अधिकार्यांच्या गैरहजेरीमुळे संताप व्यक्त; कारवाईची मागणी
![](https://ramprahar.com/wp-content/uploads/2019/10/Pen-kharland-vibhag-dhadak-1024x631.jpg)
पेण : प्रतिनिधी
तालुक्यातील आमटेम येथील खारबंदिस्तीच्या कामाची बिले शेतकर्यांना अजून का अदा केली नाहीत, याचा जाब विचारण्यासाठी रायगड जिल्हा परिषदेचे माजी सभापती आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय जांभळे यांनी बुधवारी (दि. 30) पेणमधील खारभूमी कार्यालयावर धडक दिली, मात्र तेथे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांनी संताप व्यक्त केला. खारबंदिस्तीची कामे स्थानिक शेतकर्यांकडून केली जातात आणि त्याची बिले संबंधित खारभूमी कार्यालय शेतकर्यांना अदा करते. पेणमधील आमटेम येथील शेतकर्यांनी केलेल्या खारबंदिस्तीच्या कामाची बिले त्यांना अदा करण्यात आली नाहीत याचा जाब विचारण्यासाठी संजय जांभळे पेणच्या खारभूमी कार्यालयात पोहचले, मात्र तेथे सक्षम अधिकारी उपस्थित नसल्यामुळे त्यांचा संताप अनावर झाला. जांभळे यांनी अधिकार्यांच्या गैरहजेरीविषयी विचारणा केली असता उपस्थित अधिकार्यांनी थातूरमातूर कारणे दिली. अधिक चौकशी केली असता सहा ते सात कर्मचार्यांनी रजेसाठी अर्ज केला होता, मात्र तो अर्ज मंजूर न होऊनसुद्धा हे कर्मचारी गैरहजर राहिल्याचे समजले. संजय जांभळे यांनी फोनवरून प्रांताधिकार्यांशी संपर्क साधून संबंधित गैरहजर कर्मचार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.