Breaking News

नेरळचे व्हिजन

नेरळ ग्रामपंचायतीमध्ये पुढील चार वर्षे काम करीत असताना मागील आठ महिने कोरोना काळात गेलेला वेळ आगामी काळात भरून काढण्यासाठी विकासकामांचे नियोजन रावजी शिंगवा आणि प्रथमेश मोरे यांनी केले आहे. ग्रामपंचायतीवर कितीही प्रसंग आले तरी सतत पुढील विचार करणारे सदस्य मंडळ यांनी आता आपल्यापुढे नेरळचे व्हिजन आखून ठेवले आहे. त्यात नेरळकरांना सर्वाधिक भेडसावणारा डम्पिंग ग्राऊंडचा प्रश्न निकाली काढताना प्रस्तावित डम्पिंग ग्राऊंडच्या बाजूला घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प आणि शेजारी प्रशस्त क्रीडा संकुल उभे करण्याचे उद्दिष्ट आहे. सध्या असलेल्या कचरा डेपोच्या 22 गुंठे जागेवर प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत उभी करण्याचे ग्रामपंचायतीचे धोरण असून त्याच ठिकाणी म्हणजे मुख्य रस्त्यालगत अग्निशमन केंद्रदेखील उभे करण्याचे नियोजन रावजी शिंगवा यांनी केले आहे. क्रीडा संकुलामध्ये आऊटडोअर आणि इनडोअर खेळांची व्यवस्था असावी असे नियोजन करण्यात आले आहे. गावातील सांडपाणी वाहून नेणार्‍या गटाराचे एमएमआरडीएकडून भुयारी गटार योजनेत रूपांतर करण्यात यावे यासाठी प्रयत्न सुरू असून नेरळ टॅक्सी स्टँड परिसरात मोठ्या नाल्याच्या सुरुवातीला गटारांमधून सांडपाणी नाल्यात सोडले जाते. तेथे मलनिस्सारण प्रकल्प उभा करून सांडपाण्यातील पाण्याव्यतिरिक्त असलेले घटक तेथेच थांबवून नाल्यात आणि पुढे उल्हास नदीमध्ये दूषित सांडपाणी जाणार नाही याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. टॅक्सी स्टँडजवळील पुलाजवळ हा प्रकल्प व्हावा असे व्हिजन नेरळ ग्रामपंचायतीने ठेवले आहे. नेरळ गाव शहरीकरणामध्ये बदलत असून नेरळमध्ये शासनाचे ग्रामीण रुग्णालय असावे यासाठी शासन दरबारी रावजी शिंगवा आणि प्रथमेश मोरे यांचे प्रयत्न सुरू आहेत.

1998मध्ये नेरळ गावासाठी राज्य सरकारने नळपाणी योजना केली. ती योजना 10 हजार लोकसंख्येसाठी होती, मात्र सध्या या योजनेमधून तब्बल 35 हजार लोकसंख्येला पाणी पुरवले जात आहे. त्यामुळे वाढीव नळपाणी योजनेसाठी ग्रामपंचायतीचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र त्याच वेळी नेरळ गावातील प्रत्येक घरात नळाचे पाणी पोहचावे यासाठी ’जलजीवन मिशन’अंतर्गत 15व्या वित्त आयोगातील निधी खर्च करण्याचे नियोजन केले आहे. त्याच वेळी मोहाचीवाडी, बोर्ले येथील पाण्याच्या साठवण टाक्या आणि जलशुद्धिकरण प्रकल्प तसेच पंप हाऊस यांची वेळोवेळी दुरुस्ती करावी लागत आहे. त्यामुळे नवीन पंप खरेदी करण्याचे नियोजन केले असताना नवीन वाढीव नळपाणी योजना शासनाने लवकरात लवकर मंजूर करावी यासाठी खासदार श्रीरंग बारणे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. नेरळ जरी ग्रामपंचायत असली तरी मोठी बाजारपेठ असल्याने गोळा होणारा कचरा संकलित करण्यासाठी वाहने कमी पडत असून आणखी दोन वाहने खरेदी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. त्यातील एक वाहन 15व्या वित्त आयोगातून खरेदी करण्यासाठी नऊ लाखांच्या खर्चास मंजुरी मिळावी आहे, तर दुसरा ट्रॅक्टर वाहन ग्रामनिधीमधून खरेदी केला जाणार आहे. त्यानंतर नेरळ ग्रामपंचायतीमध्ये नागरिक आणि ग्रामस्थ यांच्याकडून दररोजच्या कचर्‍याचे संकलन हे वर्गीकरण करूनच करण्याचे नियोजन आहे. घनकचरा व्यवस्थापन प्रकल्प सुरू होण्याआधी कचर्‍याचे वर्गीकरण बंधनकारक केले जाणार आहे.नेरळ ग्रामपंचायतीच्या मालकीच्या अनेक ठिकाणी जमिनी असून त्या जमिनींचे मोजमाप करून घेण्यावर भर देण्यात आला आहे.

ग्रामपंचायत मालकीच्या त्या सर्व जमिनी संरक्षित करण्याचे काम आम्ही करणार असल्याचा ठाम विश्वास सरपंच रावजी शिंगवा यांनी व्यक्त केला आहे. त्यातील काही जमिनींवर नेरळ ग्रामपंचायतीला महिला सक्षमीकरणासाठी महिला भवन उभे करून घ्यायचे आहे. त्याच वेळी तेथे महिला स्वयंसहाय्यता समूहांना त्यांनी तयार केलेला लघुउद्योगामधील मालाला बाजारपेठ मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे, तर एका मोठ्या मोकळ्या जागेवर सांस्कृतिक भवन उभे करून नेरळ गावातील कलावंतांना व्यासपीठ मिळवून देण्याचा प्रयत्न असणार आहे. बाजारपेठ भागात वाहनांसाठी वाहनतळ उभे करण्याचा प्रयत्न आहे. नेरळ संकुल प्राधिकरणाने मंजुरी दिल्यास नवीन भव्य वाहनतळ उभे राहणार आहे. नेरळ गावातील राजमाता जिजामाता तलाव परिसर आणि नेरळ ग्रामपंचायत कार्यालय येथे सुरू असलेले सुशोभीकरण पूर्ण करण्याचे नियोजन तयार आहे. त्याच वेळी हुतात्मा चौकाच्या पार्श्वभूमीवर नेरळ गावातील चौक हे जागा उपलब्ध असल्यास तेथे सुशोभीकरण करण्याचेदेखील नियोजन केले असून, राज्य शासनाकडून या सर्व कामांना भरीव मदत मिळावी म्हणून खासदार श्रीरंग आप्पा बारणे आणि आमदार महेंद्दशेठ थोरवे यांचे सहकार्य नेरळ ग्रामपंचायतला लाभत आहे.

