
अलिबाग : जिमाका
रायगड जिल्ह्यात 2 व 3 मार्चला मतदार नोंदणी विशेष अभियान राबविण्यात आले. त्यानिमित्त जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी दोन दिवस जिल्ह्यातील दुर्गम भागातील तसेच अन्य विविध भागातील मतदान केंद्रांची पाहणी केली. शिवाय तेथे होत असलेल्या मतदार नोंदणीचा आढावाही घेतला.
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार शनिवार आणि रविवार असे दोन दिवस विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. या अभियानात रायगड जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करण्यात आली होती. या मोहिमेत जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी शनिवारी तळा तालुक्यातील मतदान केंद्रांची पाहणी केली, तर रविवारी पेण तालुक्यातील जिते, खरोशी तसेच पनवेल तालुक्यातील मतदान केंद्रांस भेट देऊन तेथील सोयीसुविधांची पाहणी केली.
जिल्हाभरात दिवसभर नवीन मतदार नोंदणी, नावे वगळणे, पत्ता बदल आदी कामांसाठी मतदार केंद्रस्तरीय अधिकारी कर्मचार्यांकडे संपर्क करीत होते. दिवसभर नाव नोंदणीसाठी लोक मतदान केंद्रांवर जाताना दिसत होते.