उरण : प्रतिनिधी
कोरोना संसर्गाचे समूळ उच्चाटन करायचे असल्याने नागरिकांनीही लॉकडाऊनला व संचारबंदीला मोकळेपणाने जाहीर पाठिंबा दिला, मात्र दिवसेंदिवस वाढत जाणार्या कोरोना रुग्णसंख्येमुळे लॉकडाऊन मात्र वाढतच गेला. त्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व सेवा, उद्योगधंदे, व्यवसाय नियमानुसार बंद करण्यात आले. यामुळे दैनंदिन जीवनावर खूप मोठा परिणाम झाला. वारंवार लागू होणार्या लॉकडाउनमुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असून नागरिकांना विविध आर्थिक व मानसिक समस्यांना सामोरे जावे लागले. हे सर्व नागरिकांनी सहनही केले, आता मात्र वारंवार होणार्या लॉकडाऊनमुळे जनता हैराण झाली आहे. यावर लवकर योग्य व प्रभावी तोडगा न निघाल्यास जनतेला नको त्या संकटांना सामोरे जावे लागणार आहे.
संपूर्ण देशात लॉकडाऊन केल्याने 22 मार्चपासून संपूर्ण उरण तालुक्यातही लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. सूचनांचे वेळोवेळी पालन करत त्या त्या परिस्थितीनुसार उरण तालुक्यात स्थानिक प्रशासनाद्वारेही वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने लॉकडाऊन जाहीर करण्यात आले. काही दिवसांत हा रोग आटोक्यात येईल असे नागरिकांना वाटले होते, मात्र आज साडेतीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरीही कोरोना रोगाचा प्रादुर्भाव कमी होत नाही.त्यामुळे उरणमधील नागरिक या सततच्या लॉकडाऊनमुळे वैतागले आहेत.
लॉकडाऊनमुळे उपजीविकेचे, उदरनिर्वाहाचे कोणतेच साधन उपलब्ध होत नसल्याने उरणमधील नागरिकांना आता आपले पोट कसे भरावे, आपला चरितार्थ कसा चालवावा याची चिंता पडली आहे. हाताला काम नाही तर पैसा कुठून येणार, एखाद्याकडून पैसे घेतले तर ते कसे फेडणार, असे अनेक प्रश्न उरणकरांना पडले आहेत.
टाळेबंदीत रुग्णवाढीचे चक्र सुरूच
नवी मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबई पालिका हद्दीत नव्याने लागू केलेली टाळेबंदी 13 जुलैच्या मध्यरात्री संपुष्टात आल्यानंतर पालिकेने पुन्हा 10 दिवसांची टाळेबंदी लागू केली आहे. ती 19 जुलैच्या मध्यरात्रीपर्यंत राहणार आहे. टाळेबंदीच्या 11 दिवसांत 2,590 रुग्णांची वाढ झाली आहे. त्यामुळे रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी टाळेबंदी हा उपाय आहे का, असा सवाल उपस्थित केला जात आहे. टाळेबंदीमुळे आर्थिक चक्र रुतत चालले आहे. यावर शासनाने कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळे टाळेबंदीचा निर्णय घेण्याआधी सरकारने विचार करावा, अशी मागणी नागरिक आणि लघु उद्योजकांकडून केली जात आहे.
नव्या टाळेबंदीच्या 10 दिवसांतील रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढला आहे.सरासरी दिवसाकाठी 200हून अधिक रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे 2,590 रुग्ण वाढले आहेत. नवी मुंबईत बाधितांची एकूण संख्या 9,678 झाली आहे. आजवर कोरोनामुळे 305 जणांचा मृत्यू झाला आहे. टाळेबंदीत शहरातील कृषी उत्पन्न बाजार समिती, एमआयडीसी व अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद ठेवण्यात येत आहेत. शहरात विविध ठिकाणी भाजी घेण्यासाठी गर्दी पाहायला मिळते, तर रस्त्यावरही गाड्यांची वर्दळ पाहायला मिळाली.
नव्या टाळेबंदीत आढळलेले रुग्ण
3 जुलै 257
4 जुलै 257
5 जुलै 191
6 जुलै 164
7 जुलै 115
8 जुलै 207
9 जुलै 239
10 जुलै 361
11 जुलै 253
12 जुलै 313
13 जुलै 233
कर्जतमध्ये पाच जणांना लागण
कर्जत ः प्रतिनिधी
कर्जतमधील कोरोना रुग्णांची साखळी काही केल्या तुटत नाही. दररोज रुग्णसंख्या वाढत आहे. मंगळवारी एक माजी नगरसेवक आणि कर्जत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका आरोपीसह पाच जण कोरोनाबाधित झाले असून तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या 267वर गेली आहे.
कर्जत नगर परिषद हद्दीतील मुद्रे बुद्रुक गावाच्या भागात राहणार्या एका 38 वर्षीय युवकाचा कोरोना टेस्टचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून हा तरुण माजी नगरसेवक आहे. एका आरोपामध्ये कर्जत पोलिसांच्या ताब्यात असलेल्या एका 27 वर्षीय आरोपीला कोरोनाची बाधा झाल्याने कर्जत पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. कारण काही दिवसांपूर्वी एका आरोपीला कोरोनाची लागण झाली होती. सरकारी कामकाजामुळे त्या आरोपीशी संपर्क झाल्याने एक सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि दोन पोलीस कर्मचार्यांना कोरोनाची बाधा झाली होती.
तालुक्याच्या ग्रामीण भागात असलेल्या पोटल गावामधील एका 43 वर्षीय तरुणाचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. हा तरुण वदप-कुशिवली येथील युनिव्हर्सल बिझनेस कॉलेजमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. कडाव गावातील एका 53 वर्षीय महिलेला कोरोनाची लागण झाली असून ही महिला तेथील गणपती मंदिरात काम करीत आहे. तसेच कडावमधीलच एका 27 वर्षीय महिलेचा कोरोना टेस्ट अहवाल पॉझिटिव्ह आला होता. काही दिवसांपूर्वी या महिलेच्या सासूला आणि दिराला कोरोनाची बाधा झाली होती.
महाडमध्ये डॉक्टरसह आढळले 14 पॉझिटिव्ह
महाड ः प्रतिनिधी
महाड तालुक्यातील एका नामांकित डॉक्टरसह 14 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान, एमआयडीसीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक या कारखान्यात कामगारांची कोविड तपासणी करण्यात आली असून, सर्व कंपन्यांनी लक्षणे दिसणार्या कामगारांच्या कोविड तपासण्या कराव्यात, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी केले आहे.
महाडमध्ये कोरोना पॉझिटिव्ह अधिकृत दोन रुग्णांची माहिती प्रसिद्ध झाली असून यामध्ये कुंबळे तर्फे तुडील आणि शिंदेकोंड येथील प्रत्येकी एक कोरोना पॉझिटिव्ह असून एक जण उपचारादरम्यान बरा झाला आहे, मात्र काही कोविड चाचण्यांचे अहवाल उशिरा आल्यामुळे ते प्रसिद्ध करण्यात आले नाहीत. तालुका वैद्यकीय अधिकार्यांनी दिलेल्या माहितीनुसार यामध्ये महाड शहरातील एका नामांकित डॉक्टरचा समावेश आहे, तर कांबळे तर्फे बिरवाडीमधील सहा, चांभारखिंड एक, लाडवली एक, पोलादपूर दोन आणि वाळणमधील एकाचा समावेश आहे.
महाड औद्योगिक वसाहतीमधील लक्ष्मी ऑरगॅनिक कारखान्यात कामगारांची कोविड तपासणी करण्यात आली आहे, मात्र ही तपासणी एकाच वेळी न करता लक्षणे दिसणार्या कामगारांच्या रोजच्या रोज अथवा टप्प्याने सर्व कारखान्यांनी तपासण्या कराव्यात, असे मत वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी व्यक्त केले आहे.