पहिल्या स्वदेशी युद्धनौकेचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते जलावतरण
कोची : वृत्तसंस्था
संपूर्ण भारतीय बनावटीची आयएनएस विक्रांत ही विमानवाहू युद्धनौका शुक्रवारी (दि. 2) नौदलाच्या ताफ्यात दाखल झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते कोचीमध्ये हा सोहळा झाला. या वेळी बोलताना पंतप्रधान मोदींनी भारतीय सामर्थ्याचे प्रतीक म्हणजे आयएनएस विक्रांत आहे. प्रत्येक भारतीयासाठी विक्रांत युद्धनौका म्हणजे स्वाभिमान आहे, अशी भावना व्यक्त केली.
शत्रूच्या उरात धडकी भरवणारी संपूर्ण भारतीय बनावटीची महाशक्तीशाली आयएनएस विक्रांत युद्धनौका 262 मीटर लांब, 62 मीटर रूंद आणि 59 मीटर उंच आहे. विक्रांतचे वजन तब्बल 40 हजार टन एवढे असून पूर्ण क्षमतेने कार्यरत असताना हे वजन 45 हजार टन एवढे असते. एकाच वेळी 30पेक्षा जास्त विविध प्रकारची लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर वाहून नेण्याची विक्रांतची क्षमता आहे, तर एका दमात 15 हजार किलोमीटर एवढा पल्ला गाठण्याची विक्रांतची क्षमता आहे. तब्बल 1400पेक्षा जास्त नौदल सैनिक अधिकारी-कर्मचारी विक्रांतवर तैनात राहू शकतात. हवेतील 100 किमीपर्यंतचे विविध उंचीवरील लक्ष्य भेदणारी बराक-8 ही क्षेपणास्त्रे विक्रांतवर तैनात असणार आहेत. विमनानवाहू युद्धनौक बांधणे हे जगात आतापर्यंत फक्त मोजक्या देशांना शक्य झाले आहे. आता यामध्ये भारताचीही भर पडली आहे.
नौदलाच्या नवीन ध्वजाचे अनावरण
या सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या नवीन ध्वजाचेही अनावरण करण्यात आले. त्यांनी हा ध्वज छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केला. स्वराज्याच्या राजमुद्रेतून प्रेरणा घेत नवे चिन्ह साकारण्यात आले आहे. आतापर्यंत भारतीय नौदलाच्या ध्वजावर गुलामगिरीची ओळख होती, मात्र आजपासून भारतीय नौदलाला नवा झेंडा मिळाला आहे. नव्या झेंड्यावर एका बाजूला भारताचा तिरंगा, तर त्याच्या बाजूला नौदलाचे बोधचिन्ह दिसणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमार उभे केले, नौदलाचा विकास केला, असे गौरवाद्गार पंतप्रधान मोदींनी या वेळी काढले.
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून शुभेच्छा
मुंबई ः संपूर्ण भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांतचे जलावतरण हे भारतीय आरमाराचे जनक छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आयएनएस विक्रांतचे जलावतरण आणि नौसेनेला नवीन ध्वज प्रदान सोहळ्याचे स्वागत केले आहे, तर हा क्षण शिवभक्तांसाठी, महाराष्ट्रासाठी अभिमानाचा, गौरवाचा क्षण असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्री व उपमुख्यंमत्री दोघांनीही नौदलासह, भारतीय सेनेला शुभेच्छा दिल्या आहेत.