Breaking News

लोकल सेवा सुरू करा

  • विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची राज्य सरकारकडे मागणी
  • अन्यथा भाजपच्या वतीने आंदोलन करण्याचा इशारा

मुंबई ः प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट ओसरत असून राज्यात सर्वच जिल्ह्यांतील व्यवहार हळूहळू पूर्वपदावर येत आहेत. दुकाने, खासगी कार्यालये तसेच इतर सुविधा खुल्या झाल्या असल्या तरी उपनगरीय लोकल सेवा मात्र सर्वसामान्य नागरिकांसाठी अद्याप बंद आहे, परंतु कोरोनाचे दोन डोस घेतलेल्यांना उपनगरीय लोकल सेवा सुरू करण्याबाबत राज्य सरकारने आठवड्याभरात निर्णय घ्यावा; अन्यथा भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी बुधवारी (दि. 21) येथे दिला.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना दरेकर म्हणाले, कल्याण ते सीएसएमटीपर्यंतच्या 25 रुपयांच्या दैनंदिन उपनगरीय रेल्वे प्रवासाला एका व्यक्तीला 250 रुपयांहून अधिक खर्च होत आहे. डोंबिवली, ठाणे येथील लोकांना कामासाठी मुंबईत यायचे झाले तर रेल्वे सुविधा उपलब्ध नाही. सुमारे 700 ते 800 रुपये टॅक्सी व खासगी वाहनांसाठी जात असून त्यांना नाईलाजास्तव महागडा रस्ते प्रवास करावा लागत आहे. बसने प्रवास करायचा झाला तरी मर्यादित बस फेर्‍यांमुळे तीन ते चार तासांचा वेळ प्रवासात जात असल्याने  नागरिकांचे प्रवास हाल होत आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी तातडीने निर्णय घेऊन ज्यांचे लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत त्यांना रेल्वे सुविधा उपलब्ध करून द्यावी.
मुंबईतील कामगार, बाजारपेठांमध्ये राबणारा श्रमिक, मार्केटमधील दुकानदार आदी हातावर पोट असलेल्या वर्गासाठी उपनगरीय लोकल उपलब्ध नाही. यामुळे हा प्रवासीवर्ग अडचणीत आला आहे. महिन्याला 15-20 हजार रुपयांपेक्षा कमी उत्पन्न, त्यातच महागड्या प्रवासाचा भार यामुळे घर चालवायचे? मुलांचे शिक्षण करायचे, की प्रवास खर्च भागवयाचा असे अनेक प्रश्न त्यांच्यासमोर आहेत. त्यामुळे आठवड्याभरात जर राज्य सरकारकडून या संदर्भात परवानगी दिली गेली नाही तर भाजपच्या वतीने बोरिवली, दादर, सीएसटी, चर्चगेट आदी प्रमुख रेल्वेस्थानकांवर तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा या वेळी दरेकर यांनी दिला.
या पत्रकार परिषदेला भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी, मुंबई भाजपचे अध्यक्ष आमदार मंगलप्रभात लोढा आदी उपस्थित होते.

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply