पनवेल : रामप्रहर वृत्त
विधानसभा निवडणुकीसाठी मतदान झाल्यानंतर आता कोण जिंकणार आणि कोण पराभूत होणार, याची चर्चा रायगड जिल्ह्यात सुरू झाली आहे. सर्वच पक्षांचे कार्यकर्ते आमचा उमेदवार निवडून येणार, असा दावा करीत आहेत, तर राजकीय विश्लेषक आपापले अंदाज वर्तवत आहेत.
रायगड जिल्ह्यात पनवेल, उरण, कर्जत, पेण, अलिबाग, श्रीवर्धन व महाड असे सात विधानसभा मतदारसंघ आहेत. यापैकी पनवेल मतदारसंघातून आमदार प्रशांत ठाकूर यांचा विजय निश्चित मानला जात आहे. अन्य सहा मतदारसंघांपैकी श्रीवर्धन वगळता सर्व ठिकाणी विद्यमान आमदार रिंगणात आहेत. श्रीवर्धनचे प्रतिनिधित्व केलेले अवधूत तटकरे यांनी शिवसेनेत प्रवेश केला, मात्र ते यंदा निवडणूक लढवत नाहीत.
श्रीवर्धनमधून शिवसेनेने म्हाडाचे अध्यक्ष विनोद घोसाळकर यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनील तटकरे यांच्या कन्या व रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदिती तटकरे या प्रतिस्पर्धी आहेत. महाड मतदारसंघात आमदार भरत गोगावले आणि काँगे्रसचे रायगड जिल्हा अध्यक्ष व माजी आमदार माणिक जगताप असा पारंपरिक सामना आहे. पेणमध्येही आमदार धैर्यशील पाटील व माजी मंत्री रविशेठ पाटील अशी लढत आहे, तर अलिबागेत आमदार पंडित पाटील यांच्याविरुद्ध पुन्हा एकदा महेंद्र दळवी आमनेसामने आहेत. तेथे महिला काँगे्रसच्या जिल्हा अध्यक्ष अॅड. श्रद्धा ठाकूर व अपक्ष म्हणून राजेंद्र ठाकूर आपले राजकीय भवितव्य आजमावत आहेत. कर्जत मतदारसंघात गेल्या वेळीप्रमाणेच आमदार सुरेश लाड विरुद्ध महेंद्र थोरवे झुंज आहे, तर उरणमध्ये आमदार मनोहर भोईर, माजी आमदार विवेक पाटील व अपक्ष उमेदवार महेश बालदी अशी तिरंगी लढत आहे.
जिल्ह्यात ग्रामीण भाग बहुसंख्य असलेल्या मतदारसंघांत जास्त मतदान झाले आहे. ते विद्यमान लोकप्रतिनिधींसाठी धोकादायक ठरण्याची चिन्हे आहेत. तसे झाल्यास अनेक ठिकाणी परिवर्तन होईल. सध्यातरी केवळ चर्चा करून अंदाज लावला जात आहे. नेमका काय निकाल लागतोय हे समजण्यासाठी अवघे दोन दिवस उरले आहेत. गुरुवारी (दि. 24) मतमोजणी होऊन दुपारपर्यंत कल हाती येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासन तयारी करीत आहे, तर पोलीस यंत्रणाही दक्ष आहे.
– जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी घसरली
अलिबाग : रायगड जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत सात मतदारसंघांमध्ये 65.86 मतदान झाले. 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या तुलनेत 4.39 टक्के मतदान कमी झालेे आहे. उरण मतदारसंघात सर्वाधिक मतदान 74.32 टक्के, तर पनवेल मतदारसंघात सर्वांत कमी 54.13 टक्के मतदान झाले.
जिल्ह्यातील सात मतदारसंघांमध्ये एकूण 22 लाख 72 हजार 37 मतदार आहेत. त्यापैकी 14 लाख 96 हजार 363 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. पनवेल मतदारसंघात 54.13 टक्के मतदान झाले. उरण 74.32, कर्जत 70.81, पेण 71.28, अलिबाग 72.61, श्रीवर्धन 60.84 आणि महाडमध्ये 66.98 टक्के असे मतदान झाले. एकूण मतदान 65.86 टक्के झाले आहे.
सन 2014च्या विधानसभा निवडणुकीत पनवेल 66.73, उरण 77.67, कर्जत 75.26, पेण 71.44, अलिबाग 73.05, श्रीवर्धन 62.43, महाड 67.12 आणि एकूण 70.25 टक्के मतदान झाले होते. गेल्या वेळच्या तुलनेत पनवेलमध्ये 12.6, उरण 3.35, कर्जत 4.45, पेण 0.16, अलिबाग 0.46, श्रीवर्धन 1.59, महाड 0.14 टक्के कमी मतदान झाले आहे. जिल्ह्यात एकूण 4.39 टक्के कमी मतदान नोंदविले गेले. मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून जिल्हा प्रशासनाने उपक्रम राबविले, तरीही मतदानाची टक्केवारी घसरली.
– मतमोजणीची तयारी पूर्ण
अलिबाग : जिमाका
विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली आहे. त्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघातील मतांची मोजणी शहरातील केईएस इंदूबाई वाजेकर इंग्लिश मीडियम विद्यालयात होणार आहे. तेथे मतमोजणीसाठी आवश्यक टेबलची संख्या 24 असून, मोजणीच्या एकूण 24 फेर्या होणार आहेत. उरणची मतमोजणी राजिपच्या जासई येथील मराठी शाळेत होणार असून, 24 फेर्या होतील. कर्जतची मतमोजणी किरवली येथील श्री साईकृपा शेळके बंधू मंगल कार्यालयात 24 फेर्यांमध्ये होणार आहे. पेणची मतमोजणी शहरातील केईएस लिटील एंजल स्कूल झी गार्डनशेजारी होणार असून, 27 फेर्या होतील. अलिबागची मतमोजणी नेहुली येथील जिल्हा क्रीडा संकुलात होणार असून, 27 फेर्या होतील. श्रीवर्धनची मतमोजणी शहरातील मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीत होणार असून, 25 फेर्या होतील. महाडची मतमोजणी शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे होणार असून, एकूण फेर्यांची संख्या 28 आहे.