Breaking News

रायगडातील राजकीय जागर

महाराष्ट्रात होत असलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी अधिसूचना जाहीर झाल्याने या प्रक्रियेला प्रारंभ झाला आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील वातावरणही ढवळून निघत आहे. अर्ज दाखल झाल्यानंतर या रणसंग्रामाला वेग येईल. तत्पूर्वी जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांचा घेतलेला धांडोळा…

रायगड जिल्ह्याचे राजकारण राज्यात नेहमीच चर्चेचा विषय राहिलेला आहे. यंदा विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुकांनी तयारी केलेली आहे. यातील पनवेल मतदारसंघात सिडकोचे अध्यक्ष तथा भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर विजयाची हॅट्ट्रिक करण्यासाठी सज्ज झाले आहेत. उत्तुंग कार्याच्या जोरावर त्यांनी पनवेलमध्ये अढळ स्थान प्राप्त केले असल्याने विरोधकांकडून अद्याप उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नाही. शेकापच्या इतिहासात यापूर्वी असे कधी घडले नव्हते. यावरून आमदार ठाकूर यांच्या ताकदीचा अंदाज येतो. भाजप-शिवसेना युती झाली अथवा नाही झाली तरी मतदारसंख्येच्या दृष्टीने राज्यात सर्वात मोठा मतदारसंघ असलेल्या पनवेलचा निकाल स्पष्ट आहे.

औद्योगिकद़ृष्ट्या महत्त्वाच्या गणल्या जाणार्‍या उरण मतदारसंघात उरण तालुक्यासह पनवेल आणि खालापूर तालुक्याचा काही भाग येतो. गेल्या वेळी तेथे शिवसेनेचे मनोहर भोईर यांनी शेकापचे तत्कालीन आमदार विवेक पाटील यांचा अवघ्या 811 मतांनी पराभव केला होता. आजारपणातून सावरत पाटील यांनी पुन्हा निवडणूक लढविण्याचे जाहीर केले खरे, मात्र शेकापला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेत नाहीए. शेकापसह शिवसेना, काँगे्रस, राष्ट्रवादीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करीत आहेत. अशातच जेएनपीटीचे विश्वस्त व भाजपचे जिल्हा सरचिटणीस महेश बालदी यांनी आजी-माजी आमदारांना आव्हान दिले आहे. युती होवो अथवा न होवो, पण निवडणूक लढणारच असा चंग बालदी यांनी बांधल्याने उरणमध्ये तिरंगी लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

निसर्गसंपन्न आणि प्रदूषणमुक्त कर्जत हे मुंबई, पुण्यातील उच्चभू्रंचे ‘सेकंड होम’ म्हणून ओळखले जाते. तेथील हवामान थंड असले, तरी राजकीय वातावरण तापलेले असते. कर्जत तालुका आणि खालापूर तालुक्याचा बहुतांश भाग समाविष्ट असणार्‍या या मतदारसंघात 2014 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सुरेश लाड सलग दुसर्‍यांदा आणि एकूण तिसर्‍यांदा आमदार झाले. गेल्या वेळीही शिवसेनेत बंडखोरी झाली ज्याचा लाभ आमदार लाड यांना झाला, पण शिवसेनेने उमेदवारी नाकारल्याने शेकापच्या तिकिटावर निवडणूक लढविलेले महेंद्र थोरवे यांनी वैयक्तिक करिष्म्याच्या जोरावर विद्यमान आमदारांना जोरदार टक्कर दिली होती. या दोघांमध्ये 1900 मतांचा फरक राहिला, तर शिवसेनेचे उमेदवार हनुमंत पिंगळे तिसर्‍या स्थानी फेकले गेले. दरम्यान, थोरवे स्वगृही परतले आहेत. राष्ट्रवादीचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष सुरेश टोकरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला आहे. दुसरीकडे कर्जत मतदारसंघाचे तीनदा प्रतिनिधित्व केलेले शिवसेनेचे माजी आमदार देवेंद्र साटम यांनी ‘कमळ’ हाती घेतले आहे. त्यामुळे कर्जतमध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

पेणमध्ये पुन्हा एकदा शेकाप आमदार धैर्यशील पाटील आणि माजी मंत्री रविशेठ पाटील यांच्यात सामना रंगणार आहे. फरक फक्त एवढाच आहे की रविशेठ पाटील आता भाजपमध्ये आहेत. काँग्रेसच्या कुचकामी धोरणाला कंटाळून ते मध्यंतरी भाजपमध्ये दाखल झाले. त्यामुळे तेथे काँग्रेस कमकुवत होऊन भाजपला बळ मिळाले आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन हाती बांधणारे माजी आमदार अवधूत तटकरे श्रीवर्धनऐवजी पेण मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याची चर्चा आहे. शिवसेनेकडून माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते यांचे कट्टर समर्थक किशोर जैनही इच्छुक आहेत. असे असले तरी पेण व सुधागड तालुका आणि रोहे तालुक्याचा काही भाग मिळून बनलेल्या या मतदारसंघात खरी लढत पाटील विरुद्ध पाटील अशीच होईल, असे दिसते.

जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये शेकाप विरुद्ध अन्य पक्ष असा मुकाबला आहे.गतवेळेस शेकापचे सुभाष ऊर्फ पंडित पाटील या मतदारसंघातून निवडून आले होते. त्यांना शिवसेनेचे महेंद्र दळवी यांनी जबरदस्त लढत दिली, तर काँग्रेसचे माजी आमदार मधुकर ठाकूर तिसर्‍या क्रमांकावर राहिले. यंदा काँग्रेसकडून ठाकूर यांचे पुत्र राजा हे निवडणूक लढविण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रवादीतून भाजपमध्ये प्रवेशकर्ते झालेले अ‍ॅड. महेश मोहिते यांनी जोरदार तयारी केली आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर श्रीवर्धन मतदारसंघात उलथापालथ झाली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांचे पुतणे अवधूत तटकरे यांनी अलीकडेच आमदारकीचा राजीनामा देऊन शिवसेनेची वाट धरली. श्रीवर्धनमध्ये राष्ट्रवादीकडून यंदा सुनील तटकरे यांच्या कन्या जिल्हा परिषद अध्यक्ष आदिती रिंगणात उतरणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. अशा वेळी त्यांच्या विरोधात अवधूत उभे राहणार का, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल, कारण गेल्या वेळी ते शिवसेना उमेदवार रवींद्र मुंढे यांच्या विरोधात केवळ 77 मतांनी विजयी झाले होते. श्रीवर्धन, म्हसळा व तळा तालुका आणि माणगाव व रोहा तालुक्यातील काही भाग मिळून हा मतदारसंघ तयार झाला आहे. येथे भाजपचे कृष्णा कोबनाक यांनी मागील पाच वर्षे मोर्चेबांधणी केली आहे, तर काँग्रेसकडूनदेखील राष्ट्रवादीविरोधात उमेदवार दिला जाऊ शकतो.

रायगड जिल्ह्याचे दक्षिण टोक असलेल्या महाड मतदारसंघात आमदार भरत गोगावले शिवसेनेकडून मैदानात असणार असून, त्यांच्या विरोधात पुन्हा माजी आमदार, काँग्रेस नेते माणिक जगताप उभे ठाकतील. मागील दोन्ही निवडणुकांमध्ये गोगावलेंनी जगतापांना धूळ चारलेली आहे. जगताप आता काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. त्यांचा प्रभाव शहरी भागात आहे, तर आमदार गोगावलेंची ग्रामीण भागावर पकड दिसून येते. महाड व पोलादपूर तालुका आणि माणगाव तालुक्यातील काही भाग मिळून तयार झालेल्या या मतदारसंघात भाजपने पाय रोवले आहेत. तेथून माजी नगरसेवक बिपीन म्हामुणकर यांचे नाव चर्चेत आहे. जिल्ह्यातील शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस यांच्या आघाडीतील महाडची एकमेव जागा काँग्रेसच्या वाट्याला आहे, पण तेथे राष्ट्रवादीची मंडळी खासकरून सुनील तटकरे व त्यांचे समर्थक जगताप यांना मनापासून मदत करणार का,

हा खरा प्रश्न आहे.

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यात आघाडीचे अघोषित जागावाटप झाल्यानंतर भाजप-शिवसेना युतीच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यपातळीवर युतीबाबतचा निर्णय झाल्यानंतरच जिल्ह्यातील लढतींचे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. 4 ऑक्टोबर ही अर्ज भरण्याची अंतिम मुदत आहे. त्यामुळे लवकरच युतीसंदर्भात निर्णय अपेक्षित आहे. त्यानंतर उमेदवारीच्या रूपात इच्छुकांची राजकीय घटस्थापना होऊन जिल्ह्यात लोकशाहीच्या जागराला सुरुवात होईल.

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग आप्पा बारणे यांच्या प्रचाराची पनवेलमध्ये जोरदार मुसंडी

खासदार श्रीरंग बारणे पुन्हा एकदा खासदार होणार याची मतदारांकडून खात्री पनवेल:प्रतिनिधी  ३३ मावळ लोकसभा मतदार …

Leave a Reply