माणगावात महासंकल्प अभियान बैठक उत्साहात
माणगाव : प्रतिनिधी
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची जागा या वेळेस शिवसेनेने मोठे मन करून भारतीय जनता पक्षाला सोडावी. भाजपच या मतदारसंघात परिवर्तन घडवू शकतो, असा विश्वास भाजपचे रायगड जिल्हा उपाध्यक्ष तथा श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनी शुक्रवारी (दि. 27) माणगाव येथे व्यक्त केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि रायगड जिल्हाध्यक्ष तसेच सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या आदेशानुसार शुक्रवारी माणगावातील कुणबी भवनात श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाची महासंकल्प अभियान बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात कृष्णा कोबनाक उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. युती होईल की नाही याचा विचार सोडून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन त्यांनी या वेळी केले. या मतदारसंघात भाजपच्या माध्यमातून दोन राष्ट्रीय महामार्गांची कामे, अनेक रस्त्यांची कामे, पिण्याच्या पाण्याच्या योजना आदी कामे झाली आहेत. त्याचा विचार करता श्रीवर्धन मतदारसंघात या वेळी भाजपला अनुकूल असे वातावरण आहे, असे कोबनाक म्हणाले. भाजपचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, श्रीवर्धन तालुकाध्यक्ष प्रशांत शिंदे, माणगाव तालुकाध्यक्ष संजयअप्पा ढवळे, म्हसळा तालुकाध्यक्ष शैलेश पटेल, तळा तालुकाध्यक्ष कैलास पायगुडे, माणगाव तालुका समन्वय समिती अध्यक्ष नाना महाळे, सरचिटणीस तुकाराम पाटील, योगेश सुळे, आत्माराम शेलार, संजय लोटणकर, प्रकाश रायकर, मंगेश शिगवण, रमेश लोखंडे, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष अमित घाग, मनोज भागवत, जिल्हा चिटणीस सरोज म्हशिलकर, महिला मोर्चा जिल्हा चिटणीस प्राजक्ता शुक्ला, श्रीवर्धन विधानसभा महिला मोर्चा अध्यक्ष हेमा मानकर, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ जयश्री भांड, माणगाव तालुका महिला मोर्चा अध्यक्ष यशोधरा गोडबोले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य मनोज गोगटे, मंगेश म्हशिलकर, चिटणीस विशाल गालांडे, महेश पाटील, मीना टिंगरे, मनीषा श्रीवर्धनकर, राजू मुंडे, शैलेश रावकर, शरद चव्हाण, अॅड. जयदीप तांबूटकर, प्रशांत सकपाळ, राकेश पवार यांच्यासह या बैठकीस जिल्हा, तालुका, मंडळ मोर्चा पदाधिकारी, शक्तिकेंद्रप्रमुख व बूथ अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते. या बैठकीनंतर कृष्णा कोबनाक यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पंडित दीनदयाळ यांच्या जन्मदिनाचे औचित्य साधून भाजपने नव महाराष्ट्राचे नऊ संकल्प घरोघरी पोहचविण्यासाठी महासंकल्प अभियान सुरू केले. या अभियानाबाबतची विस्तृत माहिती पक्षाच्या कार्यकर्त्यांना बैठकीत देण्यात आली, अशी माहिती त्यांनी पत्रकारांना दिली.