Breaking News

पाठ्यपुस्तकातील हिरकणी मोठ्या पडद्यावर

मराठी, हिंदी चित्रपटसृष्टीत सध्या ऐतिहासिक चित्रपटांचा ट्रेंड आहे. ऐतिहासिक आणि चरित्रात्मक चित्रपटांची धूम आहे. एकापाठोपाठ एक या पठडीतीले चित्रपट येत आहेत. ऐतिहासिक चित्रपटांना रसिकांचा चांगला प्रतिसादही मिळत आहे. शिवराय, संभाजी, कोंडाजी फर्जंद यांच्यानंतर आता हिरकणीची गोष्ट मोठ्या पडद्यावर येत आहे.

हिरकणीची गोष्ट महाराष्ट्राला नवी नाही. सर्व जण शाळेत असताना मराठीच्या पाठ्यपुस्तकात ही कथा शिकले असतील. अभ्यासक्रमाला नसली, तरी प्रत्येकाने ही कथा ऐकलेली असेलच, यात शंका नाही. हिरकणी हे नाव जरी उच्चारले तरी अनेकांच्या डोळ्यांसमोर धाडसी आईचे चित्र उभे राहते. जी आपल्या बाळासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रायगडाचा खोल कडा उतरून खाली येते. इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातील धाडसी ‘हिरकणी’ची गोष्ट आता मोठ्या पडद्यावर अनुभवायला मिळणार याची उत्सुकता अनेकांमध्ये असणार यात शंका नाही. प्रेक्षकांना एकीकडे ‘हिरकणी’ सिनेमाविषयी उत्सुकता असताना ‘हिरकणी’ सिनेमाचे मुख्य पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले आहे. सोनाली कुलकर्णी हिरकणीची भूमिका साकारणार आहे. या चित्रपटातील कलाकारांची निवड कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुस्कर यांनी केली आहे. अन्य कलाकारांच्या नावाविषयी उत्सुकता असली, तरी कोकणातील कलाकारांना यात संधी देण्यात आली आहे. चिपळूणमधील साक्षी गांधी हिचीही यात भूमिका आहे. या चित्रपटातील शिवराज्याभिषेकावरील गीत नुकतेच प्रदर्शित झाले व यात साक्षीसह काही कलाकार दिसले. मराठीतील आघाडीचे सात कलाकारही यात दिसले.

प्रसाद ओक दिग्दर्शित आणि चिन्मय मांडलेकर लिखित ‘हिरकणी’चे नवीन पोस्टर नुकतेच पुण्यातील चतुःश्रृंगी मंदिर येथे प्रदर्शित करण्यात आले. या पोस्टरमधून प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी पाठ्यपुस्तकातील हिरकणीला रूपेरी पडद्यावर साकारणार आहे आणि सोनालीच्या माध्यमातून हिरकणीला मिळालेला चेहरा लोकांच्या नक्कीच कायमस्वरूपी स्मरणात राहील याची खात्री आहे. विशेष म्हणजे अभिनेते सचिन खेडेकर यांनी मोशन पोस्टरला आवाज दिला आहे. या पोस्टर प्रदर्शनाच्या वेळी हिरकणी ऊर्फ सोनाली कुलकर्णी, अमित खेडेकर, प्रसाद ओक, राजेश मापुस्कर, लॉरेन्स डिसुझा उपस्थित होते. ‘कच्चा लिंबू’ या चित्रपटानंतर प्रसाद ओक आता कोणत्या चित्रपटाची नवी निर्मिती करणार याची त्याच्या चाहत्यांना उत्सुकता होती. प्रसादने एक वेगळाच विषय घेऊन आता ती उत्सुकता प्रेक्षकांमध्ये वाढवली आहे. प्रसाद ओकला त्याच्या चाहत्यांनी नेहमीच प्रेम दिलं आहे आणि प्रसादनेही आजपर्यंत वेगवेगळ्या भूमिका साकारून आणि वेगळा विषय हाताळत दिग्दर्शन करत प्रेक्षकांना आनंद दिला आहे.

सोनाली कुलकर्णी हे नाव काही इंडस्ट्रीला नवीन नाही, पण या चित्रपटात सोनालीने नक्कीच वेगळ्या धाटणीची भूमिका स्वीकारून तिच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. सोनालीने अनेक मराठी चित्रपटातून वेगवेगळ्या भूमिका साकारल्या आहेत. आता हिरकणीच्या भूमिकेला सोनाली कसा न्याय देणार आणि हिरकणीची भूमिका सोनाली कशी वठवणार याची उत्सुकता नक्कीच चाहत्यांमध्ये शिगेला पोहचली आहे. सोनालीचा हा नवा अवतार प्रेक्षकांना भावतोय का हे लवकरच कळेल.

-योगेश बांडागळे (मो. क्र. 9923428838)

Check Also

कामोठ्यात शनिवारी ’मा. श्री. परेश ठाकूर केसरी’ भव्य कुस्त्यांचे जंगी सामने

पैलवान देवा थापा आणि नवीन चौहान यांची बिग शो मॅच होणार पनवेल ः रामप्रहर वृत्त …

Leave a Reply