खोपोली : बातमीदार
मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर खालापूर तालुक्यातील कलोते गावानजीक एक खासगी आरामबस रात्री उलटली. या अपघातात 42 प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात घडला.
डायमंड ट्रॅव्हल्सची खासगी आरामबस (एमएच 11-सीएच 4999) मुंबईहून वाई (सातारा) येथे 42 प्रवासी घेऊन निघाली होती. रविवारी रात्री बाराच्या सुमारास खालापूर हद्दीतील कलोते गावानजीक वळणावर पुढे असलेल्या कंटेनरचा बसचालक विजय म्हसकर याला अंदाज आला नाही. कंटेनरला पाठीमागून धडक बसू नये यासाठी बसचालक विजय याने तातडीने ब्रेक दाबले असता बस अनियंत्रित होऊन महामार्गालगत उलटली. अंधार असल्यामुळे प्रवाशांमध्ये गोंधळ उडून आराडाओरड सुरू झाली. ही बस नेमकी दरवाजा असलेल्या बाजूला उलटल्याने प्रवाशांचा बाहेर पडण्याचा मार्ग बंद झाला होता. बसची समोरची काच फुटल्यामुळे प्रवाशांना समोरून बाहेर
पडता आले.
अपघाताची माहिती मिळताच खालापूरचे पोलीस निरीक्षक विश्वजित काईंगडे, खोपोली पोलीस ठाण्याचे धनाजी क्षीरसागर, चौक पोलीस चौकीचे सहाय्यक फौजदार संजय बांगर यांच्यासह पोलीस कर्मचारी आणि अपघातग्रस्त मदतीसाठी पथकाचे धर्मेंद्र रावळ, विजय भोसले, हनिफ कर्जीकर, फारूक घटनास्थळी पोहचले. या वेळी प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. सुदैवाने कोणालाही गंभीर दुखापत झाली नसल्याची माहिती पोलिसांनी दिली.
दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील प्रवाशांना दुसर्या वाहनाने पुढच्या प्रवासाला रवाना करण्यात आले.