Breaking News

निकालापूर्वी अन् निकालानंतर…

महाराष्ट्राची छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणारे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, शाहू, फुले यांचा वारसा जोपासणारे राज्य म्हणून देशात ओळख आहे. राज्यात राजकीय वैमनस्य, जातीयता, सामाजिक विषमता तसेच जातीभेदाला थारा नाही. नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र विधानसभेच्या 288 जागांचे निकाल स्पष्ट झाले असून लोकसभेच्या सातारा मतदारसंघात अवघ्या पाच महिन्यांत झालेल्या या पोटनिवडणुकीत विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांनी निवडणूक लढवली, मात्र या निवडणुकीत राजेंचा भ्रमाचा भोपळा फुटला.  त्यांना सातार्‍याच्या मतदारांनी धोबीपछाड दिली.

उदयनराजेंचा त्यांचे प्रतिस्पर्धी श्रीनिवास पाटील यांनी तब्बल 86 हजार 717 मतांनी पराभव केला. उदयनराजे यांना पाच लाख 48 हजार 903 व श्रीनिवास पाटील यांना सहा लाख 36 हजार 620 मते मिळाली. मतदारांनी उदयनराजेंवर एकवेळ प्रेम केलं, पण तेच उदयनराजे स्वतःचा विचार करून चालू लागल्याने त्याच उदयनराजेंना पाच महिन्यांत मतदारांनी त्यांची चूक दाखवून दिली. माजी आयएएस अधिकारी, राज्यपाल, खासदार अशी बिरुदावली असलेल्या राष्ट्रवादीचे श्रीनिवास पाटील यांनी विजयाची खुन्नस न काढता किंवा उन्माद न करता एक नागरिक, आदर्श लोकप्रतिनिधीची भूमिका बजावल्याने महाराष्ट्राच्या संस्काराला शोभेल असे वर्तन केले. विजयी झालेले श्रीनिवास पाटील यांनी सातारा गादीचे वारस उदयनराजे भोसले यांच्या महाली जाऊन भोसले खानदानाची भेट घेतली. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणून उदयनराजेंचे प्रेमही मिळवले. ही घटना महाराष्ट्राच्या लौकिकास शोभेशी होती. राजकीय वैर विसरून झालेली ही भेट आदर्श लोकप्रतिनिधी म्हणून सर्वश्रृत झाली. अशीच भेट माजी कृषिमंत्री व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे खरे वारस म्हणून असणारे रोहित पवार यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी नगरचे पालकमंत्री राम शिंदे यांचा तब्बल 43 हजार 347 मतांनी पराभव केला. मागील 25 वर्षे भाजपचे वर्चस्व असणारा हा कर्जत-जामखेड मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा गड समजला जात होता. जिल्ह्याचे पालकमंत्री राम शिंदे यांनी या मतदारसंघाचे 10 वर्षे नेतृत्व करून जिल्ह्यात तसेच मतदारसंघात विकासाची कामेही केली आहेत. असे असूनही शरद पवार यांचे खरे वारसदार रोहित पवार यांच्या शैलीवर येथील मतदारांनी विश्वास ठेवून खुद्द पालकमंत्री शिंदे यांना नाकारले. 

विरोधकांनी रोहित पवार अशाच नावाचा एक उमेदवार उभा केला, मात्र त्यांना मते फोडण्यात यश आले नाही. नवखा उमेदवार शरद पवारांचा वारसदार म्हणून रोहित पवार यास भरभरून मते कर्जत- जामखेडच्या मतदारांनी दिली. पवार घराण्याच्या लौकिकास शोभेल असं वर्तन रोहित पवारांनी करून जनतेच्या मतांच्या रूपात आपला विजय साकार केला असला तरी विरोधी असणारा उमेदवार किती तुल्यबळ, तगडा आहे याची जाणीव करून दिली. विजयी मिरवणुकीत कुठेही हुल्लडपणा न करता रोहित पवार हे तडक राम शिंदे यांच्या घरी जात राम शिंदे यांच्या आईचे दर्शन घेतले, तर राम शिंदे यांच्याकडून फेटा बांधून घेतला. हे संस्कार  फक्त महाराष्ट्रातील राजकारणी घराण्यांमध्ये असल्याचे वारंवार समोर येत आहे. राजकारण सरले आपण आता विकासासाठी मिळून काम करू हाच या भेटीचा अर्थ महाराष्ट्राने काढला. 

कर्जत-खालापूरमध्ये मात्र राजकीय वैमनस्य काढण्याचे संकेत दिले जात आहेत.  तसा खालापूर-कर्जत मतदारसंघ शांतताप्रिय असला तरी काही कालावधीत या मतदारसंघात राजकीय हाणामार्‍या व कुरघोड्या झाल्या आहेत, होत आहेत. खालापुरात चौक गावातील हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते अरुण अहिरे यांची गटारीच्या दिवशी हत्या करण्यात आली होती, तर तत्कालीन कर्जत-खालापूरचे आमदार तुकाराम सुर्वे यांचीही हत्या दिवाळीच्या सणात झाली होती. कर्जत खालापूरचा निकाल येताच  पराभूत उमेदवार सतत दहा वर्षे व तीन वेळा या मतदारसंघाचे नेतृत्व केलेले सुरेश लाड यांनी पराभवाच्या मीमांसेसाठी जमलेल्या आपल्या कार्यकर्त्यांच्या सभेत विजयी उमेदवाराला लांबून शब्दरूपी शुभेच्छा दिल्या. संयमी नेतृत्व माळकरी सुस्वभावी शांत अशी सुरेश लाड यांची ओळख आहे.

मागील 40 वर्षात सुरेशभाऊ लाड  ग्रामपंचायत सदस्य, सरपंच, पंचायत समिती सभापती ते 15 वर्षे आमदार व दोन वेळा पराभूत माजी आमदार म्हणून या मतदारसंघात वावरले. पाईपलाईनवरून उपजिल्हाधिकारी अभय कुलगुटकर यांच्या लगावलेल्या कानशिलात हा प्रकार वगळता आमदारांनी गैरवर्तन केले आहे असा एखादाही प्रकार समोर आला नाही. न्यायालयात हा दावा सुरेशभाऊ लाड यांच्या बाजूने लागला.  मात्र निवडणुकीचा निकाल जाहीर होताच काही तासांच्या अवधीत 15 वर्षे कर्जत खालापूरचे नेतृत्व करणारे सुरेश लाड एवढे आक्रमक का झाले, हा सवाल निर्माण होतो. ठीक आहे, कुठेतरी दबावतंत्राचा वापर करून मतं मिळवली असतीलही, पण आपणांसही या मतदारसंघाचा 40 वर्षांचा अनुभव आहे. आपण तरी गाफिल का राहिलात? साम-दाम-दंड-भेद वापरून मते पदरात पाडण्याची बिहारी परंपरा सध्यातरी आपल्या राज्यात आली नाही. विशेषत: कर्जत-खालापूरमध्ये कधी येऊ शकत नाही.  

राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोधी मताचा कार्यकर्ता भाऊंच्या जवळपास जाणार नाही याची दक्षता घेतली. आपल्याला ओव्हरटेक होणार नाही याची खबरदारी घेतली. कार्यकर्त्यांचा अहंपणा, माजोरपणा सुरेशभाऊंना नडला. एका अनुभवी सुस्वभावी लोकप्रतिनिधीला जवळच्या कार्यकर्त्यांनीच घरी बसवले असे बोलणे वावगे ठरणार नाही. कार्यकर्त्यांचा अहंकारही लाडसाहेबांना भोवला. भाऊंनी कार्यकर्ता उभा केला. त्यांना मोठमोठी पदे दिली. मात्र अशा कार्यकर्त्यांनी भाऊंना निवडण्यासाठी आसपासच्या परिसरात मतदारांशी चांगले संबंध जोपासले नाही. मते पैशांवर घेता येतात, अशी समजूत करून घेतली. त्यात प्रामाणिक कार्यकर्ता व आम आदमी, सामान्य मतदार बाजूला फेकला गेला, याची तमा बाळगली नाही. भाऊंना त्यांच्या स्वभाव पेक्षा कार्यकर्त्यांचा अहंकार व गर्व, दबावतंत्र नडला असेच म्हणावे लागेल. भाऊंची वाणी सुरेल आहे. भाऊ कार्यकर्त्यांना आवर घाला. एवढे पुरे.

मागील तीन निवडणुकीत आपणास कार्यकर्त्यांपेक्षा विरोधकांची मते आपल्या बाजूला आल्याने सुरेश लाड आमदार झाले. विरोधकांमधील बंडखोरी पथ्यावर पडली असे गणित रंगवण्यापेक्षा आपला स्वभाव विरोधी मते घेण्यास कारणीभूत ठरला. मात्र भाऊंचे कार्यकर्ते याउलट उलटे वागले.

नगर जिल्ह्यातील कर्जत जामखेड, सातारा येथील 2019च्या निवडणुकीतील विजयी उमेदवाराने विरोधी पक्ष्याच्या घरी जाऊन वडीलधार्‍यांचे आशीर्वाद घेतले. पराभूत उमेदवाराच्या शुभेच्छा स्वीकारल्या. मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानी रायगड जिल्ह्यातील कर्जत खालापूरात कार्यकर्त्यांना धमकावण्याची वार्ता सुरू झाली असल्याने ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. निवडणुका येतील जातील पण या जिल्ह्यातील राजकीय वातावरण कधी  गढूळ होणार नाही याची दक्षता प्रत्येक राजकारण्यांनी घेण्याची गरज निर्माण झाली. नगरच्या कर्जतमध्ये घडले ते रायगडाच्या कर्जतमध्ये घडेल का?

-अरूण नलावडे, फिरस्ती

Check Also

वावंजे, मानपाडा येथे विकासकामाचे भूमिपूजन

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल विधानसभा मतदारसंघातील वावंजे निताळे आणि मानपाडा कातकरी वाडी येथे मंगळवारी (दि.28) …

Leave a Reply