पनवेल ः वार्ताहर
सन 1942 ते 45च्या कालावधीत पनवेल गावात प्लेगच्या साथीने थैमान घातले होते. या वेळी प्लेगच्या साथीला घाबरुन अनेकांनी पनवेल गाव सोडून अन्यत्र जाण्याचा निर्णय घेतला, परंतु पनवेलच्या जाखमाता देवीवर ज्यांची अपार श्रध्दा होती, असे भक्त देवीच्या मंदिर परिसरात देवीच्या कृपा छत्राखाली वास्तव्य करुन राहिले. त्यांच्यावर प्लेगच्या साथीचा कोणताही परीणाम झाला नाही. या दृष्टांतापासून जाखमाता देवीचे महात्म्य पनवेलच्या आजूबाजूच्या गावातून पोहचले. तेव्हापासून पनवेलचे जागृत देवस्थान व पनवेलकरांचे संकटापासून रक्षण करणारी जाखमाता देवी ही भक्तांची माता म्हणून ह्दयस्थानी अढळ झाली. या देवीच्या मंदिरात नवरात्र उत्सव मोठ्या भक्तीभावाने व जल्लोषात गेल्या अनेक वर्षांपासून साजरा केला जात आहे.
पनवेलची जागृत माता व पनवेलकरांचे संकटापासून रक्षण करणार्या देवीचे मूळ नाव हे जाखमाता असल्याची नोंद इतिहासात सापडते. नवसाला पावणारी व रोगराईपासून भक्तांचे रक्षण करणारी जाखमाता देवी असल्याची अपार श्रध्दा पनवेलवासीयांची आहे. या देवीचे पूजारी व जाखमाता मंदिराचे व्यवस्थापक देवीची पूजाअर्चा व देवीच्या मंदिराची सर्व कामे पाहतात. त्यांच्याकडून देवीबाबत भक्तांची असणारी श्रध्दा त्यांनी विशद केली. प्लेगच्या साथीपासून पनवेलकरांचे देवीने रक्षण केल्याने देवी जागृत असल्याची श्रध्दा पनवेलवासीयांची झाल्याने त्यांनी देवीची पालखीतून मिरवणूक काढली. त्या दिवसापासून देवीची दरवर्षी चैत्र महिन्यात पालखीचा सोहळा केला जातो. या सोहळ्यात पनवेलसह आजूबाजूच्या गावातील देवीचे भक्त सहभागी होतात. हा पालखी सोहळा रात्री 9 वाजल्यापासून सुरू केला जातो. तो संपूर्ण पनवेलमधून फिरुन पहाटेपर्यंत देवळात आणण्याची प्रथा गेल्या नऊ ते दहा दशकापासून सुरू आहे. या वेळी देहभान विसरुन भाविक पालखीच्या मिरवणुकीत भजन आरत्या व देवीचा जयजयकार करीत असतात. परंतु 21व्या शतकात कायद्याचे बंधन या पालखी सोहळ्याला लागल्याने पालखी पहाटेपर्यंतच फिरवली जात आहे. नवरात्र उस्तवात नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी होत असते. देवीला साडीचोळी नेसविणारे व ओटी भरणारे भाविक मोठ्या प्रमाणावर असल्याचे मंदिराचे पूजारी किसन भोपी सांगतात. नवविवाहित दापंत्यही प्रथम देवीच्या दर्शनासाठी येण्याचा प्रघात आहे. या देवीचा चैत्र महिन्यात निघणारा पालखी सोहळा व आश्विन महिन्यातील नवरात्रोत्सव हे दोन उत्सव दरवर्षी मोठ्या श्रध्देने व जल्लोषात साजरे केले जात आहेत. तसेच दर मंगळवारी व शुक्रवारी देवीची सामुदायीक आरती केली जाते. जाखमाता देवीच्या जुन्या आख्यायिका लक्ष्मीबाई लक्ष्मण भोपी यांनी किसन भोपी, यशवंत भोपी व रामचंद्र भोपी यांना सांगून ठेवल्या आहेत. त्यामध्ये देवीचे वाहन हे वाघ होते. देवी वाघावर बसून तेव्हाचे पनवेल म्हणजे आजच्या पनवेल गावातून फेरफटका मारुन गावाचे रक्षण करीत असे. देवीचा वाघ देवीच्या मंदिरात नित्यनेमाने येत असे. एकदा देवीच्या वाघाला देवळात जाण्यास विलंब झाल्याने तो गोंधळून गेला आणि नानासाहेब पुराणिकांच्या घरात शिरला. वाघाला पाहून लोक घाबरले. त्यावेळी जुन्या प्रांत कार्यालयासमोर राहणार्या टी. पी. श्रृंगारपुरे यांनी त्यांच्याकडील बंदुकीने गोळ्या घालून वाघाला ठार मारल्याचे सांगितले जाते.