Breaking News

महाराष्ट्राच्या मातीत महायुतीचा महाझंझावात

राज्यातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आला आहे. येत्या सोमवारी म्हणजेच 21 ऑक्टोबरला मतदान होणार असून, त्यानंतर तीनच दिवसांनी म्हणजे 24 तारखेला निकाल लागेल. महाराष्ट्राच्या महासंग्रामात महायुती विरुद्ध महाआघाडी अशी प्रमुख लढत आहे. एका सर्वेक्षणातून राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेत येणार असल्याचे जनमत नोंदविण्यात आले आहे. फार फार तर त्यातील आकडे इकडे-तिकडे होऊ शकतात, पण मतदारांचा कौल स्पष्ट झाला आहे.

महाराष्ट्राच्या 14व्या विधानसभा निवडणुकीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वपक्षीय प्रचाराची राळ उठून राज्याचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. सर्वसाधारपणे प्रचारात विरोधक सनसनाटी आरोप करून चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतात, पण इथे सत्ताधारीच आपली छाप उमटविताना पाहावयास मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या सभांनी महाराष्ट्र पिंजून काढला. दुसरीकडे मात्र काँग्रेस हायकमांडने महाराष्ट्राकडे जणू दुर्लक्ष केले आहे. पक्षाच्या अध्यक्ष सोनिया गांधी इकडे फिरकल्याच नाहीत. प्रकृती अस्वास्थ्य हे त्यामागचे कारण सांगितले जाते. मग त्यांनी हंगामी अध्यक्षपद तरी का स्वीकारले, हा प्रश्न पडतो. परदेश दौर्‍यावरून आलेले काँगे्रसचे युवराज राहुल गांधी दोनदा महाराष्ट्र दर्शन करून गेले. त्यांच्या दौर्‍याचा प्रतिस्पर्ध्यांना फायदा होतो. त्यामुळे ते येऊ नयेत, अशीच काँग्रेस उमेदवारांची इच्छा असेल. काँगे्रस आघाडीकडून राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार एकाकी लढत आहेत, मात्र त्यांच्या नेत्यांची नावे घोटाळे आणि गैरव्यवहारांमध्ये अधूनमधून येतच असल्याने पक्ष प्रतिमा सुधारू शकलेला नाही. त्याचा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणा आणि महाराष्ट्र अशा दोन्ही राज्यांत प्रचारसभांचा धडाका लावला आहे. त्यांनी खारघर (पनवेल) येथील सभेत विविध मुद्द्यांना स्पर्श करीत कोकण आगामी काळात आर्थिक विकासाचे केंद्र असेल हे अधोरेखित केले. त्याचप्रमाणे पनवेल परिसरात साकारल्या जात असलेले विमानतळ, सागरी सेतू, मेट्रो यांसारख्या प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगारनिर्मिती होणार असल्याकडे लक्ष वेधले. मुंबईतही महायुतीची सभा दणक्यात झाली. या सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, रिपाइं नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवलेे आदी नेते एकाच व्यासपीठावर होते. एकंदर महाराष्ट्राच्या भूमीत माहोल महायुतीचा आहे.

रायगडच्या रणांगणात राजकीय रंगत

रायगड जिल्ह्यातील राजकीय रणही तापले आहे. प्रत्येक उमेदवार आणि त्याचे कार्यकर्ते झटून प्रचार करताना दिसत आहेत. जिल्ह्यातील सात विधानसभा मतदारसंघांत पनवेल वगळता अन्यत्र रंगतदार लढती होण्याची चिन्हे आहेत.

राज्यात रायगडचे राजकारण नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. यंदा जिल्ह्यात राज्य पातळीप्रमाणेच महायुती विरुद्ध महाआघाडी असा सामना आहे. जिल्ह्यात कोणताही उलटफेर न होता राजकीय बलाबल ‘जैसे थे’ राहील असे चित्र यापूर्वी होते, पण सद्यस्थिती पाहता प्रस्थापित पक्षांच्या काही उमेदवारांना धक्का बसण्याची शक्यता आहे. कर्जतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुरेश लाड यांना लढत सोपी नाही. मागील निवडणुकीत महेंद्र थोरवे यांनी लाड यांना तुल्यबळ लढत दिली होती. तेच थोरवे स्वगृही परतले असून, शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे शिवसेना नेते हनुमंत पिंगळे यांचे राष्ट्रवादीत पक्षांतर आणि सुरेश टोकरे यांची घरवापसी या लाड यांच्यासाठी दिलासादायक बाजू आहेत, मात्र पिंगळे यांची ताकद मर्यादित असल्याचे गेल्या निवडणुकीतून दिसून आले, तर आमदारकीची महत्त्वाकांक्षा बाळगणारे टोकरे हे लाडांना कितपत साथ देतील, हा प्रश्न आहे. कर्जत नगर परिषदेच्या निवडणुकीत भाजप, शिवसेना, रिपाइं महायुतीने राष्ट्रवादी, काँग्रेस, शेकाप महाआघाडीला मात दिली होती. खुद्द लाड यांची कन्या थेट नगराध्यक्षपदाच्या लढतीत पराभूत झाली, पण त्यानंतर लोकसभा निवडणुकीत कर्जत या एकमेव विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या उमेदवाराला नाममात्र का होईना पण आघाडी मिळाली. ती आघाडी तोडण्याचे आव्हान थोरवेंसमोर आहे. हीच मते निर्णायक ठरू शकतात.  

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या आणि रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदिती तटकरे यांच्या उमेदवारीमुळे श्रीवर्धन मतदारसंघातील लढतीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. लोकसभा निवडणुकीत श्रीवर्धननेच तटकरे यांना तारले होते. या मतदारसंघातून त्यांना मजबूत आघाडी मिळाल्याने विजयाची माळ त्यांच्या गळ्यात पडली. आता आदिती तटकरे यांच्याविरुद्ध म्हाडाचे सभापती विनोद घोसाळकर यांना शिवसेनेने या वेळी मुंबईऐवजी श्रीवर्धनमधून रिंगणात उतरवले आहे. ही लढत एकतर्फी होईल, असे सुरुवातीला वाटत होते, मात्र काँग्रेसच्या तीन पदाधिकार्‍यांनी बंडखोरी केली आहे. शिवाय मुस्लिम लीगचा उमेदवारदेखील आपले राजकीय नशीब आजमावत आहे. हे सर्व उमेदवार किती मते घेतात यावर या मतदारसंघाचा निकाल अवलंबून आहे.

यंदा अलिबागमध्ये परिवर्तन होण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. शेकापकडून विद्यमान आमदार सुभाष उर्फ पंडित पाटील आणि शिवसेनेचे महेंद्र दळवी पुन्हा एकदा एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. काँग्रेसने अलिबागेत स्वतंत्र उमेदवार दिला आहे. शिवाय काँग्रेसमध्ये बंडखोरीही झाली आहे. या दोन उमेदवारांना मिळणारी मते दळवींच्या पथ्यावर पडणारी आहेत. मागील पाच वर्षांत भाजपने अलिबागसह मुरूड तालुक्यात पाय रोवले आहेत. ही मते दळवींच्या पारड्यात पडतील. अलीकडच्या काळात अलिबाग तालुक्यातील अनेक महत्त्वाच्या ग्रामपंचायती शेकापच्या हातून निसटल्या आहेत. अशात महायुतीचा झंझावात अखेरपर्यंत कायम राहिल्यास बालेकिल्ल्यातच शेकापला पराभव पत्करावा लागण्याची चिन्हे आहेत. अलिबागप्रमाणेच पेणमध्ये भाजपचे रविशेठ पाटील आणि शेकापचे विद्यमान आमदार धैर्यशील पाटील यांच्यात झुंज अपेक्षित आहे. जिल्ह्यात सर्वांत जास्त चुरस आहे ती उरण विधानसभा मतदारसंघात. तेथे शिवसेनेचे विद्यमान आमदार मनोहर भोईर, शेकापचे माजी आमदार विवेक पाटील आणि अपक्ष म्हणून लढणारे महेश बालदी या तिघांमध्ये जबरदस्त फाईट आहे. येथून जो कोणी विजयी होईल तो फार थोड्या मतांनी निवडून येईल, हे वेगळे सांगायला नको. 

जिल्ह्यातील सातही मतदारसंघांत ज्या एकमेव उमेदवाराचा विजय सुनिश्चित मानला जात आहे ते म्हणजे पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर. सिडको अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांच्या कामाचा झपाटा अधिकच वाढलाय. विस्तारणार्‍या पनवेलच्या गरजांमध्ये सातत्याने भर पडत आहे. सुमारे साडेपाच लाख मतदारसंख्या असलेल्या व राज्यातील सर्वांत मोठ्या असलेल्या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणे सोपी गोष्ट नाही. येथील लोकसंख्या प्रत्यक्षात जास्त आहे. अशा वेळी रस्ते, पाणी, वीज या मूलभूत गरजा पुरविण्याला प्राधान्य देण्यासह नागरिकांना विविध सोयीसुविधा देण्याकडे त्यांचा कटाक्ष असतो. पनवेल महापालिका हद्दीतील तहान भागविण्यासाठी कोंढाणे धरण सिडकोच्या माध्यमातून पूर्ण करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. हा आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नांचा परिपाक आहे. येत्या काळात या धरणातून पनवेलकरांना पाणी उपलब्ध होईल. 408 कोटींची अमृत योजनाही मार्गी लागली आहे. याखेरिज अन्य उपाययोजनासुद्धा केल्या जात आहेत. पनवेल शहर परिसरात सिमेंट काँक्रिटचे रस्ते पहिल्यांदा आमदार ठाकूर यांच्यामुळेच झाले. ग्रामीण भागातही रस्ते, पुलांची कामे हाती घेण्यात आली असून, ती निवडणुकीनंतर पूर्णत्वास येणार आहेत. आपल्या मतदारसंघाचे नाव राज्य, देशातच नव्हे; तर जागतिक पटलावर यावे या उद्देशाने ते कार्यरत आहेत. म्हणूनच पनवेलची सूज्ञ जनता त्यांनाच साथ देते हा आजवरचा इतिहास आहे.

राजकीय पक्षांसह प्रशासन व पोलीस यंत्रणाही निवडणुकीसाठी सज्ज झाली आहे. या धामधुमीत वरुणराजाने एण्ट्री करून तापलेले राजकीय वातावरण थंड करण्याचा प्रयत्न केला आहे, पण शांत बसतील ते कार्यकर्ते कसले. त्यांचा उत्साह कायम आहे. जाहीर प्रचाराच्या तोफा थंडावल्या आहेत. आता शेवटचे दोन दिवस उरले आहेत. अशा वेळी पावसाचा जोर

कायम राहिल्यास मतदानासाठी लोकांना बाहेर काढणे महत्त्वाचे ठरेल. वास्तविक, सुदृढ व निकोप लोकशाहीसाठी मतदारांनीच स्वयंस्फूर्तीने  आपला मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे.

-समाधान पाटील (मो. क्र. 9004175065)

Check Also

अनधिकृत व्यापार जिहादवर कडक कारवाई करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची नागपूर अधिवेशनात जोरदार मागणी नागपूर : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीत …

Leave a Reply