Breaking News

ठाकरे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे काय?

भाजप नेते आशिष शेलारांचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी
मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात झालेल्या सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए)विरोधी आंदोलनावेळी फ्री काश्मीरचे पोस्टर झळकाविणार्‍या तरुणीविरोधातील तक्रार मुंबई पोलिसांनी मागे घेतली असून, या प्रकरणात सी रिपोर्ट दाखल केला आहे. यावरून भाजपचे नेते आमदार आशिष शेलार यांनी हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय, असा सवाल उपस्थित करीत ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
सुधारित नागरिकत्व कायद्याला विरोध करण्यासाठी वर्षभरापूर्वी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया परिसरात आंदोलन करण्यात आले होते. या आंदोलनात सहभागी झालेल्या मेहक मिर्झा प्रभू या तरुणीने फ्री काश्मीर (काश्मीर मुक्त करा) या आशयाचे पोस्टर झळकाविले होते. या तरुणीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता, मात्र आता या प्रकरणात पोलिसांनी सी रिपोर्ट दाखल केला असून, भाजपने त्यावरून ठाकरे सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी ट्विट करीत काही प्रश्न सरकारला विचारले आहेत. कसाबचा पाहुणचार बिर्याणीने केला. कन्हैया ज्यांना आपलासा वाटतो त्या आघाडीच्या ठाकरे सरकारचे आता शहरी नक्षलवाद्यांना रेड कार्पेट? आझाद काश्मीरचा नारा देणार्‍या मेहक प्रभूच्या हातात मुंबई पोलीस आता निर्दोषत्वाचा दाखला देणार? हे सरकार तुकडे तुकडे गँगचे आहे की काय?, अशी विचारणा करीत शेलार यांनी ठाकरे सरकारला धारेवर धरले आहे.
‘हाच शिवसेनेचा खरा चेहरा’
मुंबईच्या गेटवे ऑफ इंडियावर जेएनयूतील तुकडे गँगच्या समर्थनार्थ निदर्शने करणार्‍या ज्या निदर्शकांच्या हातात ‘काश्मीर मुक्त करा’चे फलक होते, त्यांच्याविरुद्धची तक्रार मागे घेऊन ठाकरे सरकारने तुकडे गँगची पाठराखण केली आहे. हाच आहे शिवसेनेचा खरा चेहरा, असे ट्विट भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply