पनवेल : रामप्रहर वृत्त
राज्यासह संपूर्ण देशभरात भाजपच्या विजयाची लाट असून, अथांग सागरी किनारपट्टी लाभलेल्या कोकणातदेखील तीच लाट आहे. ही लाट येत्या विधानसभा निवडणुकीपर्यंत अशीच कायम ठेवून विरोधकांच्या अपप्रचारावर त्सुनामी निर्माण करण्यासाठी आणि रायगडसह कोकणात भाजपचे कमळ फुलवण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहन भाजपचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी येथे केले. त्यांच्या बहुमूल्य मार्गदर्शनामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे.
भारतीय जनता पक्षाचे ठाणे व कोकण विभाग कार्यकर्ता संमेलन रविवारी पनवेल येथील विरुपाक्ष मंगल कार्यालयात राष्ट्रीय कार्याध्यक्ष नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले. या वेळी त्यांनी कार्यकर्त्यांना यशाचा मूलमंत्र दिला. लोकसभा निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागल्यानंतर आता विधानसभा निवडणुकीतील पराभवाचे सावट विरोधकांना स्पर्श करू लागले असल्याने ते भाजपच्या तसेच केंद्र व राज्य सरकारविरोधात अपप्रचार करीत आहेत. त्याला चोख उत्तर देण्याची जबाबदारी पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आहे. त्याचप्रमाणे मोदी सरकार तसेच राज्यातील फडणवीस सरकारने विविध समाजघटकांसाठी राबविलेल्या योजना, घेतलेले निर्णयही जनतेपर्यंत पोहचविले पाहिजेत, असेही नड्डा म्हणाले.
विधानसभेला सामोरे जाताना बूथप्रमुख ते पन्नाप्रमुख यांची जबाबदारी खूप मोठी आहे. कलम 370 हटविणे, शेतकर्यांच्या हिताचे घेतलेले निर्णय, राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर केलेले विविध प्रकारचे यशस्वी करार, सर्जिकल स्ट्राइक, तलाक पद्धतीत केलेले योग्य बदल याबाबत मतदारांमध्ये जागरूकता करणे आणि राज्य शासनाने केलेले भ्रष्टाचारमुक्त काम जोरदारपणे सामान्य जनतेपर्यंत गेले पाहिजे. त्याचबरोबर शक्तिकेंद्र प्रमुखांनी आपली बूथ रचना केली आहे का? देशात, राज्यात काय घडते ते बघू नका. आपल्या गावात, बूथवर, शहरात, तालुक्यात लक्ष ठेवा. त्याचप्रमाणे नमो अॅप डाऊनलोड करा. पंतप्रधानांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह सुरू आहे. त्यात काहीतरी योगदान द्या. मतदार याद्या छाननी करा, अशा महत्त्वपूर्ण सूचना नड्डा यांनी केल्या.
ऑनलाईन सदस्य नोंदणी चालूच ठेवा आणि तालुक्यातील संघटन परिपूर्ण करून प्रत्येेक मंडळ, समिती व सर्व मोर्चा, आघाड्या पदाधिकार्यांनी ते तपासून घ्या. या निवडणुकीत मोठे यश मिळविण्याची संधी आहे. म्हणून मतभेद बाजूला सारून एकदिलाने काम करा, असे नड्डा यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper