दादासाहेब फाळके पुरस्कार त्याला खूपच आधी मिळायला हवा होता, असेही आता अनेकांनी म्हटले आहे. हा पुरस्कार बुहदा निवृत्त बुजुर्गांना दिला जातो. तो तर आजही तरुणांना लाजवील इतके काम करतो आहे. कुठलाही पुरस्कार लहानच वाटावा इतकी अफाट, अचाट लोकप्रियता आणि कर्तबगारीची उंची त्याने कमावली आहे याची जाणीव या पुरस्काराच्या निमित्ताने त्याचे अभिनंदन करताना म्हणूनच ठळकपणाने असते. चित्रपटसृष्टीतील अमूल्य योगदानाबद्दल दिला जाणारा, अतिशय मानाचा ‘दादासाहेब फाळके पुरस्कार’ यंदा हिंदी चित्रपटसृष्टीतील एकमेवाद्वितीय सुपरस्टार अमिताभ बच्चन यांना दिला जाणार असून त्यांची निवड एकमताने करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी मंगळवारी केली. यातील एकमताने हा शब्द लक्ष वेधून घेणारा होता. त्याच्या नावाची निवड एकमताने व्हावी हे स्वाभाविकच नव्हे का? म्हणजे अगदी एनकेन कारणाने अमिताभ बच्चन हे नाव अनेकदा लहानमोठ्या वादांत ओढले गेले असले तरीही… निव्वळ अभिनय, अदाकारी, अफाट, व्यापक कामगिरी, प्रदीर्घ काळ टिकलेला प्रभाव, पुढील पिढ्यांना प्रेरित करण्याची क्षमता आणि या सार्यांपेक्षाही कितीतरी अधिक असलेली आणि आजही देशाच्या कानाकोपर्यातील लाखो-करोडो भारतीयांना कमालीची भावणारी व्यक्तिमत्त्वाची अभिजातता… त्याच्या नावाला विरोध करण्याची टाप आहे कुणाची? चारचौघांत सहजपणे कमालीची अधिक वाटणारी उंची घेऊन अमिताभ बच्चन यांचा जन्म झाला होता, परंतु व्यक्तिमत्त्वाची उत्तुंगता गाठण्यात मात्र निश्चितच त्यांच्या वैयक्तिक परिश्रमांचा वाटा मोठा आहे. कारकीर्दीच्या सुरूवातीला बहुतेकांना पचवावे लागणारे नकार त्यालाही चुकले नाहीत. ज्याचा आवाज आज भारतातले शेंबडे पोरही सहज ओळखू शकते, त्या अमिताभ बच्चनला आकाशवाणीत कुणी नाकारले होते हे वास्तव जगजाहीर आहे. अर्थात पुढे त्याने ‘अँग्री यंग मॅन’च्या रूपात हिंदी चित्रपटसृष्टी काबीज करून सुपरस्टार पद पटकावले हा इतिहास झाला. जंजीर, शोले, दीवार, त्रिशूल, मुकद्दर का सिकंदर आणि आणखीही कितीतरी चित्रपटांतील त्याचे संवाद दोन पिढ्यांना आजही सहज आठवतात. अर्थात त्यानंतर पडता काळ त्यालाही चुकला नाही. पण नव्याने पदार्पण केल्यावर पिकलेल्या दाढीकेसांतल्या रूपातही चीनी कम, पिकु, भूतनाथ, पा अशा एक ना अनेक चित्रपटांतून त्याने आपल्या कमालीच्या अदाकारीची चमक पुन्हा तितक्याच प्रभावीपणे दाखवली. आपले सुपरस्टार पद, अभिनयाची उंची आदींचा विचार न करता तो सूत्रसंचालकाच्या भूमिकेत ‘कौन बनेगा करोडपती’तून छोट्या पडद्यावर अवतरला आणि तिथेही त्याने नवा इतिहास रचला. आता आपल्या समोर होते, एक दिमाखदार, अदबशीर, भारतीयत्वाने परिपूर्ण असे अतिशय प्रभावशाली व्यक्तिमत्त्व. इथेही त्याची कामगिरी कुणालाही त्या दर्जाच्या आसपासही जाता येणार नाही अशाच थाटाची ठरली आहे. मग त्याची ‘केबीसी’, चित्रपट, पोलिओमुक्तीसारख्या सरकारी प्रचारमोहिमा आणि ढीगभर जाहिराती अशी एक नवीच इनिंग सुरू झाली. आता तो ब्लॉग लिहितो, ट्वीट करतो आणि त्याच्या या प्रत्येक गोष्टीला देशभरातून आणि परदेशातील भारतीयांकडूनही भरघोस प्रतिसाद मिळतो. या इथवरच्या वाटेवर अपयश, अपघात, आजारपण, वाद आणि घोटाळे यांचे खाचखळगे त्यानेही पुरेपूर अनुभवलेत. यशाची उत्तुंग उंची त्याने गाठल्याने छोटीशी चूकही त्याला माफ करायला तयार नसणारेही अनेक आहेत. तो या सार्याला आपल्या अभिजाततेने सतत तोंड देत असतो.
Check Also
सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान
सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …