Breaking News

अलिबाग मतदारसंघात शेकापची कसोटी

निवडणूक आयोगाने 2019च्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आणि निवडणुकीची वातावरणनिर्मिती सर्वत्र झाल्याचे पाहायला मिळाले. कोण उमेदवार असेल याची चर्चा सध्या रंगत आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघात मनसे वगळता अजूनही कोणत्याच पक्षाने आपला अधिकृत उमेदवार जाहीर केला नाही. तरीदेखील संभाव्य उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. अलिबाग विधानसभा मतदारसंघातील मागील काही वर्षांमध्ये बदललेल्या राजकीय परिस्थितीचा विचार करता  अलिबाग विधानसभा मतदारसंघात शेकापची कसोटी लागणार आहे. हा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखण्यासाठी शेकापला खूपच मेहनत घ्यावी लागणार आहे.

2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत शेकापचे पंडित पाटील निवडून आले होते. शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी त्यांना चांगली लढत दिली होती. दळवींना दोन नंबरची मते मिळाली होती. काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर तिसर्‍या क्रमांकावर फेकले गेले होते. भाजपचे प्रकाश काठे व राष्ट्रवादीचे अ‍ॅड. महेश मोहिते हे उमेदवार होते. या वेळी कोणत्याही पक्षाने अद्याप उमेदवार जाहीर केले नाहीत. मनसेने महेश कुन्नुमल यांना उमेदवारी जाहीर केली आहे. शिवसेना-भाजप युती होण्याचे संकेत मिळत आहेत. युती न झाल्यास 2014 प्रमाणेच चौरंगी लढत होण्याची शक्यता आहे. शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस अशी आघाडी झाली आहे. शेकापचे पंडित पाटील यांनी आपला प्रचार सुरू केला आहे. आघाडी असली तरी काँगे्रसचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे पुत्र राजा ठाकूर यांनीदेखील प्रचार सुरू केला आहे. शिवसेनेकडून महेंद्र दळवी तसेच रायगड जिल्हा परिषदेतील विरोधी पक्षनेते सुरेंद्र म्हात्रे हे दोघे इच्छुक आहेत. भाजपचे अ‍ॅड. महेश मोहिते यांनीदेखील तयारी सुरू केली आहे. पक्षाने उमेदवारी जाहीर केलेली नसली तरी इच्छुक उमेदवारांनी आपला प्रचार सुरू केला आहे. बॅनरबाजी यापूर्वीच सुरू झाली आहे.

लोकसभा निवडणुकीतच विधानसभेच्या निवडणुकीची मोर्चेबांधणी सुरू झाली होती, परंतु युती होते की नाही यावर घोडं अडलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या अधिसूचनेनंतर उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 4 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे. पितृपक्ष 28 सप्टेंबरला संपत आहे. 29 सप्टेंबरला घटस्थापना आहे. त्यामुळे मुहूर्त साधूनच खर्‍या अर्थाने उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होईल आणि युतीचे भिजत पडलेले घोंगडेही तोवर मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. युतीचे काय होते याकडे लक्ष लागले आहे. पितृपक्ष संपल्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट होईल.

अलिबाग विधानसभा मतदारसंघ हा शेकापचा बालेकिल्ला आहे. विधानसभेचे माजी विरोधी पक्षनेते स्व. अ‍ॅड. दत्ता पाटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील या मतदारसंघातून निवडून गेल्या आहेत. 2014 साली पंडित पाटील हे या मतदारसंघातून निवडून आले. 2005 साली काँग्रेसचे मधुकर ठाकूर येथून विजयी झाले होते. हा मतदारसंघ शेकापचा बालेकिल्ला असला तरी मागील काही वर्षांपासून या मतदारसंघातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी अलिबाग तालुक्यातील 25 ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या. त्यातील 20 ग्रामपंचायतींवर शेकापची सत्ता होती. पाच विरोधकांकडे होत्या. शेकापकडे 12 ग्रामपंचायती राखल्या. एक ग्रामपंचायत विरोधकांकडून खेचून घेतली. शेकापने एकूण 13 ग्रामपंचायती जिंकल्या, परंतु आठ ग्रामपंचायती गमावल्या. विरोधकांनी 12 ग्रामपंचायती जिंकल्या. एक गमावली, पण शेकापकडून आठ हिसकावून घेतल्या. आंबेपूर, चरी, बेलकडे, भिजली बोरघर, सुडकोली, पोयनाड, धोकवडे, रामराज, श्रीगाव, शहापूर, सहाण, वरंडे या ग्रामपंचायती शेकापने राखल्या. काँग्रेसकडे असलेली कावीर शेकापने जिंकली. बेलोशी, कुर्डूस, चिंचोटी, बामणगाव, आगरसुरे, सारळ या ग्रामपंचायतींवर काँग्रेसची सत्ता आली. कुसुंबळे, कुरकुंडी-कोलटेंबी, ताडवागळे, ढवर, थळ व चौल या ग्रामपंचायती शिवसेनेने जिंकल्या. अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागातील ग्रामपंचायती शेकापने गमावल्या. याचे कारण होते शेकापविरुद्धची नाराजी. सर्व पक्ष एकत्र येऊन त्यांनी शेकापविरुद्ध आघाडी केली. त्यामुळे शेकापला त्यांच्याच बालेकिल्ल्यात धक्का बसला होता.

लोकसभा निवडणुकीत शेकाप-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस अशी आघाडी झाली, परंतु काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना ही आघाडी नको होती. त्याचे परिणाम दिसले. हे तीनही पक्ष एकत्र येऊनदेखील अलिबाग विधानसभा मतदारसंघात खासदार सुनील तटकरे यांना 18 हजार मतांचीच आघाडी मिळाली होती. अलिबाग तालुक्यात अवघ्या चार हजार मतांचीच आघाडी मिळाली होती. या मतदारसंघात चणेरे हा रोहा तालुक्यातील जिल्हा परिषद मतदारसंघ आहे. लोकसभा निवडणुकीत सुनील तटकरे उमेदवार होते. त्यामुळे रोहा व मुरूड तालुक्यातील मते त्यांना मिळाली. विधानसभा निवडणुकीत उमेदवार बदलणार आहे. त्यामुळे जी मते सुनील तटकरे यांना मिळाली तेवढी मते शेकापच्या उमेदवाराला मिळतीलच असे नाही. रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे लोकांची नाराजी आहे. काँग्रेसचे राजा ठाकूर निवडणूक लढवणार आहेत. याचा फटका शेकापच्या उमेदवाराला बसेल. शिवसेना-भाजप यांची युती झाली नाही तर शेकापला थोडा फायदा होईल.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण व सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघात अनेक विकासकामे झाली आहेत. भाजपचे स्थानिक नेतेदेखील पक्षवाढीसाठी मेहनत घेत आहेत. या मतदारसंघात भाजपची ताकद नक्कीच वाढली आहे. त्यामुळे   शिवसेना आणि भाजप यांची युती झाली, तर अलिबाग विधानसभा मतदारसंघ आपल्याकडे कायम राखणे शेकापला जड जाईल.

-प्रकाश सोनवडेकर, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply