राष्ट्रपती कोविंद यांचा विश्वास
नवी दिल्ली : वृत्तसंस्था
जम्मू-काश्मीरमधून 370 कलम हटविण्याचा घेण्यात आलेला निर्णय आणि जम्मू-काश्मीर व लडाखबाबत घेण्यात आलेल्या निर्णयामुळे काश्मिरी जनतेचा अधिकच फायदा होईल, असा विश्वास राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केला. स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला देशवासीयांना संबोधित करताना राष्ट्रपती बोलत होते.
रामनाथ कोविंद यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच देशवासीयांना 73व्या स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. या वेळी त्यांनी राष्ट्रनिर्मितीसाठी आणि देशाला प्रगतिपथावर नेण्यासाठी प्रत्येकाने आपआपल्यापरीने योगदान देण्याचे आवाहनही केले. वर्षभरात देशाने केलेल्या प्रगतीचा आढावा घेतानाच भविष्यातील संकल्पांचाही त्यांनी या भाषणात उल्लेख केला. या वेळी त्यांनी जम्मू-काश्मीरमधील 370 कलम हटविण्याच्या केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयावरही भाष्य केले.
‘जम्मू-काश्मीर आणि लडाखसाठी जे नुकतेच बदल करण्यात आले. त्यामुळे इथल्या रहिवाशांना त्याचा मोठा लाभ होईल, असा मला विश्वास आहे. काश्मिरी जनतेलाही देशाच्या इतर भागातल्या नागरिकांना मिळणार्या सर्व अधिकार आणि सुविधांचा लाभ घेता येईल. समानतेला प्रोत्साहन देणारे प्रगतिशील कायदे आणि तरतुदींचा उपयोग त्यांना करता येईल. ‘शिक्षणाचा अधिकार’ कायदा लागू झाल्याने जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये सर्व बालकांना शिक्षणाचा अधिकार मिळेल. माहितीचा अधिकार प्राप्त झाल्याने जनहिताशी संबंधित माहिती इथल्या लोकांना मिळू शकेल. पारंपरिक रूपाने वंचित राहिलेल्या वर्गासाठी शिक्षण आणि नोकरीत आरक्षण आणि इतर सुविधा मिळू शकतील,’ असे राष्ट्रपती म्हणाले, तसेच तिहेरी तलाकसारख्या प्रथा नष्ट झाल्याने महिलांना न्याय मिळेल आणि भयमुक्त जीवन जगण्याची संधी त्यांना मिळणार असल्याचेही ते म्हणाले.
संसदेच्या कामकाजावर समाधानी
राष्ट्रपतींनी या भाषणात संसदेतील कामकाजावर समाधान व्यक्त केले. संसदेच्या नुकत्याच झालेल्या अधिवेशनात, लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सदनांची सत्रे सुरळीत झाली, याचा आनंद आहे. आशयघन चर्चा आणि राजकीय पक्षांच्या परस्पर सहकार्याने अनेक महत्त्वाची विधेयके मंजूर झाली. ही चांगली सुरुवात पाहता, येत्या पाच वर्षात संसदेत कामकाज असेच सुरू राहील याचे हे द्योतक आहे, असा मला विश्वास आहे. राज्यांच्या विधानसभांनीही संसदेची ही प्रभावी कार्य संस्कृती अंगिकारावी, असे आवाहनही त्यांनी केले.