Breaking News

‘पीएमसी’वर निर्बंध; पनवेल शाखेत ग्राहकांची गर्दी

पनवेल ः रामप्रहर वृत्त

मुंबईस्थित पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून 23 सप्टेंबरपासून सहा महिन्यांसाठी आर्थिक निर्बंध लादण्यात आले आहेत.  त्यामुळे मंगळवारपासून पीएमसी बँकेच्या सर्व शाखांचे तसेच ऑनलाइन व्यवहार ठप्प झाले आहेत. यामुळे पीएमसीच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्राहकांनी बँकेच्या पनवेल शाखेसमोर मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. पीएमसी बँकेच्या व्यवहारात अनियमितता आढळून आल्याने बँकिंग नियमन कायदा 35 अ अंतर्गत पीएमसी बँकेवर सहा महिन्यांचे निर्बंध घालण्यात आले आहेत. पीएमसी बँकेवर नवी कर्ज देणे, ठेवी स्वीकारण्यासह अनेक गोष्टींवर निर्बंध असतील. तसेच निर्बंधाच्या काळात बँकेच्या ठेवीदारांना आपल्या सर्व प्रकारच्या खात्यांमधून केवळ एक हजार रुपयेच काढता येतील. रिझर्व्ह बँकेच्या मान्यतेशिवाय कोणतेही नवे कर्ज देऊ नये, जुन्या कर्जांचे नूतनीकरण करू नये, बँकेने कोणतीही गुंतवणूक करू नये, तसेच नव्या ठेवी स्वीकारू नयेत किंवा बँकेची देणी फेडण्यासाठी देयक अदा करू नयेत, अशाप्रकारचे निर्बंध बँकेवर असतील, असे आरबीआयकडून स्पष्ट करण्यात आले आहे. हे निर्बंध सहा महिन्यांसाठी लागू असतील व त्याचा पुन्हा आढावा घेतला जाईल. या निर्बंधांची माहिती बँकेने प्रत्येक ठेवीदाराला देणे बंधनकारक आहे, अशी माहिती रिझर्व्ह बँकेकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आरबीआयने निर्बंध लादल्याचे समजल्यापासून पीएमसीच्या ठेवीदारांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. पनवेल येथील पीएमसी बँकेच्या शाखेसमोर ग्राहकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply