Breaking News

फुटपाथवरील दुचाकींवर कारवाईची मागणी

पनवेल : प्रतिनिधी

नवीन पनवेलमधील एचडीएफसी सर्कलकडून रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर कॉर्नरला दोन बँका आणि त्यांची एटीएम आहेत. तेथील फुटपाथवर दुचाकी वाहने मोठ्या प्रमाणात उभी केलेली असतात. त्यामुळे एटीएममध्ये जाणार्‍यांसह तेथून पलीकडे जाणार्‍या ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना त्रास होत आहे. याबाबत वाहतूक पोलिसांनी कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

पनवेलकडून नवीन पनवेलमध्ये पूल ओलांडून आल्यानंतर असणार्‍या सर्कलला अनेक बँक कार्यालये आहेत. रेल्वे स्टेशनकडे जाणार्‍या रस्त्यावर कॉर्नरला आयडीबीआय आणि पहिल्या मजल्यावर स्टेट बँक ऑफ इंडिया आहे. या बँकांची एटीएम तेथेच तळमजल्यावर आहेत. येथील संपूर्ण  फुटपाथवर दुचाकी वाहने उभी केलेली असतात. याठिकाणी सिग्नलवरून येणार्‍या गाड्या भरधाव वेगाने येत असल्याने त्याठिकाणी रस्त्यावरून चालणे म्हणजे अपघाताला आमंत्रणच आहे.

फुटपाथवर दुचाकी उभ्या असल्याने चालायला रस्ताच नसतो. अनेकवेळा स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएमच्या दरवाजातही दुचाकी उभ्या करून  ठेवलेल्या असतात. त्यामुळे एटीएममध्ये जाणे ग्राहकाला अवघड जाते. या अडचणीचा फायदा गुन्हेगार घेऊ शकतात. पैसे काढून बाहेर पडणार्‍या ज्येष्ठ नागरिकांना लुटण्याचा

धोका संभवतो.

याठिकाणी वाहतूक शाखा बाजूच्या गल्लीत उभ्या केलेल्या वाहनांवर नेहमी कारवाई करीत असते. या वेळी फुटपाथवर उभ्या केलेल्या दुचाकींवर मात्र कोणतीही कारवाई केली जात नाही. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांनी या फुटपाथवर उभ्या असलेल्या दुचाकींवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या विषयात गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे.

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply