्कार दिले होते. स्व. नानासाहेब धर्माधिकारींसारख्या महनीय व्यक्तींना या पुरस्काराने गौरवल्यानंतर राजकारणासाठी या पुरस्काराचे अवमूल्यन करण्यात आलेले पाहून आता पुरस्कार स्वीकारणार्‍यांना नक्कीच या पुरस्काराचा आनंद वाटला नसणार. हे पुरस्कार निवडणूक डोळ्यासमोर ठेवून दिलेले आहेत यामध्ये शंकाच नाही. सत्ताधारी पक्षाच्या सदस्यांनी नाव सुचवायचे आणि त्यांना पुरस्कार वाटायचे हे तंत्र शेकापने सुरू केले. त्या व्यक्तीच्या कार्याची माहिती नसताना स्थानिक कार्यकर्त्यांना खूश करण्यासाठी पुरस्कार देऊन सत्ताधारी पक्षाने या पुरस्कारचे महत्त्वच संपवून टाकले आणि स्वतःचे हसे मात्र करून घेतले आहे.

आपल्या नावापुढे पदवी सारखे पुरस्कार लिहिण्याची सुरुवात काही वर्षापासून सुरू झाली आणि अनेक शिक्षक, डॉक्टर आणि पत्रकारही अशा पुरस्कारच्या मागे लागलेले पाहायला मिळतात. मुंबईसह खेड्या-पाड्यातील  अनेक संस्था राज्य पातळीवरील पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, व्यंगचित्रकार, डॉक्टर आणि शिक्षक अशा वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना देताना दिसतात. वर्तमानपत्रात जाहिरात देऊन माहिती आणि प्रवेश फी पाठवण्यास सांगितली जाते. त्यानंतर पुरस्कारासाठी तुमची निवड झाली असून त्या वेळी तुमची माहिती असणारी स्मरणिका प्रसिद्ध करणार आहोत. त्यासाठी ओळखीच्या लोकांच्या 10 हजारच्या जाहिराती पाठवा, असे सांगितले जाते. मग पुरस्काराची हौस असलेले  तथाकथित गौरवमूर्ती लगेच पैसे पाठवून देतात अशा गोळा केलेल्या पैशातून छोटेसे स्मृतिचिन्ह आणि एक फूल देऊन स्थानिक पुढार्‍याच्या हस्ते तुमचा सत्कार केला जातो. त्याबदल्यात त्यांना लाखो रुपयांची कमाई होते. एक प्रकारचा हा गोरख धंदाच आता सुरू झाला आहे. रायगड जिल्हा परिषदेने फक्त पैसे न घेता पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाशिल्याने रायगड भूषण पुरस्कार वाटून आपणही यामध्ये मागे नसल्याचे दाखवून या पुरस्कारचे महत्त्व कमी केले आहे. त्यामुळे ज्यांना यापूर्वी हा पुरस्कार मिळाला त्यांना आता रायगड भूषण पुरस्कार स्वीकारल्याबद्दल पश्चाताप होत असेल.

-नितीन देशमुख, फेरफटका

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply