Breaking News

पनवेलमध्ये भाजपची प्रचारात आघाडी; विरोधी पक्षाची उमेदवार शोधमोहीम; काँग्रेस, मनसेचा निर्णय नाही

पनवेल ः प्रतिनिधी

राज्यात विधानसभा निवडणूक 2019साठी पनवेल विधानसभा मतदारसंघात प्रचारात भाजपने आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे. त्यांचा उमेदवार ठरला आहे. सिडकोचे अध्यक्ष आणि विद्यमान आमदार प्रशांत ठाकूर. शेकाप आणि राष्ट्रवादी आघाडी मात्र घटिका भरत आली, तरी नवरदेव शोधताना दिसत आहेत. काँग्रेसने आघाडीत जायचे का स्वतंत्र लढायचे याचा निर्णय अद्याप झालेला नाही. बहुजन समाज पार्टी आपली वेगळी चूल मांडणार, मनसेच्या इंजिनाचा थांबा अद्याप ठरलेलाच नाही. शिवसेनेबरोबर राज्यात युती होवो अथवा ना होवो भाजपच्या प्रशांत ठाकूर यांनी कामाला सुरुवात केलेली दिसते.

लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळाल्याने आता महाराष्ट्रात होणार्‍या विधानसभा निवडणुकीकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. महाराष्ट्रातील कोकण विभागातील रायगड जिल्ह्यात असलेला 188 पनवेल विधानसभा मतदारसंघ म्हणजेच मुंबईच्या प्रवेशद्वारावर असलेला महत्त्वाचा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात पनवेल महापालिका आणि पनवेल तालुक्यातील काही जिल्हा परिषद मतदारसंघांचा समावेश होतो. या मतदारसंघातील मतदारांच्या संख्येचा विचार केला, तर राज्यातील मोठ्या संख्येने असलेल्या पहिल्या तीन मतदार संघात याचा समावेश होतो. या मतदारसंघात 2019मध्ये एकूण 5,54,464 मतदार आहेत. त्यामध्ये 2,97,272 पुरुष आणि  2,57,374 महिला मतदार आहेत. यामध्ये 4 ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार्‍या मतदार नोंदणी अभियानामुळे आणखी वाढ होणार आहे.

पनवेल विधानसभा मतदारसंघात 1962पासून 2004च्या निवडणुकीपर्यंत शेकापचे उमेदवार निवडून आले आहेत. त्यामध्ये 1962 ते 1972 आणि 1980 असे 4 वेळा दिनकर पाटील, 1978, 1985 आणि 1990 दत्तात्रय पाटील तीन वेळा, 1995, 1999 आणि 2004 विवेक पाटील तीन वेळा. त्यानंतर मात्र 2009 मध्ये प्रथमच शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव करून काँग्रेसचे उमेदवार म्हणून प्रशांत ठाकूर पहिल्यांदा निवडून आले. त्यानंतर 2014 मध्ये पुन्हा शेकापच्या बाळाराम पाटील यांचा पराभव करून ते भाजपमधून निवडून आले.

सन 2009मध्ये झालेल्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवार प्रशांत ठाकूर यांना 80,671 मते म्हणजे 49.11 टक्के, शेकापला 67,710 म्हणजेच 41.22 टक्के आणि मनसेला 8,818 मते म्हणजे 5.37 टक्के मते मिळाली. प्रशांत ठाकूर 12,961 मतांनी निवडून आले. त्यानंतर 2014 मध्ये झालेल्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार प्रशांत ठाकूर यांना 1,25,142 मते म्हणजेच 44.16 टक्के, शेकापला 1,11,927 मते म्हणजे 39.50 टक्के, सेना 17,953 म्हणजे 6.34 टक्के आणि काँग्रेसला 9,269 मते म्हणजचे 3.27 टक्के मते मिळाली या वेळी शेकापची 1.72 टक्के मते कमी झालेली दिसून येतात. 2004च्या निवडणुकीत शेकापचे विवेक पाटील निवडून आले. त्या वेळी त्यांना  47.51 टक्के मते मिळाली होती. म्हणजेच त्यानंतर या मतदारसंघात शेकापची मते प्रत्येक निवडणुकीत कमी होत असलेली दिसत आहेत.

पनवेल विधानसभा मतदारसंघात वावंजे, नेरे, पाली देवद आणि पळस्पे जिल्हा परिषद मतदारसंघाचा काही भाग येतो. यामधील नेरे मतदारसंघात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्य भाजपचे आहेत, पण त्यानंतर झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपने चांगलीच मुसंडी मारली असून अनेक ग्रामपंचायतींवर वर्चस्व मिळवले आहे. पनवेल महापालिकेत 78 पैकी 51 सदस्य भाजपचे आहेत. आज शेकापच्या माजी नगरसेवकांसह काही नगरसेविकांच्या पतीने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. लोकसभा निवडणुकीत पनवेल विधानसभा निवडणुकीत युतीच्या श्रीरंग बारणेंना 52 हजार मतांची आघाडी मिळाली. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक ग्रामपंचायत सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नाने 2016मध्ये पनवेल महापालिका झाली.पनवेल महापालिका हद्दीत खारघर, कळंबोली, कामोठे आणि नवीन पनवेल या सिडको वसाहतीसह 29 गावांचा समावेश करण्यात आला. महापालिका निवडणुकीत भाजपने एक हाती सत्ता मिळवली. पनवेलच्या विकासाच्या प्रश्नांकडे आमदार प्रशांत ठाकूर स्वतः लक्ष घालताना दिसत आहेत. नागरिकांना मूलभूत सुविधा कशा मिळतील, यासाठी ते प्रयत्न करत आहेत. पनवेल महापालिका हद्दीत पाण्याचा तुटवडा निर्माण होत असल्याने त्यांनी शासनाकडून अमृतकुंभ योजना मंजूर करून आणली. त्याचे काम पूर्ण होण्यास कालावधी लागेल, पण योजना पूर्ण झाल्यावर पनवेलचा पाण्याचा प्रश्न कायमचा सुटेल. महापालिकेचे शासनाकडे प्रलंबित असलेले जीएसटी अनुदान मिळावे, यासाठी अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांबरोबर बैठका घेऊन अनुदानाचा प्रश्न मार्गी लावण्यात यश मिळवले आहे. नैना प्रकल्प, नवी मुंबई विमानतळ विस्थापितांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न आणि पनवेलमध्ये अद्ययावत उपजिल्हा रुग्णालय सुरू करण्यात आल्याने गरीब रुग्णांवर येथे उपचार होण्याची सोय झाली आहे.

सिडको अध्यक्ष झाल्यावर आमदार प्रशांत ठाकूर यांनी सिडकोच्या प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनातील तुमचा एक सहकारी येथे अध्यक्ष म्हणून बसत आहे. त्यामुळे सर्वांच्या अपेक्षा आहेत, त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी कालबद्ध पद्धतीने काम करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका भवनाच्या जागेपासून, सिडको वसाहतीतील पाणीपुरवठा, रस्ते, घनकचरा व्यवस्थापन समस्या, रोजबाजार, उद्यान, क्रीडांगण आणि समाज मंदिर यासाठी भूखंड यासारखे प्रश्न सिडकोच्या आडमुठेपणामुळे रखडले होते ते मार्गी लावले. सिडकोच्या घरांच्या पुनर्विकासाचा प्रश्न दीर्घकाल प्रलंबित होता तो पुनर्विकासाचा प्रश्न मार्गी लावला आहे, याचा फायदा त्यांना निवडणुकीत निश्चितच होईल.

पनवेलमध्ये शेकापक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली असली तरी काँग्रेस या आघाडीत सामील होणार की नाही, हे अद्याप स्पष्ट नाही. पनवेलचा ग्रामीण भाग हा शेकापक्षाचा एकेकाळी बालेकिल्ला होता. आज पाहिले तर ग्रामीण भागात शेकापक्षाची अवस्था बिकट झाली आहे. माजी आमदार विवेक पाटीलांच्या कर्नाळा मतदार संघासह इतर ठिकाणी  ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठ्या प्रमाणात विजय मिळाल्याने त्यांची मक्तेदारी मोडीत निघाली आहे. पनवेल मतदार संघात नोकरी धंद्यासाठी मोठ्या प्रमाणात स्थायिक झालेल्या कॉस्मोपोलिटिन समाजाची वस्ती वाढली आहे. हा समाज शेकापसारख्या प्रादेशिक पक्षाला मतदान करणे शक्य नसल्याचे अनेक निवडणुकीत दिसून आले आहे. नवीन मतदार होणारा तरूण वर्ग प्रादेशिक पक्षाला मतदान करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन भाजपलाच मतदान करेल. त्यामुळे प्रशांत ठाकूर यांच्या विरोधात शेकापक्षाला कोणाला उभे करावयाचे असा प्रश्न पडलेला दिसतोय.

भाजप हा शिस्तीने चालणारा पक्ष आहे. वर्षाचे 12 महिने 5 वर्षे काम करताना पक्षाचे शक्ती केंद्रप्रमुख आणि बूथ प्रमुख, त्यामध्ये 10 पन्ना प्रमुख आणि 6 बूथचा ग्रुप अशा संघटनात्मक पद्धतीने गावागावात जाऊन लोकांना शासनाच्या योजनांची माहिती दिली जाते. त्या योजना राबवण्याचे काम केले जाते. त्यामुळे शासनाचे निर्णय लोकांपर्यंत पोहचतात, याचा परिणाम म्हणून राज्यात झालेल्या नगरपालिका आणि ग्रामपंचायत निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळाले. पनवेलमध्ये आमदार प्रशांत ठाकूर स्वतः पक्षाच्या सगळ्या बैठकांना जातात, त्या गांभीर्याने घेतात. त्या ठिकाणी वेळेवर न येणार्‍याला समज दिली जाते. बैठक सुरू झाल्यावर दरवाजा बंद केला जातो. त्यामुळे कार्यकर्त्यांना शिस्त लागून कार्यकर्ते शिस्तबद्ध पद्धतीने आपले काम करताना दिसतात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात पाच वर्षात केलेली कामे आणि योजना याचा फायदा निश्चितच होणार आहे. पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी पनवेल तालुक्यात आणि महानगरपालिका हद्दीत अनेक शासकीय योजना राबवल्या, त्यासाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. विरोधी पक्षाकडे शरद पवार सोडले तर कोणी नेताच दिसत नाही. शेतमजूर, शेतकरी आणि कामगारांचा पक्ष म्हणवणारा शेकाप आज रायगडमध्ये विकासाला फक्त विरोध करण्याचे काम करीत आहे. त्यामुळे नवीन उद्योग जिल्ह्यात येत नसल्याने बेरोजगारी वाढत आहे. अशा वेळी या परिसरात जेएनपीटीच्या माध्यमातून दीड लाख नोकर्‍या उपलब्ध होणार आहेत. आज नवीन येणार्‍या उद्योगात कुशल कामगारांची गरज असल्याने त्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देण्यासाठी चांगू काना ठाकूर शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शिक्षणाची सोय उपलब्ध करण्याचा प्रयत्न माजी खासदार रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर करीत आहेत. त्याचा फायदा युती झाली नाही तरी भाजपला या निवडणुकीत नक्कीच होणार आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply