Breaking News

प्रलंबित महाड-मढेघाट-पुणे मार्गाला हिरवा कंदील

आ. प्रवीण दरेकरांमुळे स्वप्न होणार साकार

महाड : महाडकरांसाठी दिवास्वप्न ठरलेल्या पुण्यासाठी जवळचा असलेला महाड-मढेघाट-पुणे या मार्गाच्या प्रलंबित प्रस्तावाला तत्काळ मान्यता देण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्या आहेत. आ. प्रवीण दरेकर यांनी केलेल्या मागणीनुसार गडकिल्ल्यांना जोडणार्‍या या मार्गाला पर्यटन मार्ग म्हणून विकसित करण्याबाबत सूचना मुख्य सचिवांना देण्यात आल्या आहेत. यामुळे महाडकरांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.

मुख्य शहरांना आणि महत्त्वाच्या ठिकाणांना जोडण्यासाठी जवळचे मार्ग निर्माण केले जातात, मात्र राकट आणि दणकट, बसॉल्ट या कठीण खडकापासून निर्माण झालेला आणि छातीचा कोट करून उभा असलेला सह्याद्री महाडच्या मार्ग विकासाच्या कामात मोठा अडथळा ठरत आहे. असाच एक मार्ग की जो महाडला पुण्याजवळ केवळ 96 किमीने जोडणारा आहे, मात्र आजपर्यंतच्या सरकारच्या काळात हा मार्ग विकसित होऊ शकला नाही. आजही महाड-मढेघाट-पुणे या मार्गाचा प्रस्ताव शासनदरबारी प्रलंबित आहे, मात्र फडणवीस सरकारच्या काळात प्रथमच या मार्गाच्या कामास चालना मिळाली आहे. स्वातंत्र्यानंतर गेली 70 वर्षांनंतर प्रथमच पुणे जिल्ह्यातील मौजे कर्णवडी गाव की जे भौगोलिकदृष्ट्या महाड तालुक्यात आहे, ते 2018मध्ये मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून जगाला जोडले गेले आहे. आज या गावाचा थेट संपर्क बिरवाडी आणि महाड तालुक्याशी झाल्यामुळे रोजगार-नोकरी आणि आरोग्यसेवेसाठी या गावातील लोकांना एक महत्त्वाची सोय झाली आहे. या मार्गावर महाड ते कर्णवडी अशी एसटी बससेवा सुरू व्हावी, अशी ग्रामस्थांची मागणी असल्याचे बबन पवार यांनी सांगितले आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन काळात आ. प्रवीण दरेकर आणि महाड भाजपाचे लोकसभा मीडिया सहप्रमुख महेश शिंदे यांनी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन महाड-मढेघाट-पुणे या मार्गाचा प्रलंबित प्रस्ताव आणि रचनेबाबत चर्चा केली. या प्रकरणी आ. प्रवीण दरेकर यांच्या सूचनेनुसार महेश शिंदे यांनी स्वतः प्रत्यक्ष या मार्गाचा महाड आणि पुणे या दोन्ही बाजूकडून केलेल्या सर्व्हेनुसार महाड-वाकी-राणवडी-कर्णवडी-मढेघाट-केळद-वेल्हे-पाबेघाट-खानापूर-डोंजेफाटा-पुणे अशी रचना केल्यास हा मार्ग केवळ 96 किमी एवढ्या कमी लांबीचा होणार असून सध्या अस्तित्वात असलेल्या महाड भोर आणि महाड ताम्हीणी मार्गापेक्षा 54 किमीने अंतर कमी होणार आहे. सद्यस्थितीत पुणे ते मौजे केळद जि. पुणे हा राज्यमार्ग अस्तित्वात आहे, तर महाड बाजूकडून महाड ते मौजे कर्णवडी जि. पुणे हा मार्ग अस्तित्वात आहे. मौजे कर्णवडी, जि. पुणे ते मौजे केळद, जि. पुणे यादरम्यान उभा असलेला कडा अर्थात रॉक फोडून 4 किमीचा घाट सेक्शन कटिंग करण्याचे काम बाकी आहे. या प्रकरणी सार्वजनिक बांधकाम विभाग पुणे यांनी सर्वेक्षण करून अंदाजे 234 कोटींच्या खर्चाचा प्रस्ताव सादर केला आहे, मात्र गेली दोन दशके हा प्रस्ताव शासन दरबारी धूळ खात पडला आहे. अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, दासबोध ग्रंथाचे जन्मस्थळ शिवथरघळ, पर्यटकांसाठी लोकप्रिय असलेला लक्ष्मी धबधबा, किल्ले तोरणा, किल्ले राजगड, किल्ले सिंहगड आणि सांस्कृतिक राजधानी पुणे ही महत्त्वाची पवित्र आणि पर्यटन स्थळे याच मार्गवर आहेत. त्यामुळे हा मार्ग पर्यटन मार्ग म्हणून विकसित होऊ शकतो, तसेच महाड औद्योगिक वसाहतीला या मार्गाचा मोठा फायदा होऊ शकतो, असे महेश शिंदे यांनी चंद्रकांत पाटील यांना निवेदनाद्वारे निदर्शनास आणून दिले. महाड भोर मार्ग हा अत्यंत खराब, अरुंद आणि धोकादायक बनला आहे. या मार्गावर सतत दरडी आणि मोठमोठे दगड कोसळत आहेत. त्यामुळे प्रवासी वाहतुकीसाठी महाड- भोर हा मार्ग अत्यंत धोकादायक ठरत आहे. महाड-मढेघाट-पुणे या मार्गासाठी महाड उत्पादक संघटना, महाड व्यापारी संघटना, महाड आणि वेल्हे तालुक्यातील विविध सामाजिक संघटना तसेच कर्णवडी, केळद ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. कोकणातील पर्यटनाला चालना देणे आणि गडकिल्ल्यांचे संवर्धन या फडणवीस सरकारच्या भूमिकेनुसार चंद्रकांत पाटील यांनी महाड-मढेघाट-पुणे मार्गाच्या आ. प्रवीण दरेकर यांच्या मागणीवर तत्काळ कारवाई करण्याच्या सूचना बांधकाम विभागाच्या मुख्य सचिवांना दिल्या आहेत. त्यामुळे लवकरच या मार्गाच्या प्रस्तावाला मान्यता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असून महाडकरांमधून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.

सदर मार्गामध्ये उफांड खिंडदरम्यान दीड हेक्टर जमीन फॉरेस्टची असून, लक्ष्मी धबधब्यापर्यंत 1700 मी. रस्त्याचे डांबरीकरण झाले आहे. केवळ 600 मी. उभा रॉक फोडून रस्ता होणे बाकी आहे. याचा प्राथमिक सर्व्हे झाला असून अंदाजपत्रकही अधीक्षक अभियंता पुणे यांना सादर केले आहे. आता केवळ डिटेल सर्व्हे होणे बाकी आहे. मढेघाट-केळद-पुणे मार्गाच्या या प्रस्तावाला मुख्य अभियंत्यांची मान्यता मिळाली असून पर्यटनाच्या दृष्टीने हा एक महत्त्वाचा मार्ग होऊ शकतो.

-अश्विनी घोडके, अभियंता उपविभाग,  सा.बां. वेल्हे, जि. पुणे.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply