अजितदादांना असलेले राजकीय भान शिवसेनेच्या नेत्यांना असते तर ही वेळच आली नसती. अर्थात अजितदादांनी भाजपासोबत जाणे विरोधकांना चांगलेच झोंबले आहे हे तर दिसतेच आहे. परंतु या सार्याचा सांगोपांग विचार करून अत्यंत समंजसपणे देवेंद्रजी आणि अजितदादा यांनी हातमिळवणी केली आहे. महाराष्ट्रात नवे ‘देवेंद्र पर्व’ सुरू होत आहे आणि त्याला अजितदादांची भरभक्कम साथ मिळाली आहे.
‘देर आए दुरुस्त आए’ या उक्तीनुसार थोड्याशा विलंबाने का होईना महाराष्ट्राच्या विकासाचे शिल्पकार देवेंद्र फडणवीस पुन्हा एकवार मुख्यमंत्री पदी विराजमान झाले आहेत. ‘मी पुन्हा येईन’ हे मराठी जनतेला दिलेले वचन त्यांनी पाळले आहे. शनिवारी पहाटे मंगलमय अशा रामप्रहरी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली ती खर्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाची आणखी एक पहाट असणार आहे. कारण विकासाचे वचन देऊनच फडणवीस सरकारने जनादेशाचा कौल मागितला होता व तो त्यांना मिळाला देखील. दुर्दैवाने खुर्चीच्या लालसेपायी मित्रपक्षाने विश्वासघात केल्यामुळे महाराष्ट्राच्या जनादेशाचा अपमान झालाच, पण ओल्या दुष्काळाच्या संकटाशी सामना करणारे शेतकरी बांधव देखील हवालदिल झाले आहेत. फडणवीस यांच्या पुनरागमनामुळे आता सारे मार्गी लागेल. महाराष्ट्राला एका स्थिर सरकारची आवश्यकता आहे, तीन पायांच्या शर्यतीची नव्हे. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाचे सामर्थ्यशाली सरकार सत्तेवर येऊ नये यासाठी विरोधकांनी कुठलीही कसर सोडली नाही. विरोधकांना जाऊन मिळालेल्या शिवसेनेने तर आपली सत्तेची भूक पहिल्यापासूनच उघडपणे दाखवली होती. परंतु आम्हाला जनादेश विरोधात बसण्याचा मिळाला आहे अशी वक्तव्ये करून, नंतर सत्तेची खुर्ची दिसताच लाळ गाळणार्या विरोधकांच्या ढोंगाचा बुरखा मात्र पुरता फाटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाने जनादेश आपल्या बाजूचा नाही हे आधी मान्य केले. परंतु शिवसेनेसारखे गिर्हाईक तावडीत सापडल्याबरोबर त्या दोन्ही पक्षांनी सत्ता काबीज करण्यासाठी हालचाली सुरू केल्या. हे वर्तन लोकशाहीच्या कुठल्याही नियमात बसणारे नाही. खुर्चीसाठी तीन पायांच्या शर्यतीत धावणार्या या कडबोळ्याला जनेतेने आधीच नाकारले होते. पुढेही ते नाकारलेच जातील. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांनी सत्तेच्या हव्यासापायी कोर्टाची पायरी देखील गाठली. परंतु तेथेही पदरात काहीही पडले नाही. हा सारा थयथयाट कशासाठी आहे हे महाराष्ट्रातील जनता जाणते. सर्वाधिक जागा मिळवणार्या भारतीय जनता पक्षाच्या साथीला राष्ट्रवादी काँग्रेसचे विधिमंडळ पक्ष नेते अजितदादा पवार आले. त्यामुळे नवे सरकार अधिकच सामर्थ्यशाली बनेल यात शंका नाही. कडबोळे सरकार स्थापण्याच्या विरोधकांच्या चर्चेच्या गुर्हाळाला कंटाळून अजितदादांनी ऐनवेळी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला याचे कुठलाही सुजाण नागरिक स्वागतच करील. कारण महाराष्ट्रातील शेतकरी आज कुठल्या परिस्थितीला तोंड देत आहे याचे भान अजितदादांना आहे म्हणून अजितदादांनी हे पाऊल उचलले असावे. याला खुर्चीचे नव्हे, संवेदनशील राजकारण म्हणतात. देवेंद्रजी आणि अजितदादांची ही नवी युती महाराष्ट्राच्या विकासाला आणि मराठी शेतकर्यांच्या वैभवाला वृद्धिंगत करणारी ठरेल यात शंका नाही. म्हणूनच आधी म्हटल्याप्रमाणे शनिवारी रामप्रहरी सुरू झालेले नवे ‘देवेंद्र पर्व’ महाराष्ट्रासाठी नवी पहाट घेऊन येणारे आहे.