250 कामगारांवर बेकारीची कुर्हाड
खोपोली ़: प्रतिनिधी
खालापूर तालुक्यातील सावरोली ग्रामपंचायत हद्दीत असणारी विप्रास गोराडिया पोलाद उत्पादन करणारी कंपनी दिवाळी सणाच्या तोंडावरच तडकाफडकी बंद करण्यात आली. त्यामुळे सुमारे 250 कामगारांवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. विप्रास गोराडिया कारखाना गेल्या 30 वर्षांपासून कार्यरत आहे. या कारखान्याने 2004 पासून वीजबिल भरले नाही. त्यामुळे व्याजासह सुमारे 40 कोटी रुपयांचे वीजबिल थकीत होते. ते वसूल करण्यासाठी वीज वितरण कंपनीने न्यायालयात दावा दाखल केला होता. त्यात न्यायालयाने कारखाना व्यवस्थापनाला थकीत बिलाची रक्कम व्याजासह वीज वितरण कंपनीत भरण्याचे आदेश दिले होते, मात्र ही रक्कम भरण्यास कंपनीने टाळाटाळ केल्याने न्यायालयाच्या आदेशानुसार वीज वितरण कंपनीने विप्रास गोराडिया कारखान्याचा वीजपुरवठा कायमचा बंद केला. वीज नसल्याने कंपनी व्यवस्थापनाने उत्पादन प्रक्रिया थांबवून कंपनी बेमुदत काळासाठी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. हे करताना कंपनीने कामगारांची देणी थकविली आहेत. या सर्व घडामोडीत सुमारे 250 कामगारांवर घरी बसण्याची वेळ आली आहे. ऐन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कामगारांवर बेरोजगारीचे संकट कोसळल्याने त्यांची दिवाळी अंधारात गेली आहे.