कोरोना काळात उत्तुंग काम

नेरळ ग्रामपंचायत सर्व घटकांवर यशस्वी होत असताना जगात हैदोस घालत असलेली कोरोना महामारी आपल्या देशात आली. 23 मार्च 2020पासून सुरू झालेली संचारबंदी आणि त्यानंतर घेतलेल्या लॉकडाऊनच्या काळात नेरळ ग्रामपंचायत हद्दीमधील 80 टक्के म्हणजे साधारण 12 हजार कुटुंबांना घरोघरी जाऊन धान्य वाटप केले.प्रत्येक घरी जाऊन सॅनिटायझरच्या बाटल्या देण्याचे कामदेखील नेरळ ग्रामपंचायतीने केले आहे, मात्र त्या वेळी नेरळसारख्या 25 हजार लोकसंख्येच्या शहरीकरण झालेल्या गावात परिसर निर्जंतुक करण्यासाठी सरपंच रावजी शिंगवा आणि सदस्य प्रथमेश मोरे हे नाशिक येथे पोहचले आणि सॅनिटायझर गाडी खरेदी केली. त्या दिवसापासून नेरळ परिसर निर्जंतुक करण्याचे काम झाले आणि नेरळमध्ये कोरोनाबाबत जनजागृती होऊ लागली. त्यात नेरळ ग्रामपंचायतीचे कर्मचारी हे आरोग्य विभागाच्या सोबत कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण किंवा बाहेरून कोणताही ग्रामस्थ गावात पोहचला की ते त्या व्यक्तीच्या घरी पोहचून आपल्या जीवाची काळजी न करता कोरोना आणखी पसरू नये याची काळजी घेत होते. त्याचा परिणाम नेरळ ग्रामपंचायतीमधील अनेक कर्मचार्‍यांनादेखील कोरोनाने ग्रासले होते. त्या वेळी शासनाच्या आदेशाने दिवसातील काही वेळ भाजीपाला, फळे, दूध, किराणा माल यांची विक्री करण्याची परवानगी देण्यात आली. त्या वेळी नेरळ ग्रामपंचायत आणि नेरळ पोलीस ठाणे यांनी एकत्र बसून गावातील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात जीवनावश्यक वस्तूंची बाजारपेठ भरवण्याचा निर्णय घेतला. सोशल डिस्टन्स ठेवून भरवलेल्या या बाजारपेठेचे रायगड जिल्ह्यातील तत्कालीन पोलीसप्रमुख अनिल पारसकर यांनी कौतुक केले आणि हा नेरळ पॅटर्न देशातील विविध शहरांत आणि गावांत राबविला गेला. त्यामुळे हा प्रयोग करणारे नेरळ पोलीस ठाण्याचे तत्कालीन प्रभारी अधिकारी अविनाश पाटील यांचे पोलीस मॅगझीनमध्येदेखील कौतुक झाले आहे. नेरळ ग्रामपंचायतीचे सरपंच रावजी शिंगवा आणि ज्येष्ठ सदस्य प्रथमेश मोरे तसेच सर्व सदस्यांनी आपली नेरळ ग्रामपंचायतीची सर्व यंत्रणा छत्रपती शिवाजी महाराज मैदानात लावून सामाजिक अंतर राखून ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. साधारण साडेतीन महिने नेरळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदानात सोशल डिस्टन्स कायम ठेवून बाजार सुरू होता, परंतु त्याच वेळी या जीवनावश्यक वस्तूंसाठी बाजारात येणारा प्रत्येक व्यक्ती निर्जंतुक व्हावा यासाठी मैदानाबाहेर आणि नेरळमध्ये आणखी तीन ठिकाणी निर्जंतुक कक्ष उभे करण्याचे कामदेखील कोरोना काळात नेरळ ग्रामपंचायतीकडून करण्यात आले होते.

डिजिटल ग्रामपंचायत

नेरळ ग्रामपंचायत डिजिटल करण्यासाठी आम्ही कटिबद्ध असून ग्रामस्थांना घरात बसून कर भरता आला पाहिजे यासाठी डिजिटल ग्रामपंचायत करण्याचे नियोजन असल्याची माहिती सरपंच रावजी शिंगवा यांच्याकडून देण्यात येत आहे. त्यात पाणीपट्टी आणि घरपट्टी यांचे संकलन करण्यासाठी लागणारी यंत्रणा यांच्यावर अन्य जबाबदारी देऊन आर्थिक व्यवहारांत सुसूत्रता आणण्याचे काम नेरळ ग्रामपंचायतीकडून केले जाणार आहे. नेरळ ममदापूर संकुल प्राधिकरणाचे कार्यालय नेरळमध्ये व्हावे यासाठी आम्ही नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून पाठपुरावा करीत आहोत. येथे कार्यालय आल्यास सर्वसामान्यांचा त्रास कमी होणार आहे.

-संतोष पेरणे, खबरबात

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply