Breaking News

कार्यकर्ता हीच भाजपची ताकद

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे उरणमध्ये प्रतिपादन

उरण : वार्ताहर

कार्यकर्ता हीच भाजपची ताकद असून, आज विविध पक्षांतील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भारतीय जनता पक्षात मोठ्या संख्येने प्रवेश करीत आहेत. त्यामुळे पक्ष अधिक मजबूत होत आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी येथे केले. उरण विधानसभा मतदारसंघातील शेकाप, शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मनसेमधील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी रविवारी (दि. 15) भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला. त्यांचे स्वागत करताना लोकनेते रामशेठ ठाकूर अध्यक्षस्थानावरून बोलत होते.

जेएनपीटी मल्टीपर्पज हॉलमध्ये झालेल्या या पक्षप्रवेश कार्यक्रमास सिडको अध्यक्ष तथा भाजप जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जेएनपीटीचे विश्वस्त व भाजप जिल्हा सरचिटणीस महेश बालदी, उरणच्या नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, जिल्हा चिटणीस चंद्रकांत घरत, तालुका उपाध्यक्ष प्रकाश ठाकूर, सरचिटणीस सुनील पाटील, महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, उपनगराध्यक्ष जयविन्द्र कोळी, कामगार नेते सुरेश पाटील, सुधीर घरत, महिला मोर्चा तालुका अध्यक्ष संगीता पाटील, सोनारीच्या सरपंच पूनम कडू यांच्यासह नगरसेवक-नगरसेविका, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

केंद्रीय रस्तेविकास मंत्री नितीन गडकरी यांच्या मार्गदर्शनाखाली उरण-पनवेल रस्त्याचे काम 90 टक्के झाले असून, डिसेंबरपर्यंत ते पूर्ण होईल. हा रस्ता महेश बालदी यांच्या देखरेखीखाली उत्तमपणे बांधण्यात आला असल्याचे गौरवोद्गार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी काढले.

स्वतंत्र उरण विधानसभा मतदारसंघाची निर्मिती 2009 साली झाली, मात्र उरणचा विकास झाला नाही. या पार्श्वभूमीवर महेश बालदी यांनी दहापट काम करून दाखविले आहे. उरणच्या सर्वांगीण विकासासाठी पुढील काळातही त्यांना सहकार्य करा, असे आवाहन आमदार प्रशांत ठाकूर यांनी केले.

भाजप नेते महेश बालदी म्हणाले की, उरणच्या विकासासाठी आम्ही 500 कोटी रुपये आणले. जगात सर्वांत प्रथम शिव-स्मारक जेएनपीटी येथे उभारले. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या सहकार्याने उरण शहरातील विजेच्या भुयारी कामासाठी 35 कोटींचा निधी आणला. त्याचप्रमाणे करंजा बंदरासाठी 150 कोटी रुपये आणले. उरण शहरात पाईपद्वारे एका वर्षात दोन हजार नागरिकांना गॅस पुरवला. पुढील पाच वर्षांत उरण तालुक्यात पाईपलाईनने गॅस पुरविला जाईल. ज्याप्रमाणे आमदार प्रशांत ठाकूर यांनी पनवेल तालुक्यात विकासाची कामे केली तशीच त्यांच्या मार्गदर्शनातून विकासाची कामे उरण येथे केली जातील. उरणचा विकास निश्चितपणे होणार आहे. त्यासाठी आपली साथ हवी आहे.

प्रास्ताविकात सुधीर घरत यांनी गेल्या पाच वर्षांत भाजप नेते महेश बालदी यांनी किती व कोणती विकासकामे केली आणि त्यासाठी केंद्र व राज्य शासनाकडे कसे प्रयत्न व पाठपुरावा केला याची माहिती दिली. या वेळी विविध पक्षांतील असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. त्यांचे मान्यवरांनी स्वागत केले, तर भाजपमधील सक्रिय कार्यकर्त्यांना मान्यवरांच्या हस्ते नियुक्तिपत्रे देण्यात आली.

Check Also

तब्बल 33 वर्षांपासून फरार असलेला खुनी पती गजाआड

पनवेल : वार्ताहर पत्नीला जिवंत जाळून फरार झालेला आरोपीचा तब्बल 33 वर्षांनंतर छडा लागला आहे. …

Leave a Reply