

मागील काही दिवसांत वाहनांना आगी लागण्याच्या घटना चढ्या क्रमाने आहेत. यामध्ये जळणे, जाळणे आणि जाळून घेणे अशा घटना घडत असल्याने चिंतेचा विषय बनत आहे. मनुष्य व वित्तहानी होत असल्याने यावर चिंतन होण्याची आवश्यकता भासू लागली आहे. खालापुरात एका महिन्यात तब्बल सहा वाहने जळून खाक झाली. बीड जिल्ह्यातील कोळगाव गेवराई येथे काळीज पिळवटून टाकणारी घटना घडली.
परभणीमधील जाधव कुटुंब पुणे येथील लग्न समारंभ आटोपून मोटारकारने घरी परतत होते. ज्ञानेश्वर जाधव हे एका खाजगी व्यवस्थापनात अभियंते आहेत. त्यांच्याबरोबर त्यांची गरोदर पत्नी मनीषा व मुलगी लावण्या असा परिवार घरच्या ओढीने जात असता, दुर्दैवी घटना समोर येवून ठाकली. सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास कोळगावच्या सूर्य मंदिरसमोर जाधव यांची कार आली असता, बेदरकारपणे समोरून येणार्या जीप चालकाने जाधव यांच्या कारला जोरदार टक्कर मारली. कार व मोटारसायकल खड्ड्यात पडून दोनही वाहनांनी पेट घेतला. कारचे दरवाजे आतून बंद असल्याने कोणालाच बाहेर पडता येत नव्हते. उपस्थित ग्रामस्थांनी कारची समोरील काच फोडून ज्ञानेश्वर जाधव व त्यांची मुलगी लावण्या हिला जळत्या कारमधून बाहेर काढले तर ज्ञानेश्वर यांची गर्भवती पत्नी मनीषा पूर्ण भाजल्याने जागीच गतप्राण झाली होती. लावण्याला दवाखान्यात दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच तिनेही इहलोकी प्रयाण केले. या घटनेस जीपमधील सात तरुण जबाबदार असून मद्यधुंद अवस्थेत जीप चालवून समोरील वाहनाला ठोकर मारल्याचे तपासात निष्पन्न झाले. याच तरुणांनी लागलीच कारमधील जाधव दांपत्यांना मदत केली असती तर लावण्या व गर्भवती असणार्या मनीषा जाधवचे प्राण वाचले असते.
रविवार 11 मार्च 2019 रोजी नवी दिल्लीतील अक्षरधाम मंदिराजवळ चालत्या कारला लागलेल्या आगीत रंजना मिश्रा (35) व निवाली (दीड वर्ष) या मायलेकी दोघीही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या. मात्र उपेंद्र मिश्रा व त्यांची मुलगी रिध्दी हिला वाचविण्यात मदतकर्त्यांना यश आले होते. रविवारची सुट्टी घालविण्यासाठी उपेंद्र मिश्रा आपल्या पत्नी व मुलींसह कारने जात असता ही दुर्दैवी घटना घडली. भोपाळ येथे कार जळाल्याने भूषण मोहाडकर (22) या तरुण अभियंत्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. मागील आठवड्यात सातारा बंगलोर महामार्गावर मोटारकारने अचानक पेट घेतला, मात्र चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानाने 6 प्रवाशांचे प्राण बालंबाल वाचले. या घटना जिल्ह्या बाहेरच्या होत्या. रायगड जिल्ह्यातील खालापुरात मागील महिनाभरात तब्बल सहा वाहने जळून खाक झाली. 1 मे 2019 रोजी चौक-कर्जत मार्गावरील भिलवले गावच्या हद्दीत महागड्या गाडीच्या इंजिनाने अचानक पेट घेतला. काही क्षणांत ही गाडी जळून खाक झाली. या घटनेच्या तीन दिवस अगोदर द्रुतगती महामार्गावरील बोरघाटातील आडोशी बोगद्याजवळ कारच्या इंजिनाने पेट घेत पूर्ण कार जळून खाक झाली. या घटनेच्या आदल्या रात्री दीड वाजण्याच्या सुमारास बोरघाटातील माजिक पाईंटजवळ आगीत कार जळून खाक झाली होती. तर त्याच आठवड्यात जुन्या महामार्गावर बोरघाटातच सायमाळजवळ चाचणीसाठी आलेली नवीन कोरी कार भर उन्हात इंजिन गरम झाल्याने आगीच्या भक्षस्थानी पडली होती. खोपोली पाली मार्गावर झायलो गाडीने पेट घेत जळली होती. त्याच दिवशी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर रसायनी पोलिसांच्या हद्दीत कार जळून खाक झाली होती. वातावरणातील वाढते तापमान व वाहनचालक गाडीच्या इंजिनकडे करीत असलेले दुर्लक्ष या घटना वाहन जळण्यास कारणीभूत असले तरी गाडीला वेगवेगळ्या फिटिंग लावून घेणे,
कारमधील कुलंट ऑईल, इंधन भरण्याचे सामान, दररोज तपासणे आवश्यक आहे. तसेच प्रवासात असताना गाडीचे इंजिन जास्त गरम होणार नाही याची काळजी घेणे तसेच गाडीच्या डाश बोर्डवर आलेल्या सूचनांचे चालकाने पालन करून सुधारणा करणे किंवा गाडी बंद करणे आवश्यक आहे.
या झाल्या गाडी जळण्याच्या घटना. मात्र काही गाड्या जाळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. अशा घटना शक्यतो राजकीय वादातून घडत असल्याची माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात कोकण विशेषतः सिंधुदुर्ग जिल्ह्याचा गाड्या जाळण्याच्या गुन्ह्यांचा वरचा क्रमांक लागतो. राजकीय वादविवाद तळकोकणात पराकोटीच्या शिगेला पोहचले होते. या वादात विरोधी गटाचा वचपा काढण्याचा सहजसोपा उपाय म्हणजे रात्रीच्या अंधारात वाहनाला आग लावून देणे. त्यामध्ये वाहन जळून खाक झाला की विरोधकाला अद्दल घडविल्याचा पराकोटीचा आनंद घेतला जात असे. याच घटनांचे काही अंशी लोन नेरळ व कर्जतमध्ये पसरल्याचे पहावयास मिळाले. रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सुरेश टोकरे यांच्या गाडीला काही अज्ञातांनी आग लावून जाळून टाकली होती. तर कर्जतमध्येही सोसायटीच्या वादात उभ्या गाडीचे टायर जाळण्याचा प्रयत्न झाला. मात्र याची खबर लागताच गाडी मालकाने पाणी ओतून आग आटोक्यात आणली. या घटनांपेक्षा अगदी वेगळी घटना लातुरातील चोबली गावात 21 जानेवारी 2019 रोजी घडली. जन्मदात्या आईच्या मृत्यू वियोगाने घायाळ झालेल्या गजानन कोडलवाडे याने आईचे अंत्यसंस्कार झाले होते त्या ठिकाणी स्कार्पियो गाडी घेऊन जात गाडीला आतून लॉक करून डिझेल टाकून पेटवून दिले. या आगीत गाडीसह गजानन 100 टक्के जळून खाक झाला. यातील सत्य घटना किंवा कारणे काहीही असतील पण वाहन जाळणे, जळणे आणि जाळून घेणे या घटना चिंताजनक आहेत. मागील दोन वर्षांपूर्वी नाशिक, पुणे, ठाणे व रायगडातही समूहाने मोटरसायकली जाळण्यात आल्याच्या अनेक घटना घडल्या होत्या.
