नागोठणे : प्रतिनिधी
10 वर्षांपासून ठप्प झालेल्या शिहू विभागाच्या विकासाची दारे नवनिर्वाचित आमदार रविशेठ पाटील यांच्या विजयाने पुन्हा एकदा खुली झाली असल्याचा विश्वास पेण तालुका भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष वसंत मोकल यांनी व्यक्त केला.
नागोठणे विभागात पेण तालुक्यातील शिहू ग्रामपंचायतीत सध्या विरोधी पक्षाची सत्ता आहे, तर जिल्हा परिषदेचे सदस्यसुद्धा विरोधी पक्षाचे आहे. मावळते आमदारही विरोधी पक्षाचेच होते. निवडून आलेल्या या लोकप्रतिनिधींनी गेल्या 10 वर्षात शिहू भागात किती कामे केली आहेत ते दुर्बीण लावूनच शोधावी लागतील, असे मोकल यांनी खोचकपणे सांगितले. एकाच घराण्याने तब्बल 35 वर्षे आमदारकी भूषविली असली, तरी विकासाच्या दृष्टीने आमच्या विभागाकडे कायम दुर्लक्षच केले होते, मात्र 2004 साली निवडून आल्यावर रविशेठ पाटील यांनी आमच्या विभागाकडे लक्ष घालून येथे विकासकामे केली होती, परंतु स्वकियांच्या गद्दारीमुळे त्यानंतरच्या दोन्ही निवडणुकांत त्यांना हार पत्करावी लागली होती. परिणामी येथील विकासकामांची गंगा पूर्णपणे ठप्पच झाली होती. आमच्या विभागासह संपूर्ण पेण मतदारसंघाने रविशेठ पाटील या विकास पुरुषाला या वेळी भरभरून दाद दिल्याने आता पुन्हा ते निवडून आले आहेत. त्यामुळे आमच्या शिहू विभागासह संपूर्ण विधानसभा मतदारसंघाला सुगीचे दिवस आले असल्याची भावना वसंत मोकल यांनी व्यक्त केली.