भुवनेश्वर : वृत्तसंस्था
भारतीय हॉकीसाठी शनिवारचा (दि. 2) दिवस विशेष ठरला. महिला हॉकी संघाने ऑलिम्पिकचे तिकीट पक्के केले असतानाच पुरुषांच्या हॉकी संघानेही टोकियो ऑलिम्पिकमध्ये दिमाखात प्रवेश निश्चित केला. पुरुषांच्या संघाने रशियाला सलग दुसर्या सामन्यात 7-1 (एकूण 11-3) अशा गोलफरकाने नमवून ऑलिम्पिकमध्ये प्रवेश निश्चित केला. आकाशदीप सिंहने 23व्या आणि 29व्या मिनिटाला गोल डागला, तर रुपिंदर पाल सिंह याने 48व्या आणि 59व्या मिनिटाला गोल केला. ललित उपाध्याय याने 17व्या मिनिटाला, नीलकांता शर्माने 47व्या मिनिटाला, तसेच अमित रोहिदास यानेही एक
गोल केला.
भारताने शुक्रवारी पहिल्या लढतीत रशियाला 4-2ने पराभूत केले होते. दुसरीकडे महिला संघानेही एकूण गोलसंख्येच्या आधारावर यूएसएला 6-5ने पराभूत केले. हे दोन्ही सामने भुवनेश्वरच्या कलिंगा मैदानात झाले. तत्पूर्वी पहिल्या क्वार्टरच्या सुरुवातीला रशियाचे खेळाडू आक्रमक खेळले. पहिल्या मिनिटालाच अॅलेक्सी सोबोलेवस्कीने गोल डागून रशियाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. पहिल्या क्वॉर्टरमध्ये हा एकमेव गोल डागला गेला. भारतीय संघाच्या बचाव फळीने वापसी करत रशियाला एकही गोल करू दिला नाही. दुसर्या क्वार्टरमध्ये भारतीय संघाने जोरदार वापसी केली. 17व्या मिनिटाला ललित उपाध्यायने गोल केला. आकाशदीप सिंहने एकापाठोपाठ एक असे दोन गोल डागून भारताला 3-1 अशी आघाडी मिळवून दिली. आकाशदीपने पहिला गोल 23व्या मिनिटाला डागला, तर दुसरा गोल 29व्या मिनिटाला केला. तिसर्या क्वार्टरमध्ये एकही गोल करता आला नाही. चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने आक्रमक सुरुवात केली. नीलकांता शर्मा याने 47व्या मिनिटाला चौथा गोल डागला, तर रुपिंदर पाल सिंह याने एका मिनिटानंतर पॅनल्टी कॉर्नरचे रूपांतर गोलमध्ये केले. भारताला 5-1 अशी आघाडी मिळाल्यानंतर रुपिंदर पाल सिंह याने 59व्या मिनिटाला पॅनल्टी कॉर्नरचे संधीत रूपांतर करून गोल डागला. भारताकडून अखेरचा आणि सामन्यातील सातवा गोल अमित रोहिदास याने डागला.