मोहोपाडा : प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असल्याने भाताची रोपे तयार झाली आहेत, भातशेती लागवडीची कामे शेतकर्यांनी हाती घेतल्याचे विहंगम दृश्य पाहायला मिळत आहे. खालापूर तालुक्यातील बहुतांशी परीसरामध्ये भातशेती लावणीच्या कामांना गती आली आहे. मात्र भातलावणी करण्यासाठी मजूर यांची कमतरता आहेच.
यावर्षी भातलागवडीचे प्रमाण अधिक आहे. शेतकरी विविध जातीची बियाणे पेरून अधिकाधिक उत्पादन घेण्याचा प्रयत्न करीत आहे. कृषी विभागाने शेताच्या बांधावर बियाणे दिल्याचे तालुका कृषी अधिकारी सुळ यांनी सांगितले. शेत मजूर मिळत नसल्याने काही शेतकर्यांच्या जमिनी अजून लावणीच्या कामात मागे आहेत, ज्यांच्या घरी जास्त माणसे व कोरोनामुळे घरी असणारे नोकरदार देखील कामास येत आहेत, एकंदरीत पुन्हा सामुदायिक शेतीचे दिवस दिसत आहेत, असाच सामुदायिकपणा राहिल्यास शेती ओस पडणार नसल्याचे कमलाकर काईनकर यांनी सांगितले.