मोहोपाडा : प्रतिनिधी
पावसाच्या लांबलेल्या मुक्कामामुळे बळीराजाला लुटले असून, शेतात भाताचे उभे पीक आडवे झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.खालापुरात भातपिकाचे लागवड क्षेत्र सरासरी 3000 हेक्टर आहे. या वर्षी 2754 हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. सदर क्षेत्रापैकी हळवे व निमगरवे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असून गरवे क्षेत्र अल्प प्रमाणात आहे.
चारसूत्री भात लागवड, सगुणा भात तंत्रज्ञान वापरून लागवड, तसेच ड्रम सीडर अशा तंत्रज्ञानाचा वापर करून लागवड करण्यात आली आहे. या तंत्रज्ञानाने उत्पादनात वाढ होणार म्हणून शेतकरी खूष असताना परतीच्या पावसाने मात्र आशेवर पाणी फिरवले आहे. त्यातच कोकण किनारपट्टीवर घोंघावणार्या क्यार वादळाने वातावरण अजून पावसाळी झाले असून खालापूर परिसरात देखील नेहमीपेक्षा वार्याचा जोर दिसून येत होता.निवडणुकीच्या कामात व्यस्त प्रशासन मोकळे झाले असले तरी दिवाळी सणाच्या सुट्या यामुळे अद्याप नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत.