
पुणे : प्रतिनिधी
भाजपमध्ये यापुढे मेगाभरती होणार नाही, मात्र भरती सुरूच राहणार आहे, असं सूचक वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले. महाजनादेश यात्रेने पुण्यात प्रवेश केल्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर आणखी कोण भाजपमध्ये प्रवेश करणार आहे, या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी भाजपमध्ये भरती सुरू राहणार असे सांगितले. महाजनादेश यात्रेने आतापर्यंत 3,018 किमीचा प्रवास पूर्ण केला. 107 मतदारसंघात ही यात्रा आतापर्यंत पोहोचली, अशी माहिती त्यांनी दिली. बारामतीत दुसर्या पक्षाच्या लोकांनी सभाच घ्यायच्या नाही का? बारामतीत 370 कलम लागले आहे का? तुम्ही आमच्या शहरात या, सभा घ्या. आम्ही सहकार्य करतो, असे विधान फडणवीस यांनी केले.
…त्यांना दोष दिसायला लागलेत
बारामतीत मुख्यमंत्र्यांची सभा उधळण्याचा प्रयत्न झाला, त्याबाबत ते बोलत होते. ते म्हणाले, फक्त सात कार्यकर्ते येऊन सभा उधळण्याचा प्रयत्न करीत होते. पोलीस येताच ते पळून गेले. बारामतीत लाठीचार्ज झाला नाही. जी द्राक्ष मिळत नाहीत ती आंबट असतात, अशी अवस्था राष्ट्रवादी काँग्रेसची झालीय. उदयनराजे पक्षात असताना त्यांना त्यांच्यातील कुठलेही दोष दिसले नाहीत. पक्ष सोडून गेल्यानंतर मात्र त्यांना दोष दिसायला लागले, असे मुख्यमंत्री म्हणाले.