Breaking News

राजमाता जिजाऊंच्या पुतळ्याची न उलगडलेली चोरी

राजमाता जिजाऊ माँसाहेबांचे ज्येष्ठ वद्य नवमीला बुधवार तिसर्‍या प्रहरी म्हणजेच 7 जून 1674 रोजी दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनानंतर माँसाहेबांच्या पाचाड येथील वाड्याजवळच छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांची समाधी बांधली. नंतरच्या काळात समाधी स्थळाकडे दुर्लक्ष झाले. समाधीसभोवताली असलेल्या संरक्षक भिंतीच्या दगडी चिरा कोसळल्या. समाधीची पडझड झाली. फलटणचे राजे श्रीमंत मालोजीराजे उर्फ नानासाहेब निंबाळकर व सौ. लक्ष्मीदेवी राणीसाहेब यांनी समाधीस्थळाचे जीर्णोध्दार बांधकाम सन 1944 साली पूर्ण करून घेतले. काम पूर्ण झाल्यानंतर सभोवताली भिंत उभारण्यात आली. यानंतर वन विभागामार्फत सभोवताली झाडे लावण्यात आली. बगीचा तयार करण्यात आला. केंद्र सरकारच्या पुरान वस्तू संशोधन विभागाच्या ताब्यात हे समाधीस्थळ असून राष्ट्रीय स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. समाधी सभोवतालची जमीन वन विभागाच्या ताब्यात असल्याने सर्व परिसर संरक्षित करण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधी स्थळावर पंचधातू पुतळ्याची स्थापना 10 वर्षांपूर्वी संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी केली असून सुरुवातीच्या काळात पुतळा एका लाकडी बैठकीवर बसविण्यात आला होता. ऊन-पावसामुळे बैठक कमकुवत झाल्याने महाडमधील शिवप्रेमी सुरेश पवार व कार्यकर्त्यांनी जिजाऊसाहेबांच्या पुतळ्यासाठी संगमरवरी बैठक तयार करून त्यावर पुतळ्याची स्थापना केली. तेव्हापासून आजमितीस पुतळा त्याच ठिकाणी होता. 9 ऑगस्ट रोजी संध्याकाळी पाचाड परिसरात तीन तास जोरदार पाऊस पडत असताना हा परिसर निर्मनुष्य झाला. ही संधी साधून अज्ञात समाजकंटकाने माँसाहेबांच्या पुतळ्याची चोरी केल्याचा संशय ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या राजमाता जिजाऊ यांच्या पुतळ्याची चोरी करणारा महाड परिसरातील नसावा. बाहेरून आलेल्या समाजकंटकाने हा निंदनीय प्रकार करून समाजामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सर्वत्र होत आहे. या घटनेचा पाचाडसह संपूर्ण महाड आणि पोलादपूर तालुक्यातील नागरिकांनी जाहीर निषेध व्यक्त केला.

पाचाडचे माजी सरपंच व समाजसेवक रघुवीर देशमुख यांनी याबाबत रायगडावर पर्यटकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.गेल्या कित्येक वर्षांत पाचाड परिसरामध्ये चोरीची घटना घडली नाही. पुतळा चोरण्याचे धाडस कोणीही करणार नाही. हा प्रकार बाहेरून येणार्‍या समाजकंटकाने केला असावा, असा कयास व्यक्त केला होता, तर पाचाड ग्रामस्थांनीही या घटनेचे कोणीही राजकीय भांडवल करू नये, असे आवाहन केले. यासंदर्भात महाड तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात भादंवि 389 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

महाडचे तत्कालीन आमदार माणिकराव जगताप यांनी सदर घटनेचा तीव्र शब्दांत निषेध करून घटनेची उच्चस्तरीय चौकशीची मागणी करणार असल्याचे सांगितले. माजी मंत्री प्रभाकर मोरे यांनीही ही घटना निषेधार्ह असल्याचे सांगितले होते. पाचाडचे तत्कालीन सरपंच राजेंद्र खातू, तंटामुक्त समितीचे तत्कालीन अध्यक्ष किरण पवार, तत्कालीन उपसरपंच सय्यद युनूस, मधुकर गायकवाड व पाचाड पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधी स्थळाची विधिवत पूजा केली. दिवसभर या घटनेच्या निषेधार्थ पाचाड बंदचे आवाहन करण्यात आले. या आवाहनाला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या घटनेनंतर तब्बल 11 महिने पुतळ्याच्या शोधकार्यात सपशेल अपयश आले, मात्र या काळात काहींनी झटपट प्रसिध्दीसाठी चक्क प्लास्टिकचा पुतळा आणला, तर काहींनी पुतळ्याची देणगी देऊ केली. फलटणच्या निंबाळकर घराण्याकडून म्हणजेच राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या माहेराहून पुन्हा दुसर्‍यांदा पुतळा देण्याचा विचार पुढे आला, मात्र पाचाड ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन पुतळा उभारला. आता रायगडाचे जीर्णोध्दारपर्व सुरू झाले असून राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या राजवाड्यासाठीही तरतूद करण्यात आली आहे. पाचाडनजीक शिवसृष्टी उभारण्याचा घाट घातला जात आहे. रायगड महोत्सवाचे आयोजनही पाचाड येथे मोठ्या दिमाखात करण्यात आले, मात्र या सर्वांत एक चुटपुटणारी खंत प्रत्येकाला वाटली, ती म्हणजे राजमाता जिजाऊ माँसाहेबांच्या समाधीस्थळी नतमस्तक होणार्‍या प्रत्येकाला आता हा दुसरा पुतळा बसविण्यात आल्याची मनोमन जाणीव होतेय. तरीदेखील राजमाता जिजाऊंचा भग्नावस्थेतील राजवाडा, समाधीस्थळ आणि बगीचा पाचाडचे खास आकर्षण होण्यासाठी रायगडाचे

जीर्णोध्दारपर्व उपयुक्त ठरणार आहे. भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या युती सरकारने शिवप्रेमींच्या अस्मितेचा विषय म्हणून रायगड विकास प्राधिकरणाद्वारे 600 कोटींचा प्रकल्प हाती घेतला असून, कोकणातला हा एकमेव प्रकल्प असा आहे, जो कोणत्याही विरोधाविना सुरू आहे. त्यामुळे एक खंत जरी उरी कायम असली तरी शिवप्रेमींचा ऊर उचंबळून येईल अशी पुनर्निमिती नजीकच्या काळात दिसून येणार आहे.

– शैलेश पालकर

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply