पाणीपुरवठ्यासाठी टँकर पुरविण्याचे कर्जत पं.स.चे ग्रामपंचायतींना आदेश


कर्जत : बातमीदार
तालुक्यातील 84 गावांत पाणीटंचाई निर्माण झाली असून, दुर्गम आणि आदिवासी भागात तर पाणीटंचाईचे स्वरुप अधिकच भीषण झाले आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासन सरसावले आहे. टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करतांना येत असलेल्या अडचणी लक्षात घेऊन, कर्जत पंचायत समितीने अध्यादेश काढून संबंधीत ग्रामपंचायतींना टँकरची व्यवस्था करून पाण्याची टंचाई दूर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार काही ग्रामपंचायतीनी ट्रँकरद्वारे पाणीपुरवठा सुरूदेखील केला आहे.
डिसेंबर 2018मध्ये कर्जत तालुक्याचा पाणी पुरवठा कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यावेळी टँकरने पाणी पुरवठा करण्यासाठी आणि विंधन विहिरी खोदण्यासाठी 96 लाखाची तरतूद करण्यात आली होती. मात्र निश्चित केल्याप्रमाणे मार्च 2019पासून टँकर पुरवण्याचे नियोजन असतानादेखील 3 एप्रिलपासून टँकर सुरू करण्यात आले. त्यानंतरच्या काळात ट्रँकरची संख्या वाढली नाही. 3 एप्रिल रोजी 16 वाड्या आणि 3 गावे अशा 19 ठिकाणी केवळ तीन ट्रँकरद्वारे पाणी देण्यास सुरुवात झाली. त्यामुळे टंचाईग्रस्त गावात टँकर वेळेवर पोहचवत नसल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. त्याची दखल घेवून टंचाईग्रस्त भागात पाणी पोहचविण्यासाठी कर्जत पंचायत समितीने प्रयत्न सुरू केले आहेत.
कर्जत पंचायत समितीने मे महिन्याच्या सुरुवातीला तालुक्यातील दोन ठिकाणी टँकरचे अधिग्रहण करण्यासाठी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाला प्रस्ताव दिला आहे. जनतेचा रेटा लक्षात घेऊन कर्जत पंचायत समितीने तालुक्यातील ग्रामपंचायतींना अध्यादेश काढून स्वतः टँकर सुरू करून पाणी पुरविण्याच्या सूचना वजा आदेश दिले आहेत. त्यानुसार पाणीटंचाईवर मात करण्यासाठी शासनाच्या टँकरबरोबर आता कर्जत तालुक्यातील तब्बल 10ग्रामपंचायतींनी आपले टँकर सुरू केले असल्याने पंचायत समितीला काहीसा दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर तालुक्यातील अन्य भागातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी काही सामाजिक संस्थादेखील पुढे आल्या असून त्यांचे टँकरदेखील अनेक ठिकाणी पाणी पुरविण्याची सेवा देत आहेत. त्यामुळे आता पाणी टंचाईग्रस्त भागातील जनतेला काहीसा दिलासा मिळाला आहे.
10 ग्रामपंचायतींचा टॅँकरद्वारे पाणीपुरवठा
पंचायत समितीने केलेल्या सूचनेनुसार कर्जत तालुक्यातील मोग्रज, दामत-भडवळ, ममदापूर, आसल, पाथरज, खांडस, बोरिवली, कळंब, अंभेरपाडा, पाषाणे या ग्रामपंचायतीनी त्यांच्या हद्दीतील टंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांना टँकरद्वारे पाणी पुरविण्यास सुरुवात केली आहे.
पाणीटंचाई दूर करण्याचे आमचे कर्तव्य आहे, त्यामुळे पाणीटंचाई दूर करण्यासाठी सर्व पर्यायांचा विचार केला जात आहे. त्यामधून ग्रामपंचायतींना टँकर सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
-बाळाजी पुरी, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती