पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील नियोजीत डोलवी औद्योगिक वसाहतीला स्थानिक शेतकर्यांचा विरोध असून, त्याबाबत लवकरच संबंधित मंत्री आणि अधिकार्याकडे बैठक लावून शेतकर्यांची भूमिका शासनाकडे मांडण्यात येईल, अशी ग्वाही पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी दिली.
डोलवी औद्योगिक वसाहतीसाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) मार्फत पेण तालुक्यातील काराव, गडब, डोलवी, वडखळ बोरी ग्रामपंचायत हद्दीतील जमिनी संपादित करण्यात येणार आहेत.
या भुसंपादनाला येथील शेतकर्यांचा विरोध असून, ही बाब शासन दरबारी मांडावी व हे भुसंपादन रद्द करावे या मागणीचे निवेदन स्थानिक शेतकर्यांनी आमदार रविशेठ पाटील यांना दिले. त्यावेळी आमदार पाटील यांनी, शेतकर्यांची भूमिका शासनाकडे मांडण्यात येईल, असे असे आश्वासन दिले.
काराव-गडब ग्रामपंचायतीचे उपसरपंच लक्ष्मण कोठेकर, माजी उपसरपंच तुळशिदास कोठेकर, संजय पाटील, सीताराम चवरकर, के. जी. म्हात्रे, प्रशांत म्हात्रे, प्रमोद पाटील, सदानंद ठाकूर, प्रकाश ठाकूर, प्रभाकर पाटील, प्रविण म्हात्रे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.