पोपट आणि पंची
सर्वच धर्मग्रंथात या गोष्टीचा उल्लेख केला आहे की जो माणूस गोडगोड बोलतो, तेव्हा त्याच्यावर विश्वास ठेवू नका, भविष्य सांगण्यासाठी व गोडगोड बोलण्यासाठी पोपटाला पाळला जातो. मात्र वन कायद्याने पोपट पाळणे किंवा पिंजर्यात ठेवणे तसेच भविष्य सांगण्यासाठी वापर करणे बंदी घालण्यात आली आहे. पोपटपंची करणे म्हणजे दुसर्याने पठविलेले, न समजता तसेच्या तसे दुसर्याला सांगणे किंवा शिकविणे यालाच पोपटपंची म्हणतात. शिकवलेले शब्द अर्थ न कळता उच्चारतो, निरर्थक बडबड करतो, त्यास पोपटपंची करून नकोस असाही सल्ला दिला जातो. तर पोपट होणे म्हणजे फजिती होणे. पोपटाला सर्वात जास्त प्रसिद्धी मिळवून दिली ती, लोकगीतकार आनंद व मिलिंद शिंदे या गायक बंधूंनी. 1987च्या आसपास आलेल्या शिंदे बंधूच्या जवा नवीन पोपट हा लागला मिठू मिठू बोलायला. या कॅसेटने रेकॉर्डब्रेक विक्री केली. महाराष्ट्रातील घराघरात हे गाणे वाजू लागले होते. तबल अर्धा दशकभर हे गाणे गायले जात होते. सर्वच भाषेत पोपटावर गाणी लिहिली गेली आहेत आणि ती हिट झाली आहेत. हिंदीत मेरे सिनेमे… की पिंजरे मे पोपट बोले हे गाणे काही काळ रसिकांच्या पसंतीचे होते. ओठावर गुणगुणले जात होते. मात्र 1990च्या नंतर मान टाकलेला पोपट लोकसभेच्या 2019च्या निवडणुकीत पुन्हा जिवंत केला गेला आणि पोपटावर विशेष चर्चा झडू लागली. प्रचाराचे मुद्दे होत सभा गाजू लागल्या. महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री जलसंपदा मंत्री व दुष्काळात तलावात पाणी नसताना, भरतीचे वादग्रस्त विधान करणारे अजित पवार यांना लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाच्या दोन दिवस अगोदर पत्रकारांनी निकालाचा अंदाज काय असेल असा सवाल केला तेव्हा अजित पवारांनी तलाव भरण्याच्या अपशब्दांचा वापर न करता संयमी शब्दात पोपटपंची केली. ती म्हणजे मी काही ज्योतिषी नाही की पोपट नाही भविष्य सांगायला. त्याआधी निवडणुकीच्या सभेत बा…. तिचा पोपट असल्याची संभावना एका नेत्याला करण्यात आली होती. त्यालाही प्रतिउत्तर देण्यात आले होते. 1990 नंतर नागरिकांनी खर्या अर्थाने पोपटाचे गुणगान ऐकले होते. एवढे दिवस विस्मृतीत गेलेला पोपट पुन्हा जिवंत झाला होता. महाराष्ट्राच्या सन 2019 ची लोकसभा निवडणूक पोपट या विषयावर कायम स्मरणात राहील यात शंका नाही. पोपटाचे 82 वंश असून 340च्या आसपास जाती आहेत. हिंदुस्थानात पाच ते सहा जाती आढळतात. पोपट हा पक्षी मुख्यत्वे शाकाहारी असून पेरू व मिरची हे खाद्य आहे. वयोमान सरासरी 40 वर्षाचे आहे. नर मादी सारख्याच असतात. पोपटाची हुशार पक्षांमध्ये गणना केली जाते. माणसाचा आवाज काढण्यात पटाईत असणारा पोपट मिठू मिठू असा आवाज काढतो. याच आवाजाची भुरळ पडल्याने पोपट पाळण्याची हौस केली जाते मात्र ती हौस आता घातक ठरणार असून पोपट पाळणार्या व्यक्तीस तीन महिने कैद व 25 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. मागील वर्षी टिटवाळा बाजारपेठेत भविष्य सांगण्यासाठी आणलेल्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेत भविष्य सांगणार्याचीच पोपटपंची केली होती. पोपटाला राजाश्रय असून राजा सिकंदर अलेक्झांडरचा पोपट आवडता पक्षी होता.
-अरूण नलावडे, फिरस्ती
RamPrahar – The Panvel Daily Paper