पनवेल : प्रतिनिधी
पनवेल रेल्वेस्थानकात नवीन पनवेलकडे जाणारा जिना अरुंद असल्याने मोठा जिना बांधण्याची आणि फलाटावर स्वच्छतागृहाची मागणी स्टेशन सल्लागार समिती, प्रवासी संघटनेकडून अनेक दिवस केली जात होती. त्याची प्रशासनाने दखल घेऊन फलाट क्रमांक 4वर स्वच्छतागृह आणि नवीन जिना बांधण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेच्या पनवेल स्टेशनमध्ये फलाट क्रमांक 1 ते 4वरून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, ठाणे आणि अंधेरी अशा लोकलच्या 333 फेर्या दररोज होतात. याशिवाय फलाट 5 ते 7वरून मेल व एक्स्प्रेसच्या नियमित 57 आणि 3 हॉलिडे स्पेशल एक्स्प्रेस गाड्या धावतात. पनवेलहून सकाळी कामावर ठाण्याला जाणार्यांची संख्या मोठी आहे. पनवेलच्या पूर्वेला म्हणजेच नवीन पनवेल बाजूला मोठ्या प्रमाणात नागरी वस्ती वाढली आहे. या बाजूला येताना फलाट 5वरील जिन्याने वर जावे लागते, मात्र तेथे असलेला जिना अरुंद आहे. सकाळ-संध्याकाळी आणि मेलगाडी आल्यावर लोकलच्या प्रवाशांची जिन्यावर जाण्यासाठी होणारी गर्दी ही अपघाताला निमंत्रण देणारी आहे.
यासंदर्भात पनवेल रेल्वे स्टेशन सल्लागार समिती, प्रवासी संघ आणि अश्वत्थामा ज्येष्ठ नागरिक संघाने सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे फलाटावरील जिना मोठा करण्याची, सरकता जिना बसवण्याची आणि नवीन पनवेल बाजूला स्वच्छतागृह बांधण्याची मागणी केली होती.
आमदार प्रशांत ठाकूर यांनी याबाबत रेल्वे प्रशासनाशी पत्रव्यवहार केल्यावर प्रशासनाने त्याची दखल घेऊन फलाट क्रमांक 6 आणि 7वर जाण्यासाठी सरकता जिना बसवण्यात आला होता, पण फलाट 5वरील जिना आणि स्वच्छतागृहाची मागणी पूर्णत्वास आली नव्हती. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या मागणीचा पाठपुरावा केल्याने आता फलाट 4समोर स्वच्छतागृहाचे आणि जिना बांधण्याचे काम पूर्ण होत आले आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक आणि महिलांची सोय होणार आहे.