Breaking News

सहानुभूती मिळवण्यासाठी राष्ट्रवादीचा ‘इव्हेंट’

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची टीका

पुणे : प्रतिनिधी

अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) केवळ गुन्हा दाखल केला, तर त्याची सहानुभूती मिळविण्यासाठी राष्ट्रवादीने त्याचा इव्हेंट केला’, अशा शब्दांत भाजप प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर शुक्रवारी (दि. 27) टीका केली. पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात केंद्र आणि राज्य सरकारचा काडीमात्रही संबंध नाही, असेही त्यांनी निक्षून सांगितले.

बँक घोटाळा प्रकरणात स्वत:हून सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात चौकशीसाठी जाण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी तूर्त रद्द केला आहे. कायदा-सुव्यवस्था बिघडू नये म्हणून हा निर्णय घेतला असल्याचे पवार यांनी म्हटले होते. या पार्श्वभूमीवर भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली.

भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयाला काळे फासून निव्वळ प्रसिद्धी मिळविण्याचा प्रयत्न सुरू असून, सरकारने हस्तक्षेप केला असे वाटत असल्यास त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा मार्ग खुला आहे, असे पाटील यांनी सुनावले. काही वर्षांपूर्वी राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना अटक झाली, तेव्हा कोणी निदर्शनासाठी पुढे आल्याचे स्मरत नाही, असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.

राज्य सहकारी बँकेमधील घोटाळ्याच्या संदर्भातील चौकशीचे आदेश काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळात तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनीच दिले होते. त्या वेळी पवारांच्या शब्दावर चालणारे सरकारच राज्यात सत्तेत होते. या संपूर्ण प्रकरणात न्यायालयाने दिलेल्या निर्देशांनुसारच गुन्हा दाखल झाला असून, ईडीने त्यानुसारच कारवाई केली आहे. सरकारने यात आकसाने कोणतीही पावले उचललेली नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.

भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक गुरुवारी नवी दिल्लीत झाली. या बैठकीत युतीविषयी सविस्तर चर्चा झाली असून, युतीचा निर्णय अंतिम टप्प्यात आहे, असे संकेत पाटील यांनी दिले. येत्या काही दिवसांत युती झाल्याचा निर्णय जाहीर केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.

पूरस्थितीची पाहणी

दरम्यान, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी पुण्यातील पूरस्थितीची पाहणी केली. त्यांच्यासमवेत महापौर मुक्ता टिळक, स्थानिक आमदार माधुरी मिसाळ, तसेच भाजपचे नगरसेवक उपस्थित होते.

Check Also

पनवेल महापालिका क्षेत्रातील न्हावाशेवा टप्पा 3 पाणीपुरवठा योजनेची आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिका क्षेत्रातील शहरी आणि ग्रामीण भागांना पाणीपुरवठा करणार्‍या न्हावाशेवा टप्पा 3 …

Leave a Reply