Breaking News

विधानसभा : लोकशाहीचे महामंदिर

विधानसभा हे लोकशाहीचे महामंदिर आहे. जनता जनार्दन हीच त्याची स्वयंभू सार्वभौम देवता. प्रतिनिधी हे त्या देवतेचे उपासक. त्या उपासकांचे सेवासाधनेचे संवाद म्हणजेच विधिमंडळातील चर्चा. सत्ता आणि सेवा, विरोध आणि विनोद, शक्ती आणि युक्ती, वाद आणि संवाद, कर्तृत्व आणि वक्तृत्व, मान आणि इमान, नय आणि विनय, निष्ठा आणि प्रतिष्ठा, सवाल आणि जवाब, आवेश आणि आर्जव इत्यादी गोष्टींचा पावन संगम या विधानसभेत अनुभवयास मिळतो. तोल सांभाळून बोल कसा लावावा, वैर सोडून वार कसा करावा, नर्म होऊन वर्म कसे भेदावे, दुजाभाव असून बंधुभाव कसा ठेवावा, अल्पमताने बहुमताला व बहुमताने लोकमताला साद-प्रतिसाद कसा द्यावा आणि ही सर्व संधाने बांधण्यात लोकसेवेचे अनुसंधान कसे सुटू नये या सर्व गोष्टींचे दक्षतापूर्वक परिपालन म्हणजे वैधानिक कार्य.

विधानसभा म्हणजे शिळोप्याच्या गप्पांचे ठिकाण नसून नवमहाभारताचे व्यासपीठ आहे, या जाणिवेने लोकप्रतिनिधी काम करतील, याच अपेक्षेने लोक त्यांना नियुक्त करीत असतात. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजकारण करता करता राजकारणात प्रवेश करून विधानसभेच्या अध्यक्षपदाची समर्थपणे 10 वर्षे धुरा सांभाळणारे अध्यात्ममार्गी, भक्तीमार्गी त्र्यंबक शिवराम उर्फ बाळासाहेब भारदे यांनी काढलेले हे उद्गार आज प्रकर्षाने आठवले. महाराष्ट्राच्या चौदाव्या विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी हे सर्व सोपस्कार भारताच्या मुख्य निवडणूक आयोगाने संपूर्ण यंत्रणेला सोबत घेऊन सुरळीतपणे पार पाडले. 9 नोव्हेंबरपर्यंत चौदावी विधानसभा अस्तित्वात येत असताना बाळासाहेब भारदे यांचे विधानसभा : लोकशाहीचे महामंदिर हे मौलिक विचार उपलब्ध आहेत. महाराष्ट्र विधानसभा सभागृहात नव्याने येणार्‍या तसेच अलीकडच्या 15-20 वर्षांत आमदार म्हणून जबाबदारी स्वीकारणार्‍या सदस्यांसाठी बाळासाहेब भारदे यांचे अनमोल विचार उपयुक्त ठरतील म्हणून वाचकांसाठी काही महत्त्वाच्या घटना इथे नमूद करीत आहे.

पत्रकारिता आणि राजकारण हे दोन्ही हातात हात घालून पुढे मार्गक्रमण करीत असल्याचे इतिहासात डोकावून पाहिले तर निश्चितच लक्षात येते. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा मोहनदास करमचंद गांधी, प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे, आचार्य प्रल्हाद केशव अत्रे, बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून तर आताच्या राजकारणातसुद्धा अनेक नावे दिसून येतात. टिळक, आगरकर, अत्रे,  ठाकरे यांचा काळ हा पत्रकारिता आणि त्यातून समाजकारण हा उद्देश होता. अशाच श्रृंखलेतील एक महत्त्वाची व्यक्ती म्हणजे त्र्यंबक शिवराम उर्फ बाळासाहेब भारदे हे होत. चले जाव चळवळीतले सेनानी रावसाहेब पटवर्धन आणि भाऊसाहेब फिरोदिया यांच्या संपादकत्वाखाली ’संघशक्ती’ हे साप्ताहिक 1936 साली सुरू झाले.

अहमदनगर जिल्हा काँग्रेस पक्षाने सुरू केलेले हे साप्ताहिक 1948 साली रावसाहेब आणि भाऊसाहेब हे नगरहून पुण्याला गेल्याने बंद पडले, परंतु रावसाहेब पटवर्धन यांचे शिष्य त्र्यंबक शिवराम भारदे यांनी या साप्ताहिकाचे पुनरुज्जीवन केले. संघशक्तीवर बाळासाहेब भारदे यांनी आपल्या विद्वत्तेचा परिपूर्ण ठसा उमटविला. बाळासाहेब भारदे यांनी पत्रकारिता जोरदारपणे चालवली. आचार्य अत्रे, अप्पा पेंडसे, धुळ्याच्या स्वतंत्र भारतचे अ. वि. टिळक यांच्या बरोबरीने काम करता करता जिल्हा पत्रकार संघ, मराठी पत्रकार परिषद अशा संघटनांचे अध्यक्षपदही भूषविले. 1953 साली मराठी पत्रकार परिषदेचे तेरावे अधिवेशन मुंबई येथे झाले आणि या अधिवेशनाचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे, तर स्वागताध्यक्ष अप्पा पेंडसे होते, परंतु मुंबईच्या या अधिवेशनानंतर बाळासाहेब पत्रकारितेकडून पूर्ण वेळ राजकारणात व्यस्त झाले. शिवरामपंत भारदे या प्रकांडपंडितांच्या या सुपुत्राने महाराष्ट्राच्या राजकारणात जबरदस्त दबदबा निर्माण केला.

1957 साली पहिले सहकारमंत्री होण्याचा मान त्र्यंबक शिवराम उर्फ बाळासाहेब भारदे यांना मिळाला, परंतु ते इतके साधे, सच्चे गांधीवादी होते की बाळासाहेब भारदे यांनी सहकारमंत्री झाल्याची बातमी आकाशवाणीवर ऐकली आणि एसटीने तिकीट काढून ते मुंबईला गेले. हा साधेपणा त्यांनी आयुष्यभर जपला. 1962 साली आणि 1967 साली असे दोन वेळा तसेच सलग 10 वर्षे त्यांनी विधानसभेचे अध्यक्षपद भूषविले. राजकारणात असतानाही बाळासाहेब भारदे यांनी कीर्तन करणे सोडले नाही. देशभक्त बाळासाहेब भारदे म्हणून ही त्यांची ओळख होती. विधानसभा सभागृहात त्यांनी आपल्या लोकाभिमुखता आणि विद्वत्तापूर्ण विचारांचा परिचय करून दिला. साधी राहणी, उच्च विचारसरणी, गांधीवाद, अध्यात्म, पत्रकारिता आणि निखळ राजकारण यामुळे पद्मभूषण त्र्यंबक शिवराम उर्फ बाळासाहेब भारदे यांची महाराष्ट्र विधिमंडळाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होऊ शकते. अशा थोर व्यक्तीचा सहवास मला लाभला, ही भाऊसाहेब केतकर आणि वसंतराव त्रिवेदी यांचीच पुण्याई. बुवा भारदे, कोटिभास्कर भारदे, बाळासाहेब भारदे यांच्या पवित्र स्मृतींना विनम्र अभिवादन.

झोपडी अन् दिवा ध्यानमां ठिवा!

खान्देशात रावसाहेब, भाऊसाहेब, नानासाहेब अशी विशेषणे त्या त्या व्यक्तीच्या नावाच्या आधी लावण्याची पद्धत आहे. भारतीय जनसंघाचे ज्येष्ठ नेते उत्तमराव लक्ष्मणराव पाटील यांना नानासाहेब म्हणून संबोधण्यात येत होते. त्यामुळे त्यांना खान्देशात नानासाहेब उत्तमराव पाटील या नावाने ओळखण्यात येत होते. आता युती आणि आघाडीचे देशात आणि राज्यातील राजकारणात महत्त्व वाढले आहे, परंतु संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीच्या काळात भारतीय जनसंघ आणि प्रजा समाजवादी पक्ष यांची युती होती. प्रजा समाजवादी पक्षाची निवडणूक निशाणी होती ’झोपडी’ आणि भारतीय जनसंघाची निवडणूक निशाणी होती ’पणती’ (दिवा). धुळे विधानसभा मतदारसंघात भारतीय जनसंघाचे उमेदवार  होते नानासाहेब उत्तमराव पाटील. त्यामुळे प्रजा समाजवादी पक्ष आणि भारतीय जनसंघ या दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते प्रचारात घोषणा देत होते झोपडी अन् दिवा ध्यानमां ठिवा! अशा घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून जात होता. नानासाहेब उत्तमराव पाटील हे दुसर्‍या लोकसभेत 1957 ते 1962 यादरम्यान धुळ्याचे खासदार होते. तेव्हा मुंबई इलाखा प्रांत होता. 1954-55 आणि 1966 ते 1978 या काळात उत्तमराव पाटील हे महाराष्ट्र  विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते होते. 1978 ते 1980 या काळात उत्तमराव हे विधानसभेचे जनता पक्षाचे आमदार असताना शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील पुरोगामी लोकशाही दल सरकारमध्ये महसूलमंत्री होते. 1989  ते 1991 या काळात उत्तमराव पाटील हे एरंडोल मतदारसंघाचे खासदार होते. ज्येष्ठ पत्रकार आणि भारतीय जनसंघ, जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाचे नेते धरमचंद चोरडिया ही देणगी महाराष्ट्राला नानासाहेब उत्तमराव पाटील यांनीच दिली होती. आज हे दोन्ही नेते विस्मृतीत गेले आहेत की काय? पण झोपडी अन् दिवा ध्यानमां ठिवाची मजा काही औरच होती.कडवट हिंदुत्ववादी शेख साबिर हाजी करीम अर्थात साबिरभाई शेख! 

हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या 1990च्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती केली. ही युती हिंदुत्वाच्या मुद्द्यावर करण्यात आली होती. शिवसेना 171 आणि भारतीय जनता पक्ष 117 अशा प्रकारे महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचे वाटप करण्यात आले होते. यापैकी अंबरनाथ विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे शेख साबिर हाजी करीम म्हणजेच साबिरभाई शेख यांना उमेदवारी देण्यात आली होती. साबिरभाईंना उमेदवारी देण्यात येताच भारतीय जनता पक्षातील एका गटाने उचल खाल्ली आणि हिंदुत्ववादी युती असतानाही एका मुसलमान नेत्याला उमेदवारी देणे हे योग्य नाही, अशी भूमिका घेत ठाण्याचे नेते गोवर्धन भगत यांना साबिरभाईंच्या विरोधात बंडखोरी करीत निवडणुकीच्या मैदानात उतरविण्यात आले. मुळात ’त्या’ लोकांना साबिरभाईंबद्दल अभ्यासच नव्हता, मग ते बिच्चारे तरी काय करणार? साबिरभाई शेख यांचा जन्मच मुळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मभूमी असलेल्या शिवनेरीच्या पायथ्याशी झालेला. त्यांचे वडील हे प्रख्यात प्रवचनकार होते आणि साबिरभाईंचे प्राथमिक शिक्षण हे सबनीस गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली झाले होते. संपूर्ण ज्ञानेश्वरी साबिरभाई शेख यांना मुखोद्गत होती. डॉ. मनोहर गजानन जोशी यांच्या विरोधातल्या न्यायालयीन खटल्यात हिंदुत्त्वाच्या मुद्द्यावर त्यांची साक्षही झाली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांनी कोणता गड, कोणता किल्ला कोणत्या तारखेला घेतला होता? त्या दिवशी हिंदू पंचांगाप्रमाणे तिथी कोणती होती? हा संपूर्ण घटनाक्रम साबिरभाई शेख यांना तोंडपाठ होता. यदा यदाही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानम् सृजाम्यहम्। परित्राणाय साधूनाम् विनाशायच दुष्कृताम्। धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥ हा श्रीमद्भगवद्गीतेतील श्रीकृष्णार्जुन संवादातील श्लोक साबिरभाई शेख खडान्खडा म्हणत असत. बाळासाहेब ठाकरे यांनी साबिरभाई शेख यांना केवळ उमेदवारीच दिली नाही, तर डॉ. मनोहर गजानन जोशी यांच्या शिवशाही एक या मंत्रिमंडळात कामगारमंत्रीसुद्धा केले होते. ज्यांच्या प्रेतांच्या पायघड्यांवरून स्वातंत्र्यलक्ष्मी आमच्या अंगणात आली, त्या अगणित हुतात्म्यांना वंदन करून शेख साबिर हाजी करीम महाराष्ट्र विधानसभेच्या सदस्यत्वाची शपथ घेत आहेत, अशी खड्या आवाजात 1990 साली पहिली शपथ घेणार्‍या साबिरभाईंनी 1995 साली उंच हिमालय तुमचा अमुचा केवळ माझा सह्यकडा, गौरीशंकर उभ्या जगाचा, मनात पूजिन रायगडा, ही घेतलेली शपथ ’याचि देहि याचि डोळा’ ऐकण्याचं आणि पाहण्याचं भाग्य आम्हाला मिळालं.

कडवट हिंदुत्ववादी असलेल्या साबिर शेख यांना कुराणातील ’आएत’सुद्धा तितकेच मुखोद्गत होते. बाळासाहेब ठाकरे यांच्या मान्यतेने वांद्रे येथील एका विस्तीर्ण मैदानावर मुस्लिम बांधवांचा इज्तेमा उत्सव साबिरभाई शेख यांनी मोठ्या उत्साहात आयोजित केला होता आणि त्यात मुस्लिम बांधवांना सर्व सोयीसुविधा पुरविण्यात आल्या होत्या. तसेच महाराष्ट्रातील अल्पसंख्याक बांधवांसाठी आयोग बनवावा, अशी सूचनाही त्यांनी केली होती. साबिर शेख यांना ’सह्याद्रिभ्रमणभूषण’ पदवीही प्रदान करण्यात आली होती. साबिरभाईंवर लिहायला गेलो तर पानं कमी पडतील. अंबरनाथच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीत काम करणारा साधा कामगार ते राज्याचे कामगारमंत्री अशी झेप घेणार्‍या साबिरभाईंच्या पवित्र स्मृतींना मानाचा मुजरा.

बॅ. गाडगीळांनी नकार दिल्याने बॅ. भोसले मुख्यमंत्री झाले

इंदिरा गांधी यांनी केंद्रात फिनिक्स पक्ष्याप्रमाणे भरारी घेत जनता पक्षाची राजवट (नेत्यांच्या कपाळकरंटेपणामुळे) उलथवून टाकली आणि महाराष्ट्रात वसंतदादा पाटील यांच्या मंत्रिमंडळातून बाहेर पडून जनता पक्षाच्या सहकार्याने पुलोद राजवट आणणार्‍या शरद पवारांचे सरकार बरखास्त केले. महाराष्ट्रात विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि 9 जून 1980 रोजी बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले. अंतुले यांनी झपाटल्यासारखे काम केले. त्यांची राजवट लक्षात राहण्यासारखी होती, पण इंदिरा गांधी प्रतिभा

प्रतिष्ठानच्या नावाखाली धनादेशाद्वारे निधी गोळा करणे, सिमेंट घोटाळा आदी आरोपांमुळे इंदिरा गांधी यांनी त्यांना बदलण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ हे इंदिराजींचे अत्यंत निष्ठावंत सहकारी होते. विठ्ठलराव मुंबईहून नवी दिल्लीला नुकतेच पोहचले होते. इंदिराजींनी त्यांना बोलावणे धाडले. विठ्ठलराव इंदिराजींना भेटायला गेले. तेव्हा इंदिरा गांधी त्यांना म्हणाल्या की,  मिस्टर गाडगीळ, यू गो टू बॉम्बे! त्यावर विठ्ठलराव म्हणाले, मॅडम, आय केम फ्रॉम बॉम्बे जस्ट नाऊ! त्यावर पुन्हा इंदिरा गांधी म्हणाल्या, नो नो यू गो टू बॉम्बे फॉर अ लाँग टाइम!  विठ्ठलराव गाडगीळ यांनी इंदिरा गांधी यांना नक्की काय म्हणायचंय हे लक्षात न आल्याने पुन्हा स्पष्टता करण्याची इच्छा व्यक्त केली. तेव्हा इंदिराजींनी सांगितले की, मिस्टर गाडगीळ, आय वॉन्ट टू रिप्लेस वन बॅरिस्टर टू अनदर. मला बॅरिस्टर अंतुले यांच्याऐवजी तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी बसवायचे आहे. तेही बॅरिस्टर आहेत आणि तुम्हीसुद्धा बॅरिस्टर आहात. त्यावर विठ्ठलराव गाडगीळ यांनी त्यांना विनम्रपणे नकार दिला आणि गळ्यातलं जानवं दाखवत मी ब्राह्मण आहे. मला त्या पदावर राहून आपल्या अपेक्षा पूर्ण करता येणार नाहीत, असे स्पष्टपणे नमूद केले. 12 जानेवारी 1982 रोजी बॅरिस्टर अब्दुल रहमान अंतुले यांनी आपल्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि विनोदमूर्ती म्हणून ओळखण्यात येणार्‍या बॅरिस्टर बाबासाहेब भोसले यांची इंदिरा गांधी यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी वर्णी लावली. बॅरिस्टर विठ्ठलराव गाडगीळ यांनी नकार दिला नसता, तर महाराष्ट्राला डॉ. मनोहर गजानन जोशी यांच्याआधीच काँग्रेसच्या राजवटीतच ब्राह्मण मुख्यमंत्री लाभला असता. अर्थात ब्राह्मण मुख्यमंत्री बनविण्याचे श्रेय बाळासाहेब ठाकरे यांना मिळायचं होतं. विठ्ठलराव गाडगीळ यांचे मित्र असलेल्या बाळासाहेब ठाकरे यांनी हे ’करून दाखवलं!’

-योगेश त्रिवेदी, मंत्रालय प्रहर

Check Also

अन्यायाविरोधात एकत्रित आवाज महत्त्वाचा -लोकनेते रामशेठ ठाकूर

मुलीवर अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक; आरपीआयचे आमरण उपोषण मागे पनवेल : रामप्रहर वृत्त ज्या ज्या …

Leave a Reply