कर्जत : बातमीदार
माथेरानमधील माळी कर्मचार्यांचा गेल्या तीन महिन्यापासून रखडलेला पगार दिवाळीपूर्वी मिळाल्यामुळे सर्व कर्मचार्यांच्या
चेहर्यावर समाधानाचे तेज दिसून आले.
शहरातील नौरोजी उद्यान व पेमास्टर उद्यान यांच्या देखभालीसाठी माथेरान नगर पारिषदेने नियुक्त केलेल्या ठेकेदाराच्या कर्मचार्यांना गेल्या तीन महिन्याचा पगार मिळाला नव्हता. त्यामुळे सदर ठेकेदार कर्मचारी हवालदिल झाले होते. किमान दीपावलीत पगार मिळावा अशी कर्मचार्यांची मागणी होती. दैनिक रामप्रहरने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. त्याची दखल घेत ठेकेदाराने कर्मचार्यांचे पगार लक्ष्मीपूजन होण्याअगोदर दिल्याने कर्मचार्यांमध्ये आनंदाची भावना निर्माण झाली.
याबाबत ठेकेदाराचे प्रतिनिधी तुषार रासम यांनी सांगितले की, मी कर्मचार्यांचा पगार काही दिवस अगोदर काढून सिंधुदुर्गात गेलो होतो, पण काही कारणास्तव कर्मचार्यांना तो पगार उशिरा मिळाल्यामुळे मी दिलगिरी व्यक्त करतो. सर्व कर्मचार्यांचा पगार वेळेत दिल्याबद्दल माळी कर्मचारी निलेश मढये व जयराम पारधी यांनी ठेकेदार, तसेच नगर परिषदेचे बांधकाम सभापती प्रसाद सावंत यांचे आभार मानले आहेत. यामुळे कर्मचारी आनंदले.