हवाई दल प्रमुखांनी खडसावले
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय हवाई दलानं बालाकोटमध्ये केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे सरकारने पुराव्यासकट जाहीर करावे, अशी मागणी होत असतानाच याबाबत हवाई दलाचे प्रमुख बी. एस. धनोआ यांनी पहिल्यांदाच स्पष्टीकरण दिलं आहे. ‘लक्ष्यावर हल्ला चढवणं हे आमचं काम आहे. एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले हे सांगणं आमचं काम नाही. ते सरकार सांगेल,’ असं धनोआ यांनी सांगितलं.
‘जैश’च्या कॅम्पवर भारतीय हवाई दलानं केलेल्या एअर स्ट्राइकमध्ये किती दहशतवादी मारले गेले? हे सरकारने जाहीर करावे, अशी मागणी होत आहे. पाकिस्तानकडूनही एअर स्ट्राइकवर संशय व्यक्त केला जात आहे. एअर स्ट्राइकनंतर प्रथमच हवाई दल प्रमुख धनोआ यांनी पत्रकार परिषद घेऊन त्याबाबत माहिती दिली.
एअर स्ट्राइकमध्ये मिग 21चा वापर का करण्यात आला, याचं उत्तरही धनोआ यांनी या वेळी दिलं. मिग 21 हे आमचं लढाऊ विमान आहे. ते अपग्रेड करण्यात आले आहे. जी विमाने आमच्या ताफ्यात आहेत, त्यांचा वापर आम्ही युद्धात करतो. अजूनही आमची मोहीम सुरूच आहे. यापेक्षा अधिक माहिती आता देऊ शकत नाही, असेही धनोआ यांनी स्पष्ट केले.
आज राफेल असते तर चित्र वेगळे दिसले असते : नरेंद्र मोदी
जामनगर : एअर स्ट्राइकवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्या विरोधी पक्षांवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जामनगर येथील सभेत पलटवार केला. ‘देशवासियांची इच्छा आहे की दहशतवाद नष्ट व्हायला हवा. लष्कर कारवाई करतंय, पण काही जणांचा लष्कराच्या कारवाईवर विश्वास नाही,’ असं ते म्हणाले. ‘आपल्याकडे आज राफेल विमानं असती, तर आपलं कुठलं विमानही कोसळलं नसतं आणि त्यांचं कुठलं विमान वाचलंही नसतं,’ असे त्यांनी निक्षून सांगीतले.