Breaking News

आज घुमणार ‘हर हर महादेव’चा जयघोष

उरणच्या शिवमंदिरात महाशिवरात्रीचा उत्सव  

 विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

जेएनपीटी : उरण तालुक्यातील चिरनेर, जासई, कळंबुसरे, पिरकोण, आवरे, खोपटा, शेवा, देऊळवाडी (उरण शहर), केगाव, कोटगाव (रेल्वे स्टेशन), घारापुरी, करळ या गावांतील बारा शिवमंदिरे सध्या भाविकांची श्रध्दास्थान बनली आहेत. यावर्षी महाशिवरात्र उत्सव हा सोमवारी (दि. 4) येत असल्याने तालुक्यातील ही शिवमंदिरे महाशिवरात्र उत्सवासाठी सज्ज झाली आहेत.उरण तालुक्यातील घारापुरी बेटावरील शिवाची  लिंग (पिंड) सोडली तर या तालुक्यातील काही देवस्थाने अत्यंत प्राचीन असून ही प्रसिध्दीअभावी दुर्लक्षित राहिली आहेत. असेच एक स्वयंभू देवस्थान चिरनेर येथे आहे.चिरनेरचे शंभू महादेवाचे देवस्थान 13व्या शतकातील असूनही त्याच्या प्राचीनतेची योग्य दखल प्रसारमाध्यमांनी, ग्रामस्थांनी न घेतल्याने हे देवस्थान प्रसिध्दीपासून दुर्लक्षित राहिले आहे. नवी मुंबई, पनवेलपासून 20 किमीवर आणि मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा येथून अवघ्या 10 किमीवर असलेले चिरनेर हे गाव 1930 सालच्या जंगल सत्याग्रहामुळे जगाच्या इतिहासात झळकलेले निसर्गरम्य गाव. या गावात असणार्‍या स्वयंभू महागणपतीच्या स्थानामुळे भाविकांचे तीर्थस्थळ, मात्र या गावात 13व्या शतकातील शंभू महादेवाचे स्वयंभू देवस्थान असूनही ते भाविकांच्या वर्दळीपासून दूर आहे.13व्या, 14व्या शतकात शैव पंथियांनी उत्तर भारत व महाराष्ट्रात महादेवाची अनेक मंदिरे उभी केली.देवगिरी सम्राट रामदेव राय यांच्या साम्राज्याचा अस्त झाल्यावर त्याचा वारस असणार्‍या भीम (बिंब) राजाने उत्तर कोकणात आपले साम्राज्य निर्माण केले.हा शिवभक्त राजा होता. त्या राजवटीत त्याने उत्तर कोकणात अनेक शिवमंदिरे उभारली. याच कालावधीत चिरनेरच्या शंभू महादेवाच्या मंदिराची निर्मिती झाल्याचे जुने नागरिक, इतिहासतज्ञ सांगत आहेत. हेमाडपंथीय घाटणीचे असलेलेे शंभू महादेव मंदिर पूर्ण पाषाणी व चौपाखी आहे. मंदिर पूर्वाभिमुखी असून मंदिराला एकच दरवाजा आहे.  दरवाज्याच्या दोन्ही बाजूला दरवान म्हणून गणपती व कार्तिक स्वामी यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर एकच पाषाणी कोरलेला नंदी आहे. मंदिरावर एक छोटा घुमट व त्याला वेटोळे घातलेला नाग आहे. छपरालगत चारी भिंतीवर दगडी पडदी आहेत. मंदिराच्या गाभार्‍यात शाळीग्राम पाषाणाची कोरीव पिंडी असून पाठीमागच्या भिंतीमध्ये पार्वतीची कोरीव मूर्ती आहे. मूर्तीची मोठ्या प्रमाणात झीज झाल्याने तिची प्राचीनता समजते. मंदिरालगत भव्य तलाव असून तलावाचे ज्या ज्या वेळी ग्रामस्थांनी खोदकाम केले तेव्हा तलावात शंकराच्या लहान-मोठ्या अनेक पिंड्या सापडल्या आहेत. या स्वयंभू महादेवाचे दर्शन घेऊन पूर्वी राजे व सरदार लढाईवर जात असत. पेशव्यांचे सरदार चिमाजी आप्पा यांनी वसईवर स्वारी करण्यापूर्वी त्यांच्यासोबत असलेल्या चिरनेर गावचे दोन शूरवीर आन ठाकूर व मान ठाकूर यांच्यासह या महादेवाचे दर्शन घेऊनच कूच केली. त्याच आन आणि मान ठाकूर यांनी स्वतःच्या प्राणांची आहुती देऊन वसईची स्वारी फत्ते केली. त्यांचे स्मारक आजही चिरनेरच्या पुरातन मंदिराजवळील दीपस्तंभाच्या रूपाने उभे आहे. चिरनेरचा शंभू महादेव नवसाला पावणारा व भक्तांच्या संकटात धावणारा आहे. महाशिवरात्रीला शंभू महादेवाचा उत्सव असतो. श्रावणी सोमवारी मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात. यावर्षी सोमवारी महाशिवरात्र उत्सव येत असल्याने भाविकांच्या दर्शनासाठी शंभू महादेवाची तालुक्यातील बारा शिवमंदिरे सज्ज झाली आहेत.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply