Breaking News

मंगेश म्हसकर उपसरपंच झाल्याने नेरळकरांच्या आशा पल्लवित

रायगड जिल्ह्यात सर्वात मोठे आर्थिक उत्पन्न असलेली ग्रामपंचायत म्हणून नेरळचा उल्लेख केला जातो. या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदावर आता भाजपचे कर्जत तालुका अध्यक्ष मंगेश म्हसकर यांची निवड झाली आहे. यापूर्वी ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करणार्‍या म्हसकर यांना उपसरपंच पदाची संधी मिळाल्याने ते आपल्या अनुभवाच्या जोरावर नेरळकरांना भेडसावणार्‍या विविध समस्या सोडविण्यात यशस्वी होतील, असा विश्वास नेरळमधील नागरिक व्यक्त करीत आहेत. म्हसकर यांनी नेरळ ग्रामपंचायतीच्या विकासकामांबाबत एक व्हिजन तयार केले आहे. त्याविषयी नेरळचे उपसरपंच मंगेश म्हसकर यांच्याशी केलेली चर्चा…

राजमाता जिजामाता तलाव : 1998मध्ये निर्मिती झालेल्या नेरळमधील राजमाता जिजामाता तलावाचे सुशोभीकरण श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून करण्यात आले होते. या तलावामधील बंद असलेली बोटिंग सुविधा नेरळकरांसाठी लवकरच सुरू करण्यात येणार आहे. तलावातील कारंजे पुन्हा रंगीबेरंगी लाइटमध्ये झळाळून निघणार असून तेथे बसण्यासाठी नव्याने बाकडे बसविले जात आहेत. शिवाय तलाव परिसरात ज्येष्ठ नागरिक आणि महिला यांच्यासाठी ओपन जिम आहे, ती अद्ययावत केली जात आहे. तलाव परिसरात एलईडी दिवे लावण्याचा निर्धार आहे. त्याच वेळी आकर्षक झाडेदेखील लावली जाणार आहेत, तर ब्रिटिशकालीन धरणाला लागून असलेल्या अनाजी दळवी गार्डनमधील बैठक व्यवस्था, तेथील बंद पडलेले कारंजे आणि विजेचे दिवे आदी कामे हाती घेण्यात येत आहेत. त्यातून पुन्हा एकदा अनाजी दळवी पार्क नव्या रूपात पाहायला मिळेल आणि त्यामुळे धरणाजवळ आणखी एक विरंगुळ्याचे आणि पर्यटनाचे स्थान निर्माण होईल.

घनव्यवस्थापन प्रकल्प : कचरा डेपो ही नेरळ ग्रामस्थांना सतत भेडसावणारी समस्या झाली आहे. गावातील कल्याण रस्त्याच्या कडेला असलेला जुना कचरा डेपो ग्रामपंचायतीने हलविला आहे, मात्र तरीदेखील तेथे स्थानिक व्यावसायिक कचरा टाकत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यांच्यावर लवकरच सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवण्यात येणार असून, तेथे कचरा टाकणार्‍यांवर दंडात्मक आणि नंतर पोलीस कारवाई करण्याचा ग्रामपंचायतीचा प्रयत्न आहे. येथील कचरा डेपो पलीकडे हलविण्यात आला असून, तेथील पाच एकर गुरुचरण जमिनीवर ग्रामपंचायत केवळ कचरा साठविण्यात येणार नाही, तर तेथे नेरळ विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून कचर्‍यावर प्रक्रिया करणारा प्रकल्प उभारण्यात येईल. त्यामुळे कचरा विल्हेवाट हा मुद्दा निकाली निघणार आहे. गावातील कचरा उचलण्यासाठी चार घंटागाड्या असून ग्रामपंचायतीचा आरोग्य विभाग रोज सकाळी 6 वाजल्यापासून कचरा गोळा करून स्थानिकांच्या आरोग्याचा प्रश्न निकाली काढत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मैदान : नेरळमध्ये छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे एकमेव मैदान आहे. तेथील खुल्या व्यासपीठाच्या मागे असलेल्या खोल्यांमध्ये इनडोअर खेळांचे नियोजन ग्रामपंचायत करीत आहे. तेथील अंगणवाड्या कुंभारआळीत हलविण्यासाठी इमारती बांधण्याचेदेखील नियोजन ग्रामपंचायतीने केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज मैदान हे केवळ खेळाचे मैदान असावे, यासाठी आम्ही तेथे कबड्डी, हॉलीबॉल यांची मैदाने विकसित करण्याचा प्रयत्न करणार आहोत. अर्धवट तुटलेल्या संरक्षण भिंतीचे कामदेखील ग्रामपंचायत करणार आहे. मैदानात हिरवळ लावण्याचेही नियोजन आहे.

श्री गणेशघाट : गौरी-गणपती विसर्जन ज्या गणेश घाटावर होते, त्या ठिकाणी संपूर्ण गाव जमा होत असतो. तेथे केवळ गणेशोत्सव काळातच नव्हे तर नागरिकांनी विरंगुळ्यासाठी वर्षभर यावे आणि आपला काही वेळ घालवावा, यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने नियोजन केले आहे. त्यात बैठक व्यवस्था, पथदिवे यांची उभारणी करण्याचा प्रयत्न केला जाईल.

अंगणवाड्या इमारती : ग्रामपंचायतीच्या सर्व भागात अंगणवाड्या इमारती व्हाव्यात, यासाठी नेरळ ग्रामपंचायतीच्या माध्यमातून नवीन इमारती बांधण्याचे काम केले जाणार आहे. त्यात कुंभारआळी येथील जुन्या अंगणवाडी इमारतीच्या जागेवर दोन नवीन अंगणवाड्या उभारण्यात येणार आहेत. अस्तित्वात असलेल्या अंगणवाड्यांना कुंपण, पाण्याची सुविधा करून देण्यासाठी नेरळ ग्रामपंचायत कटिबद्ध आहे.

मच्छी मार्केट : ग्रामपंचायत हद्दीमध्ये बाजारपेठेत ठिकठिकाणी मच्छीविक्री व्यवसाय केला जात आहे. हा व्यवसाय  एकाच ठिकाणी करता यावा आणि त्या ठिकाणी ग्राहकांना चांगली मच्छी उपलब्ध व्हावी, यासाठी आम्ही टॅक्सी स्टॅन्डजवळ जे मार्केट उभे केले आहे. त्या ठिकाणी अधिक सुविधा देऊन  मच्छीमार्केट सुरू करण्याचा मानस आहे, पण सध्या मार्केटमध्ये असलेल्या टपरीधारकांच्या स्थलांतरणाचा विषय सुटल्यानंतर मच्छीमार्केटचा विषय ग्रामपंचायत सोडविणार आहे.

नळपाणी पुरवठा : नेरळ ग्रामपंचायतीच्या ज्या भागात कमी दराने पाणीपुरवठा होत आहे, तेथे जादा व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे नियोजन केले आहे. पाणी गळती थांबवून सर्वत्र सुरळीत पाणीपुरवठा करण्याचा हेतू आहे. पुरेशा दाबाने आणि अधिक वेळ पाणीपुरवठा करता यावा, यासाठी ग्रामपंचायत नवीन पंप खरेदी करणार आहे. वाढती लोकसंख्या लक्षात घेता नेरळ ग्रामपंचायतीने जल स्वराज्य अभियानातून नवीन नळ पाणीपुवठा योजना राबविण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. हा प्रस्ताव मंत्रालय स्तरावर असून त्या योजनेमुळे ग्रामपंचायत अधिक सक्षम होईल.

सीसीटीव्ही : परिसर सुरक्षित रहावा, यासाठी ग्रामपंचायतीने यापूर्वी येथील पोलीस ठाण्यांच्या मदतीने नेरळमध्ये सीसीटीव्हीचे जाळे उभारले आहे, त्यात अधिक सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची तरतूद ग्रामपंचायतीने केली आहे.

आदिवासीवाड्या केंद्रबिंदू  : नेरळ ग्रामपंचायत हद्दीमध्ये अनेक आदिवासीवाड्या असून, ज्या ठिकाणी नळ पाणीपुरवठा योजना यशस्वी झाली नाही, तेथे विहिरीवरून पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. आदिवासीवाड्यांमधील सामाजिक सभागृहांच्या दुरुस्तीची कामेदेखील आगामी काळात करण्याचे नियोजन असून आदिवासी लोकांना वैयक्तिक लाभ देण्यासाठी नेरळ ग्रामपंचायतीने आराखडा तयार केला आहे.

ग्रामपंचायत आपल्या दारी!  : ग्रामपंचायत आपल्या दारी ही संकल्पना राबविण्याचा निर्णय सत्ताधारी नेरळ विकास आघाडीने घेतला आहे. ग्रामपंचायतीच्या पाणी, वीज, आरोग्य विभागांचे सर्व कर्मचारी प्रत्येक प्रभागात एक आठवडा जाऊन तेथील सर्व प्रश्नांचे निराकरण करण्याचा प्रयत्न करणार आहेत. ग्रामपंचायत आपल्या दारी ही संकल्पना यशस्वी करण्यासाठी ग्रामस्थांनी हातभार लावावा, असे आवाहन केले आहे.

-संतोष पेरणे

Check Also

लोकसभेचा ‘मत’संग्राम

जगातील सर्वांत मोठी लोकशाही असलेल्या भारतात लोकसभेची निवडणूक होत आहे. हा सामना भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही …

Leave a Reply