बीडच्या घटनेवर पंकजा मुंडेंचा संताप

गृहमंत्र्यांनी तत्काळ लक्ष घालण्याची केली मागणी

मुंबई : प्रतिनिधी

बीडमध्ये तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करुन नंतर जिवंत जाळण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपचारादरम्यान तरुणीचा मृत्यू झाला असून संताप व्यक्त केला जात आहे. जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तरुणीची प्राणज्योत मालवली. या घटनेवर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी संताप व्यक्त केला आहे. गृहमंत्र्यांनी तत्काळ याच्यात लक्ष घातले पाहिजे, अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली.

महाराष्ट्राला या घटना नवीन नाहीत, मुख्यमंत्री, गृहमंत्री यांनी यामध्ये लक्ष घातले पाहिजे. फक्त यासंबंधी बैठका न घेता माहिती घेऊन एक स्पेशल फोर्स प्रत्येक जिल्ह्यात विशिष्ट घटना हाताळण्यासाठी लावली पाहिजे, असे पंकजा मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे. खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा दिली जावी, अशी मागणी या वेळी त्यांनी केली आहे.

पंकजा मुंडे यांनी दिवाळीच्या दिवशी असे काही बोलावे लागणे दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. तसेच आपण स्वत: यासंबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री अनिल देशमुख आणि बीडच्या पोलीस महासंचालकांशी बोलणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे.

काय आहे प्रकरण

दिवाळीसाठी पुण्याहून गावी परतणार्‍या तरुणीवर अ‍ॅसिड हल्ला करून नंतर पेट्रोल टाकून जिवंत जळल्याची घटना येळंबघाट (ता. बीड) येथे घडली. गंभीररित्या भाजलेल्या तरुणीवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असताना रविवारी पहाटे तिचा मृत्यू झाला. लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच तरुणीवर अशा प्रकारे निर्दयी कृत्य घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान याप्रकरणातील आरोपी व मयत तरुणी दोघे पुण्यात सोबत (लिव्ह इन रिलेशनशिप) राहत होते, अशी माहिती समोर आली आहे.

बीड तालुक्यातील येळंबघाट येथे शनिवारी रस्त्यालगत 22 वर्षीय तरुणी अर्धवट जळालेल्या अवस्थेत आढळून आली. शेळगाव (ता.देगलूर जि. नांदेड) येथील तरुणी गावातीलच एका तरुणासोबत गेल्या काही दिवसांपासून पुण्यात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होती. दि.13 नोव्हेंबर रोजी रात्री दोघेही पुण्याहुन गावी परतण्यासाठी दुचाकीवरून जात होते. पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास येळंबघाट (ता.बीड) परिसरात निर्मनुष्य ठिकाणी मांजरसुंबा-केज मुख्य रस्त्यावरून जात असताना तरुणाने दुचाकी थांबवली. तरुणीला रस्त्याच्या कडेला घेऊन तिच्यावर तरुणाने अ‍ॅसिड टाकले. त्यांनतर काही वेळाने त्याने पेट्रोल टाकून तिला पेटवून दिले.

तरुणीला पेटवून दिल्यानंतर आरोपी तरुण घटनास्थळावरून फरार झाला. अ‍ॅसिड हल्ला आणि पेट्रोलने 48 टक्के शरीर भाजले होते. अर्धवट भाजलेल्या अवस्थेत तरुणी तब्बल 12 तास रस्त्याशेजारी पडून होती. दुपारी 2 वाजता काही वाहनधारकांना आवाज आल्याने त्यांनी खड्यात पहिले असता अर्धवट जळालेल्या अवस्थेतील तरुणी दिसल्याने पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला असून अविनाश राजुरे या तरुणाविरुद्ध नेकनूर (ता. बीड) पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

Check Also

The member group is always indeed there to aid when needed

Partypoker are an extremely valued spouse for people. And greatest of all – the value …

Leave a Reply