Breaking News

पेणच्या विकासाचे फुकटचे श्रेय कोणीही घेऊ नये

  भाजप तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांचे खडे बोल; आमदार रविशेठ पाटीलच जनतेचे खंबीर नेतृत्व

पेण ः प्रतिनिधी

पेण तालुक्यातील बोरी-शिर्की चाळ रस्ता पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून मंजूर झाला. हा रस्ता खासदार साहेबांनी मंजूर केलेला नाही. पाच कोटी 97 लाखांचा निधी यासाठी खर्ची पडला. त्याची मंजुरी संबंधित विभागामार्फत झालीय. आमदार रविशेठ पाटील या कामी सातत्याने प्रयत्नशील राहून केंद्रीय ग्रामविकासमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या माध्यमातून भेट घेऊन हे काम मार्गी लागले आहे. त्याचे फुकटचे श्रेय लाटण्याचे काम कोणीही करू नये, असे खडे बोल भाजपचे पेण तालुकाध्यक्ष श्रीकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सुनावले आहेत. या वेळी प्रा. लक्ष्मण जांभळे सर उपस्थित होते.

या रस्त्यासाठी आमदार रविशेठ पाटील यांनी आमदार फंडातून 40 लाख रुपयांचा निधी देऊन रस्त्याचे काम पूर्णत्वास नेले आहे. कोणताही खासदार निधी या रस्त्यावर खर्च झालेला नाही. तसेच हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारित असूनसुद्धा जिल्हा परिषद सदस्यांनी या रस्त्याकडे दुर्लक्ष केले होते, मात्र फुकटचे श्रेय लाटण्यासाठी उगाचच खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल करण्याचे काम सुरू आहे.

वाशी खारेपाट विभागाच्या पाणी प्रश्नासाठी तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 38 कोटींचा निधी तत्काळ मंजूर करून हा पाणीप्रश्न कायमचा निकाली निघावा यासाठी प्रयत्न करीत होते. सदरचा निधी एमएमआरडीएकडून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडे वर्ग केला. त्याचे काम करणार्‍या ठेकेदाराला ब्लॅक लिस्टमध्ये टाकून या योजनेचे काम अर्धवट ठेवण्याचे काम येथील स्थानिक पुढार्‍यांनी केले आहे. जनतेला गेली 11 वर्षे पाण्यापासून वंचित ठेवण्याचे काम येथील पुढार्‍यांनी केले आहे, मात्र आमदार रविशेठ पाटील यांनी जनतेला पाणी मिळवून देण्यासाठी संबंधित विभागाच्या अधिकारीवर्गासोबत बैठक घेऊन शिल्लक राहिलेल्या कामाची ई-निविदा प्रक्रिया पूर्ण करून अमरावतीच्या फड नामक ठेकेदाराकडे हे काम देण्यात आले आहे.

त्यामुळे उगाचच श्रेयासाठी शहापाडा धरणावर भेट देऊन प्रसिद्धी करण्याचे काम करून फुकटचे श्रेय लाटण्याचे काम सुरू आहे, परंतु जनता त्यांचे राजकीय कावे ओळखून आहे. आमदार रविशेठ पाटील हेच पेणच्या जनतेचे खंबीर नेतृत्व असून विरोधकांच्या खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या अफवांना जनता भुलणार नाही हे त्यांनी लक्षात ठेवावे, असेही श्रीकांत पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

Check Also

उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये विज्ञान प्रदर्शन उत्साहात

उलवे नोड ः रामप्रहर वृत्त रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील शकुंतला रामशेठ ठाकूर स्कूलमध्ये …

Leave a Reply