पनवेल : रामप्रहर वृत्त
कर्नाळा बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घपल्याचे प्रकरण आता अधिकाधिक उजेडात येऊ लागले आहे. त्यामुळे कारवाईच्या भीतीने घाबरलेले बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी या बँकेच्या संचालक मंडळावर असलेला आपला मुलगा अभिजित विवेकानंद पाटील यांचे नाव गुपचूपपणे संचालक मंडळातून वगळण्याचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे, असे पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी म्हटले आहे.
कर्नाळा बँकेच्या सन 2015-2020च्या संचालक मंडळात माजी आमदार विवेक पाटील यांचे चिरंजीव अभिजित पाटील यांचे नाव गेल्या वर्षापर्यंत होते, मात्र कर्नाळा बँक बुडू लागल्यानंतर या वर्षी या संचालक मंडळावरून अभिजित पाटील यांचे नावच गायब करण्यात आले. बँकेतील कोट्यवधींच्या घपल्याप्रकरणी कारवाई होणार हे लक्षात आल्यामुळेच विवेक पाटील यांनी या प्रकरणातून आपला मुलगा तरी निदान वाचावा या उद्देशाने त्याच्याकडून कर्नाळा बँकेच्या संचालकपदाचा राजीनामा घेऊन त्याचे नाव संचालक मंडळातून काढून टाकले आहे, असे परेश ठाकूर म्हणाले.
माजी आमदार विवेक पाटील निवडून आले की कर्नाळा बँक वाचवू शकतात आणि माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा त्यांना पाठिंबा आहे, अशा वावड्या शेकापमधील विवेक पाटील समर्थक उठवित आहेत. ही बाब संपूर्णत: खोटी असून, लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा विवेक पाटील यांना मुळीच पाठिंबा नाही, असेही परेश ठाकूर यांनी नमूद केले. मुळात माजी आमदार विवेक पाटील जेथे कर्नाळा बँकच वाचवू शकणार नाहीत, तर त्यांचा मुलगा तरी कसा वाचणार, अशी चर्चा पनवेल, उरण परिसरातील जनतेत आणि सोशल मीडियावर जोरदारपणे सुरू आहे.