Breaking News

नेरळ-कळंब मार्गावर एसटी धावणार; कर्जत आगार प्रमुखांनी घेतली बसची ट्रायल

कर्जत : बातमीदार

नेरळ-कळंब राज्यमार्गावरील 150 मीटर रस्त्याचे काम अर्धवट असल्याने या मार्गावरील एसटी गाड्यांच्या फेर्‍या बंद आहेत. त्याचा फटका 50 हून अधिक गावे आणि आदिवासी पाड्यांमधील विद्यार्थ्यांना तसेच नोकरदारांना बसत आहे. याबाबतचे वृत्त प्रसिध्द होताच  शनिवारी (दि. 23) कर्जत एसटी आगाराच्या अधिकार्‍यांनी या मार्गाची पाहणी करून एसटी बसची ट्रायल घेतली.

नेरळ-कळंब रस्त्याचे काम अर्धवट असल्याने कर्जत एसटी आगाराने या मार्गावरील एसटी गाड्या बंद ठेवल्या आहेत. नेरळ स्थानकातून कशेळे, शिंगढोल, नेरळ-गुडवण तसेच कर्जत याशिवाय नेरळ कळंब रस्त्यावरून धावणार्‍या नेरळ-वारे, नेरळ-कळंब, नेरळ-बोरगाव, नेरळ-ओलमन, नेरळ-मुरबाड तसेच कळंब-वांगणी-कळंब, नेरळ-देवपाडा आणि नेरळ-पोशीर या गाड्या चालविल्या जातात. कोरोनानंतर एसटी संप मिटल्यावर कर्जत आगाराने नेरळ एसटी स्थानकातून गाड्या सुरु केल्या. मात्र नेरळ-कळंब रस्त्यावर नेरळ धामोते येथे रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे, त्या ठिकाणी रस्त्याच्या एका लेनचे बांधकाम अपूर्ण आहे. त्यामुळे एसटी गाड्यांच्या फेर्‍या बंद ठेवण्यात आल्या आहेत. त्याचा फटका प्रामुख्याने जून महिन्यापासून स्थानिक विद्यार्थ्यांना बसत आहे. या भागातील विद्यार्थी हे पोशीर येथून नेरळ,  बदलापूर आणि कर्जत येथे जात असतात. ते सर्व विद्यार्थी पूर्वी एसटी महामंडळाकडून सवलतीच्या दरातील पास काढून प्रवास करायचे. पण एसटी गाड्या बंद असल्याने या सर्व विद्यार्थ्यांना खासगी वाहनातून शाळा किंवा कॉलेजला जावे लागत आहे.

शुक्रवारी कर्जत एसटी आगाराचे प्रमुख शंकर यादव यांनी आपल्या सहा अधिकार्‍यांसह नेरळ ते धामोते फाटा या दरम्यान बसमधून तीन फेर्‍या मारल्या. केवळ 20 मीटर लांबीचा रस्ता खडी टाकून तयार केला तरी नेरळ एसटी स्थानकातून बस सुरु केल्या जातील, असे आश्वासन कर्जत आगार प्रमुख शंकर यादव यांनी दिले.  या वेळी प्रवीण मोर्गे, दिनेश भोईर, गोरख शेप, दिनेश कालेकर, कैलास विरले, कृष्णा हाबळे आदी उपस्थित होते.

Check Also

गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, नैना, पायाभूत सुविधासंदर्भात योग्य नियोजन व्हावे

आमदार प्रशांत ठाकूर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्त गरजेपोटी बांधलेली घरे, पिण्याचे पाणी, …

Leave a Reply