Breaking News

पुण्यात काळरात्र

धरणप्रकल्प किंवा नदीचा प्रवाह यांच्यावर पावसाचा परिणाम कसा होतो याचा शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून त्या-त्या ठिकाणची संभाव्य पूररेषा निश्चित केली जाते. या पूररेषेच्या मर्यादेत मानवी वस्ती होऊ नये असे पूररेषेचे नियम बजावून सांगतात. परंतु गेल्या काही वर्षांत पूररेषेचे सारे नियम सरसकट धाब्यावर बसवून वारेमाप बांधकामे झाली आहेत आणि होत आहेत.

परतीच्या पावसाची प्रतीक्षा करणार्‍या पुणेकरांना अचानक बुधवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश पावसाच्या मार्‍याला तोंड द्यावे लागले. हाती आलेल्या प्राथमिक माहितीनुसार या आकस्मिक पुरात 14 जणांचा बळी गेला असून 9 जण बेपत्ता आहेत. पुणे शहर आणि आसपासच्या परिसरात या अकस्मात पावसाने उडालेल्या हाहाकाराने सगळेच हबकून गेले आहेत. वास्तविक घटस्थापनेच्या आसपास पर्जन्यमान कमी होईल आणि पाऊस परतीच्या वाटेला लागेल अशा अपेक्षेत सारेच होते. यंदा पावसाने महाराष्ट्रात दुहेरी थैमान घातले. अनेक ठिकाणी दोन-दोनदा महापूर आले तर मराठवाड्याचा परिसर मात्र कोरडाच्या कोरडाच राहिला. एकीकडे तिथे कित्येक ठिकाणी ऐन पावसाळ्यात टँकरने पाणीपुरवठा करावा लागत असताना मुंबई-पुण्यासारख्या शहरी भागांमध्ये मात्र अधूनमधून सारखेच दैनंदिन जीवनमान पावसाने धारेवर धरल्यासारखे झाले होते. परंतु पुण्यात बुधवारी रात्री जे काही घडले त्याची तुलना एखाद्या भूकंपानंतरच्या परिस्थितीशी करता येईल. अवघ्या दोन तासांत तिथे जे काही घडले ते अस्मानी सुलतानीच्या पलीकडचे होते. बिबवेवाडीपासून कोंढवा आदी पुण्यालगतची उपनगरे या पावसाच्या कचाट्यात सापडलीच, पण कर्वे रोड, सहकारनगरसारखे मध्यवर्ती शहरी भाग देखील यातून सुटले नाहीत. अशा घटनेला इंग्रजीत ‘फ्लॅश फ्लड’ म्हटले जाते. म्हणजे कमीत कमी वेळेत ढग फुटल्याप्रमाणे जास्तीत जास्त पाऊस एखाद्या परिसरातच कोसळतो. गेल्या दोन दशकांत जागतिक वातावरण बदलांमुळे अशा प्रकारच्या अकस्मात पुरांच्या घटना अनेक देशांमध्ये घडताना दिसल्या आहेत. सगळीकडेच अचाट वेगाने होत चाललेले नागरीकरण, पर्यावरणाची हानी आणि तापमानवाढ असे असंख्य घटक त्याला जबाबदार आहेत. शहरांमध्ये येणार्‍या लोंढ्यांना सामावून घेण्याची क्षमता केव्हाच संपुष्टात आली आहे. हे फक्त मुंबईपुरतेच मर्यादित नसून पुणे आणि नाशिकला देखील लागू आहे. वाढत्या वस्तीबरोबर नागरी सुविधा देखील पुरवणे हे नगरप्रशासनाचे काम असते. तथापि गेल्या 70 वर्षांतील नगर प्रशासनांच्या दिव्य कारभारामुळे या शहरांची काय वाट लागली हे सारे दिसतेच आहे. त्यामुळेच आज अकस्मात आलेल्या पुराला तोंड देताना या नागरी वस्त्या हताशपणाचा अनुभव घेत आहेत. हे पाप कुणाचे? पुण्यात बुधवारी रात्री जे घडले, ते मुंबई व आसपासच्या परिसरात कधीही घडू शकते अशी परिस्थिती आहे. नागरी वस्त्यांचा अमर्याद विस्तार, वाढते काँक्रिटायझेशन, नद्यांचे गळे आवळले जाणे, वातावरण बदल सारे सारे मानवनिर्मित आहे. अख्ख्या पृथ्वीतलावर त्याच्या परिणामांची धग एव्हाना ठळकपणे जाणवू लागली आहे. त्याचवेळी नवी मुंबईसारख्या नियोजनबद्ध शहरांना मात्र तुलनेने रचनात्मक संरक्षण लाभल्यासारखेही दिसून येते. पर्यावरणावरील संभाव्य परिणाम लक्षात न घेता, दूरदृष्टी न राखता केलेला नियोजनशून्य विकास मानव जातीच्या मुळावर येणार हे आता स्पष्ट झाले आहे. यापुढे सगळ्यांनाच आणखी चुका होऊ न देता प्रत्येक पाऊल जपून टाकावे लागणार आहे.

Check Also

रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये प्रदर्शन; रोबोट आकर्षण

खारघर ः रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये …

Leave a Reply