Breaking News

महाडमध्ये प्रशासनाची जोरदार तयारी

महाड मतदारसंघामध्ये एकही संवेदनशील मतदान केंद्र नाही -विठ्ठल इनामदार

महाड : प्रतिनिधी

राज्यातील विधानसभा निवडणुका जाहीर होताच मतदान शांततेत आणि विनाअडथळा पार पडण्यासाठी प्रशासन जोरदार तयारी करीत आहे. महाड विधानसभा मतदारसंघातदेखील जय्यत तयारी करण्यात आली असून, या विधानसभा मतदारसंघात एकही संवेदनशील मतदान केंद्र नसल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी विठ्ठल इनामदार यांनी सांगितले. महाड विधानसभा मतदारसंघात 2 लाख 83 हजार 324 मतदार असून नव्याने सुमारे 872 मतदारांची नोंदणी झाली आहे. यामध्ये पुरुष 1 लाख 41 हजार 230, तर स्त्रिया 1 लाख 42 हजार 93 इतक्या आहेत. लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीसाठी 379 मतदान केंद्र असणार आहेत, तसेच अतिवृष्टीमुळे पडझड झाल्याने 22 मतदान केंद्र दुसर्‍या इमारतीत स्थलांतरित केली आहेत, अशी माहिती विठ्ठल इनामदार यांनी दिली. महाड विधानसभा मतदारसंघात 61 झोन केले असून सुमारे 1800 कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. निवडणूक आचारसंहिता काळात स्थिर सर्वेक्षण पद्धतीचा वापर केला जाणार असून, यामध्ये वाहनांची तपासणी केली जाणार आहे. यासाठी महाडमध्ये 3, तर माणगाव व पोलादपूरकरिता 2 पथके तैनात केली आहेत. विविध पक्षांच्या सभा, प्रचार रॅली आदींवर व्हिडीओ चित्रण करणार्‍या पथकांची नजर असेल. प्रचाराकरिता उमेदवारास 28 लाखांची खर्च मर्यादा निवडणूक आयोगाने दिली. याबाबतही लेखाधिकारी पथक नेमण्यात आल्याची माहितीही इनामदार यांनी या वेळी दिली.

Check Also

आदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्तआदिवासी समाजाच्या विविध समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी …

Leave a Reply