दोघे करताहेत उरण ते उत्तराखंड प्रवास
उरण : वार्ताहर
गेल्या पाच वर्षांपासून देशात स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अनेक सामाजिक संस्था, व्यक्ती यासाठी काम करीत आहेत. अशाच प्रकारे दोन जण सायकलवरून उरण ते उत्तराखंड असा सुमारे अडीच हजार किमी प्रवास करून स्वच्छतेचा संदेश देणार आहेत.
50 वर्षांहून जास्त वयाचे उरण येथील प्रकाश केणी आणि कळंबोलीतील तानाजी बामणे हे दोघे स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यासाठी सायकल प्रवास करीत आहेत. स्वच्छतेबरोबर ते पाणी वाचवा हाही संदेश नागरिकांना देणार आहेत. त्यांनी नुकताच आपला प्रवास सुरू केला. उरणचे आमदार महेश बालदी यांनी पुष्पगुच्छ देऊन प्रकाश केणी यांना या उपक्रमासाठी शुभेच्छा दिल्या.
या शुभेच्छा कार्यक्रमास भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शहा, नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, युवा मोर्चाचे तालुका अध्यक्ष शेखर तांडेल, भाजप महालण विभाग अध्यक्ष महेश कडू, तालुका सरचिटणीस सुनील पाटील, उपाध्यक्ष पंडित घरत, प्रकाश ठाकूर, उद्योजक राजेंद्र पडते, चाणजे विभाग अध्यक्ष जितेंद्र घरत, तसेच भारत गुरव, हितेश शाह, मनन पटेल, देवेंद्र पाटील, मित्र परिवार आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.